ज्येष्ठ नाही, तर श्रेष्ठ ‘गांधीवादी’ कार्यकर्ता
महा एमटीबी   28-May-2018

 

 

 
भूदान चळवळ, त्यानंतर खादीच्या टॉवेल आणि कांबळ्यांची निर्मिती, सर्वोदय योजनेतून ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सुब्बा राव. त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 

नरहर कुरुंदकर यांच्या ‘अभयारण्य’ या पुस्तकात ‘करुणेचे दोन अर्थ’ या लेखात ते गांधीवादी समाजसेवक बाबा आमटे आणि श्वाईट्झर ज्याला समाजसेवेसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले, या दोघांमधला फरक स्पष्ट करताना म्हणतात की, “श्वाईट्झर जन्मभर जखमेला पट्ट्या बांधीत राहिला, बाबा आमटे जखमेला पट्टी बांधताना रोग्याला स्वाभिमानी मन आणि पंख देत राहिले.”

बाबा आमटे हे गांधीवादी. घरचं वैभव सोडून, त्यांनी गांधीवादाला वाहून घेतलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलं. आज आमटे कुटुंबाची चौथी पिढीही समाजकार्यात अग्रेसर आहे. असंच कार्य हे बंग आणि कोल्हे दाम्पत्याचं. या आमटे, कोल्हे आणि बंग या सगळ्यांना जोडणारे दोन दुवे! एक म्हणजे यांनी केलेले उत्तुंग असे समाजकार्य आणि दुसरे म्हणजे आमटे, बंग आणि कोल्हे यांचे स्फूर्तिस्थान महात्मा गांधी. यांच्याच पठडीतले एक गांधीवादी म्हणजे सुब्बा राव. तेलंगणमधील सुब्बा राव हे मोठे सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा जन्म १९३४ साली झाला. पुढे वयाच्या २०व्या वर्षी १९५४ साली त्यांचा संबंध विनोबा भावे आणि त्यांनी चालवलेल्या भूदान चळवळीशी आला. तेव्हापासून त्यांनी गांधीवादाला वाहून घेतले. भूदान चळवळीत राव यांनी चांगली कामगिरी बजावली. त्यावेळी हैद्राबाद राज्य होते. या राज्याच्या यज्ञ समितीच्या माध्यमातून त्यांनी तब्बल ३२ हजार एकर जमीन मिळविली. २० हजार एकर जमीन मेहबूबनगर जिल्ह्यातील होती, तर हैद्राबाद जिल्ह्यातील १२ हजार एकर जमीन श्रीमंतांकडून मिळवून, ती गरिबांना दान केली. या सगळ्यात त्यांनी जमीनमालक, गरजू आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून कार्य बजावले. त्यांचे हे कार्य पाहून त्यांना लोक ‘भूदान सुब्बा राव’ म्हणून ओळखू लागले.

भूदान चळवळीनंतर त्यांनी आपले लक्ष खादीकडे केंद्रित केले. खादीच्या फक्त कपड्यांचीच निर्मिती होत होती, तेव्हा राव यांनी खादीपासून टॉवेल आणि कांबळ्यांची निर्मिती केली. ही संकल्पना चांगलीच चालली. त्यांनी ‘ग्रामदान निर्माण समिती’ या संस्थेची स्थापना केली आणि खादीसाठी जिथे जिथे प्रदर्शन असेल, तिथे त्यांनी हजेरी लावून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून खादीच्या उत्पादनांची विक्री केली. या संस्थेने तेलंगणातील काही गावांत काही लोकांना खादीपासून उत्पादन निर्मितीचे कौशल्य शिकवले. त्यांना सर्व यंत्रणा पुरवली. गावकऱ्यांना या माध्यमातून रोजगार मिळाला.

राव यांनी सर्वोदय ग्रामदान सहकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून तीन गावांत विकासकामे हाती घेतली होती. या गावात पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन, रस्त्यांचे बांधकाम, सामूहिक विहिरींची निर्मिती केली गेली. याचा मोठा फायदा स्थानिक गावकऱ्यांना झाला.

नशामुक्ती हे गांधींचे स्वप्न होते. गांधी हे अस्सल लोकशाहीवादी होते तरी ते एकदा म्हणाले होते की, “जर मी एका दिवसासाठी हुकूमशहा झालो, तर मी देशात संपूर्ण दारुबंदी करेन.” ग्रामीण भागात विशेषतः कष्टकरी जनतेमध्ये दारुचे व्यसन मोठ्या प्रमाणात होते. गांधीवादात एक महत्त्वाची बाब म्हणजे, समोरच्या माणसाचे परिवर्तन करणे. त्यासाठी हवं ते कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. राव यांनी ‘गांधीगिरी’ करत त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे ठरवले. त्यांनी लोकांना आवाहन केले आणि दहा हजार लोकांनी दारु सोडली.

१९९१ साली त्यांनी दिव्यांगांसाठी सर्वोदय चॅलेंज्ड चिल्ड्रन रेसिडेन्शियल स्कूल’ची स्थापना केली. या शाळेत दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले गेले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि कल्याण मंत्रालयाने त्यांना याकामी साहाय्य केले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हे अनुसूचित जाती आणि जमातीचे आहेत.

१९९३-९६ या काळात त्यांनी नागरकुर्नुल जिल्ह्यात त्यांने बुक बाईंडिंग आणि शिवणकामाचे प्रशिक्षण शिबीर घेतले. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींना रोजगार मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेत, ’जमनालाल बजाज संस्थे’ने त्यांना पुरस्कार देऊन, त्यांच्या कार्याचा गौरव केला. राव यांनी समाजकार्याच्या नावाखाली वह्यावाटप आणि कांबळेवाटप केले नाही, तर त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले आणि पूरक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे व्यक्तीचे दुसऱ्यावरचे जगण्यासाठीचे अवलंबित्व संपवले. भारतीय संविधानाने माणसाला फक्त जगण्याचा नव्हे, तर सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. राव यांनीही लोकांना स्वतःच्या पायावर उभे करून, सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. कुरुंदकर म्हणतात त्याप्रमाणे, राव यांनी जखमेला पट्टी बांधताना रोग्याला/गरजूला स्वाभिमानी मन आणि पंख दिले. म्हणून राव हे फक्त ज्येष्ठ नाही, तर श्रेष्ठ ‘गांधीवादी’ ठरतात. अशा श्रेष्ठ गांधीवाद्याच्या कार्याला सलाम.