वर्तमान संदर्भात सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
१९९१ साली सोव्हिएत रशिया कोसळला आणि शीतयुद्ध संपले. अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. ही पोकळी भरून काढण्यासाठी चीन पुढे सरसावला. अफाट लोकसंख्या हाताशी उपलब्ध असणार्‍या आणि सर्वंकष साम्यवादी हुकूमशहा असणार्‍या चिनी सत्ताधार्‍यांना त्यांच्या देशांतर्गत कोणताच विरोध नव्हता. त्यामुळे गेल्या २५ वर्षांत चीन महासत्ता तर बनलाच आहे, पण आता संपूर्ण जगाच्या व्यापारावर नियंत्रण आणून तो एकमेक जागतिक महासत्ता बनू पाहात आहे. गेली किमान चार शतके जागतिक व्यापाराचे केंद्रबिंदू पूर्वेकडे सरकलेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्र म्हणजेच हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर हे आता जागतिक व्यापाराचे मुख्य केंद्र बनते आहे आणि या केंद्रावर केवळ आपलेच वर्चस्व हवे. या महत्त्वाकांक्षेने चीन नवनवीन खेळ्या करतो आहे. पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिकेत जिबूती या देशांना चीन अत्याधुनिक बंदरे बांधून देतोय, ती उगीच गंमत म्हणून नव्हे.
 
साहजिकच अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मलाक्का सामुद्रधुनी, सिंगापूर, दक्षिण चिनी समुद्र या सगळ्या सागरी भागाला अतोनात व्यापारी आणि त्यामुळेच आरमारी महत्त्व आले आहे. २०१४ साली सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने या बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेत, खंबीर परराष्ट्रीय धोरण बांधायला सुरुवात केली आहे. अंदमानमध्ये आतापर्यंत नौदलाचे ठाणे होतेच. आता तिथे नौदल-भूदल-वायुदल यांची एक संयुक्त कमांड निर्माण करण्यात आली आहे. शिवाय नौदलाचे सेवानिवृत्त प्रमुख अ‍ॅडमिरल डी.के. जोशी यांची अंदमानचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तात्पर्य, अंदमान द्वीपसमूह हा पूर्व समुद्रातला भारताचा एक बुलंद जलदुर्ग बनतो आहे.
 
१९११ साली सावरकर अंदमानकडे निघाले होते. कैदी म्हणून, दोन-दोन जन्मठेपांची, पन्नास वर्षांची शिक्षा भोगायला ते अंदमानातल्या ‘नरकपुरी’ म्हणून कुख्यात असलेल्या सेल्युलर जेलकडे निघाले होते. दुसरा कुणी या कल्पनेनेच मनातून पिचून मोडून गेला असता. पण सावरकरांना अंदमान बेटांचे पहिले दर्शन घडताच त्यांच्या मनात कल्पना उद्भवली. त्यांच्या द्रष्ट्या नजरेला दृश्य दिसले ते, स्वतंत्र भारताच्या पूर्व समुद्रातल्या बुलंद जलदुर्गाचे! ते दृश्य आज प्रत्यक्षात आले आहे.
 
सावरकरांनी वेळोवेळी पाहिलेली आणि खणखणीत शब्दांत व्यक्त करून ठेवलेली अशी अनेक स्वप्ने २०१४ पासून प्रत्यक्षात साकार होत आहेत. कारण ती स्वप्ने, ती भाकिते एका समर्थ बलाढ्य राष्ट्राची होती आणि आपले राष्ट्र समर्थ, बलाढ्य व्हावे, अशी इच्छा करणारे, त्याप्रमाणे धडाक्याने निर्णय घेणारे सत्ताधारी २०१४ पासून सत्तेवर आले आहेत.
 
राजकीय क्रांती यशस्वी, स्थिर होण्यासाठी आधी सामाजिक क्रांती, सामाजिक परिवर्तन व्हावे लागते. हिंदू समाजाला विघटित, विभाजित करणारा जात हा फार मोठा दोष आहे, हे ओळखून त्यावरचा जातीय इलाज सावरकरांनी १९२४ पासूनच सुरू केला होता. त्या सामाजिक आंदोलनालाही आता गोड फळे येऊ लागली आहेत.
 
पण, त्यामुळेच हिंदुत्व विरोधकही आता पिसाटले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका ही अखेरची संधी आहे, हे जाणून ते जोरदार कामाला लागलेले आहेत. हिंदुत्वाच्या राष्ट्रीय भावनेने एकवटलेला हिंदू समाज ‘जात’ या मुद्द्यावर तोडता येतो, असा त्यांचा अनुभव आहे. त्यासाठीच १ जानेवारी २०१८ ला भीमा-कोरेगावमध्ये आग पेटवण्यात आली आणि आता ती फुंकरून-फुंकरून चेतवण्याचे उद्योग सुरू आहेत. यात राष्ट्रविरोधी मुसलमान, पाद्री वगैरे आहेतच. पण, खाल्ल्या ताटातच घाण करण्याची जन्मजात सवय असणारे डावे आणि किरकोळ राजकीय दुकाने थाटून डरकाळ्या फोडणारेच जास्त पुढे आहेत.
 
या हातघाईच्या लढाईत प्रस्तुत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर - सध्याच्या संदर्भात’ हे डॉ. अशोक मोडकलिखित छोटेखानी पुस्तक म्हणजे फार महत्त्वाची अशी वैचारिक साधनसामग्री आहे. हिंदुत्वाचा तात्त्विक, बौद्धिक विचार करणार्‍या आणि मांडणार्‍या चिंतकांना तर हे पुस्तक उपयुक्त आहेच, पण लेख, स्फुटलेख, वाचकांची पत्रे, सोशल मीडियावरील छोट्या-मोठ्या पोस्ट याद्वारे हिंदुत्व विचारांचा प्रभावी प्रचार करण्यासाठीही हे फार उपयुक्त पुस्तक आहे. सावरकरांनी वेळोवेळी मांडलेले, भारताची राजनीती, परराष्ट्रनीती, रणनीती याबाबतचे विचार आणि आज अगदी तशाच प्रकारे चालू असलेला प्रत्यक्ष आचार याचे विवेचन, यातून आपल्याला सावरकर या महापुरुषाचे अलौकिक द्रष्टेपण पुन्हा एकदा कळते. सावरकरांच्या सामाजिक कार्याबद्दलच्या विवेचनातून, आपल्याला त्यांची जातीनिर्मूलनाची खरीखुरी कळकळ आणि त्याचवेळी स्वतःला ‘पुरोगामी’ नि ‘सुधारक’ म्हणविणार्‍या डाव्या मंडळींचा भंपक ढोंगीपणा हेही दिसतात.
 
एकंदरीत, सावरकरांनी मांडलेले राजकारण, समाजकारण, औद्योगिक धोरण, सैन्यविषयक धोरण इत्यादी विचार आज पाऊणशे-शंभर वर्षांनंतरही किती सामायिक-रेलेव्हन्ट आहेत, हे समजण्यासाठी जसे हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे, तसे २०१९ मधल्या हिंदुत्वविरोधी विखारी प्रचाराला प्रभावी रीतीने खोडून काढण्यासाठीही फार उपयुक्त आहे.
 
विषयाची समजूत चटकन आणि चांगल्या रीतीने पटावी, यासाठी नकाशे फार महत्त्वाचे असतात. लेखक आणि प्रकाशक यांनी आवर्जून नकाशे दिलेत, याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण मराठी पुस्तकात इंग्रजी नकाशे का? तर ते इंटरनेटवरून विनामूल्य उपलब्ध आहेत म्हणून. सावरकरांना इंग्रजी भाषेचे वावडे नव्हते. पण, भाषाशुद्धी हाही त्यांचा एक आग्रहाचा विषय होता. म्हणून पुढील आवृत्तीत नकाशेदेखील मराठीत असावेत, ही अपेक्षा.
 
हेमंत सरदेसाई यांचे मुखपृष्ठ व कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची एकंदर निर्मिती सुबक.
पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर - सध्याच्या संदर्भात
लेखक - डॉ. अशोक मोडक
प्रकाशक - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पृष्ठे - ११४
मूल्य - १०० रुपये
 
 
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले

 
@@AUTHORINFO_V1@@