सात्विक शिक्षणाचा वस्तुपाठ...
महा एमटीबी   24-May-2018 

 
परिश्रमपूर्वक शिक्षण देण्याचा वसा सांभाळला आहे नाशिकच्या शिक्षिका डॉ. आशाताई प्रभाकर कुलकर्णी यांनी. १३ मे रोजी त्यांच्या ‘मनाच्या गाभार्‍यात’ या कथासंग्रहाचे प्रकाशन समारंभपूर्वक झाले आणि त्यांच्या गुणांना उजाळा मिळाला.
 

मुलांना शिकविणे वाटते तितके सोपे नसते. चांगले संस्कार करून, त्यांना जीवनातील चांगुलपणाची जाणीव करून देणे आणि आपण कसे वागले म्हणजे आदर्श ठरू, याचा वस्तुपाठ घालून देणे म्हणजे खरे शिक्षण. ‘भारतीयत्व’ हा शिक्षणाचा आत्मा आहे. मात्र, हल्ली आपले पारंपरिक चांगले रीतीरिवाज आपण विसरत आहोत. यात शिक्षण क्षेत्राचादेखील मोठा वाटा आहेच. शिक्षणक्षेत्राबद्दल बरेच काही ऐकायला येत असते. त्यात अनेक बर्‍यावाईट गोष्टी असतात. म्हणजे बर्‍या कमी आणि वाईट जास्त असतात. मात्र, अशा वातावरणात सात्विकता टिकवून, परिश्रमपूर्वक शिक्षण देण्याचा वसा सांभाळला आहे नाशिकच्या शिक्षिका डॉ. आशाताई प्रभाकर कुलकर्णी यांनी. गेल्या रविवारी दि. १३ मे रोजी त्यांच्या ’मनाच्या गाभार्‍यात’ या कथासंग्रहाचे प्रकाशन समारंभपूर्वक झाले आणि त्यांच्या गुणांना उजाळा मिळाला.

 
‘मनाच्या गाभार्‍यात’ या पुस्तकात छोट्या कथा आहेत. त्यांना आशाताई ’कथुली’ असे म्हणतात. त्यांनी दिलेल्या या नावातंच मोठा गोडवा आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी प्रमुख पाहुण्या निलिमाताई पवार यांनी सुचविले की, “आशाताई यांनी यापुढे अशाच संस्कारक्षम कथा लिहाव्यात, त्याची गरज आहे.” वर्षाच्या ३६५ दिवसांच्या ३६५ कथा लिहाव्यात, असे त्यांनी सांगितले, तर प्रकाशिका स्नेहसुधा कुलकर्णी यांनीदेखील आशाताई यांनी अधिक परिश्रम घेऊन लघुकथा लिहाव्यात असे सुचविले आहे. चांगल्या लेखनाला चालना देण्यासाठी त्यांच्या या सूचना योग्यच आहेत. यावेळी काही ‘कथुली’चे वाचनदेखील नाशिकमधील पट्टीचे सूत्रसंचालक श्याम पाडेकर यांनी केले. त्यातील एका कथेत मुंग्यांचा संदर्भ येतो. एक मुंगी रस्ता चुकते. तेव्हा तिला अन्य मुंग्यांकडून सांगण्यात येते. आपण रांगेत जात असतो. माणसे मात्र रांगेने जात नाहीत. मुंग्यांनी माणसाचे अनुकरण केले तर वाट चुकेल. मुंगीसारख्या लहान कीटकापासूनदेखील शिकण्यासारखे बरेच काही असते, याचा पुनरुच्चार केलेला आहे. मात्र, तो आजच्या भाषेत आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाचा वापर करून, अशी गोष्ट अनेकांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे, हे लक्षात घेतले, तर लेखिकेला आजच्या काळाचे यथार्थ भान आहे, याचे दर्शन त्यातून घडते.
 

आशाताई यांचे बालपण रावळगावात गेले. त्यांचे वडील मु. गो. पाठक हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक. त्यांनी ज्ञानेश्वरीवर विपुल लेखन केले होते. सात्विकतेचा वारसा तेथूनच त्यांना मिळाला. मालेगावात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मराठी विषयात बी. ए. केल्यावर त्या पुण्यात आल्या. मराठीत एम. ए. आणि बी. एड. केल्यावर नाशिकच्या रवींद्रनाथ विद्यालयात शिक्षिका म्हणून जबाबदारी स्वीकारली. मुलांसाठी जे काही करता येईल ते सर्व त्यांनी केले आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून लौकिक संपादन केला. शिकविताना विविध कलांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून त्यांनी गीतलेखन, नाट्यलेखन, ललितलेखन केले. हस्तलिखिते आणि विविध प्रकल्प यांद्वारे त्यांनी मुलांना विकसित करतानाच स्वतःदेखील अनेक गोष्टीत प्रावीण्य मिळविले. उत्कृष्ट सूत्रसंचालन हेदेखील त्यांचे वैशिष्ट्य.

शिक्षिका म्हणून काम करताना संत साहित्यावर व्याख्याने, प्रवचने, आकाशवाणी वरुन विविध कार्यक्रम त्यांनी सादर केले. साने गुरुजी कथामाला समिती, एस. एस. सी. व्याख्यानमाला समिती, रोटरी क्लब समिती, राणी भवन कार्यसमिती यांतून त्या सातत्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना टीचर्स सोसायटीचा जिल्हा गुणवंत पुरस्कार, सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. ग. श्री. खैर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा शिक्षक गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.

शिक्षकाला पीएच. डी. मिळविणे सक्तीचे नसते, मात्र आशाताई यांनी हट्टाने पीएच. डी. केली. आपल्याला खूप शिकायचे आहे अशी त्यांची मनोभूमिका होती आणि लग्नापूर्वी पतीकडून त्यांनी आपल्याला खूप शिकू दिले जाईल, असे चक्क वदवून घेतले होते. त्यामुळेच संत साहित्यात पीएच. डी. करणार्‍या त्या जिल्ह्यातील पहिल्या शिक्षिका ठरल्या. मात्र, प्रमोशन किवा कॉलेजवर शिकविण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला नाही, तर आपल्या अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग शाळेतील मुलांना कसा होईल, याकडे लक्ष दिले. संशोधनपर लेखनाबरोबर त्यांनी ‘मनमित्र शब्द माझ्या अंतरीचे’ हे काव्यसंग्रह लिहिले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील पुस्तिकादेखील त्यांनी प्रकशित केली असून, विविध वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. आशाताई यांच्या या वाटचालीत आपले पती निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर दत्तात्रय कुलकर्णी यांचा फार मोठा वाटा आहे, हे त्या आवर्जून सांगतात.

आता त्या शाळेतून निवृत्त झाल्या असल्या, तरी लेखन, व्याख्याने या माध्यमांतून त्यांचे मुलांसाठी, समाजासाठी कार्य सुरूच असते. केवळ सुखवस्तू गृहिणी म्हणून शोभेची बाहुली न बनता, सक्रिय भूमिका बजावणार्‍या आशाताई यांचे कार्य कार्यरत असणार्‍या आणि भावी काळात काम करणार्‍या शिक्षक-शिक्षिकांना अनुकरणीय आहे.

 पद्माकर देशपांडे