दिवस दुसरा !
महा एमटीबी   24-May-2018

 
 
यद्धाच्या दुसर्‍या दिवशी युधिष्ठिराने आपल्या सैन्याची रचना क्रौंच व्यूहात करू, असे सुचविले. त्याप्रमाणे अर्जुन आणि धृष्टद्युम्न सेनेची मांडणी करू लागले. पक्ष्याच्या डोक्याकडे द्रुपद व त्याची सेना, डोळ्याच्या जागी राजा कुंतिभोज आणि चेदिराज तर मानेच्या ठिकाणी सात्यकी व त्याची सेना होती. शेपटीच्या टोकास युधिष्ठिर स्वत: राहिला. एका पंखाच्या दिशेला भीम त्याच्या सैन्यासह आणि दुसरी बाजू सेनापती धृष्टद्युम्न व त्याचे सैन्य यांनी सांभाळली होती. द्रौपदीचे पुत्र आणि सात्यकी याच्याकडे पंखांचे संरक्षण करण्याचे काम दिले होते. एकूणच व्यूह खूप अभेद्य असा असा रचला होता.
 
दुर्योधनाने पांडवांचा हा व्यूह पाहून, गुरु द्रोण आणि कृप यांच्याशी विचारविनिमय केला. तो म्हणाला, ”अभेद्य अशा क्रौंचव्यूहात पांडवांनी सैन्याची रचना केली असली, तरी आपले सैन्य अधिक बलवान आहे आणि तुमच्यासारखे महान योद्धे माझ्याकडे आहेत. तुम्ही पांडवांना एकहाती ठार करू शकता. या युद्धात मी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.” यावर द्रोणांनी त्याला आश्वासन दिले की, ”युद्ध जिंकण्याची पराकाष्ठा आम्ही करूच.” भीष्मांनी पण कौरव सैन्याची व्यूहरचना क्रौंच पक्ष्यात केली. डाव्या पंखाकडे भूरिश्रवा आणि शल्य होते तर उजव्या पंखाकडे सोमदत्त आणि काम्बोजराज होते. पक्ष्याच्या शेपटीकडील बाजूस अश्वत्थामा, कृप आणि कृतवर्मा होते.
 
आजचे युद्ध अधिक भीषण असे होते. युद्धभूमी रक्ताच्या पाटाने रंगीत झाली होती. सर्वत्र माणसे, घोडे आणि हत्ती यांचे मृतदेह विखुरले होते. आकाशात गिधाडे आणि कावळे घिरट्या घालून, सायंकाळ कधी होते याची वाट पाहात होते. भीष्मांवर भीम, अभिमन्यू, सात्यकी, कैकेय भाऊ, विराट, धृष्टद्युम्न हे सगळे एकवटून हल्ला चढवत होते. पण, कोणीही यशस्वी होताना दिसत नव्हते. ते त्यांना रोखूच शकत नव्हते. एखाद्या तुफानासारखे भीष्म पांडव सैन्यावर बाणाची बरसात करत होते. अतिशय वेगाने पांडव सैन्याचा विनाश होत होता. हे पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, “आमचे आजोबा आमच्या सैन्यावर अक्षरश: आग पाखडत आहेत, तेव्हा मला त्वरित त्यांच्यासमोर घेऊन जा. आजोबांना गुरु द्रोण, कृप, शल्य आणि दुर्योधनाचे बंधू मदत करत आहेत, तर आपल्याकडून फक्त द्रुपद उलट हल्ला करतो आहे. आपले सैन्य वाचवायचे असेल, तर मला भीष्मवध केलाच पाहिजे.” कृष्ण म्हणाला, “तुझे बरोबरच आहे, तू जितक्या लवकर भीष्मांना आवरशील तेवढे आपल्या सैनिकांसाठी चांगले!”
 
लगेच कृष्णाने अर्जुनाचा रथ भीष्मांच्या समोर आणून उभा केला. अर्जुनाला सामना देऊ शकतील असे तीनच वीर कौरवांकडे होते, ते म्हणजे भीष्म, द्रोण आणि राधेय! भीष्मांनी अर्जुनाला लक्ष्य केले. द्रोणही त्यांच्या मदतीला धावले. शिवाय दुर्योधन आणि जयद्रथ तिथे मदतीसाठी आले. विकर्ण पुढे आला. या सर्वांशी अर्जुन लढत होता. त्याने आपल्या बाणांनी भीष्म आणि द्रोण यांना जखमी केले. इतक्यात सात्यकी पण अर्जुनाच्या मदतीस पुढे आला. त्याच्या मागोमाग विराट, धृष्टद्युम्न, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू हे आले. द्रुपदपुत्रांनी द्रोणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. अर्जुन भीष्मांवर बाणांचा वर्षाव करत होता. त्याचे धनुष्य गोल वाकले होते. प्रत्येक बाण जणू विष ओकणारा साप होता! अगदी वेचून वेचून अर्जुन सैनिक टिपत होता. हे बघून दुर्योधनास कापरे भरले, तो भीष्मांकडे गेला व म्हणाला, ”कृष्णार्जुन जोडी अतिशय भयावह आहे. तुम्ही म्हणावी तशी शर्थ त्यांना ठार करण्यासाठी करीत का नाही आहात? तुम्ही आणि द्रोण इथे असताना असं होता कामा नये! तुम्हा दोघांनाही अर्जुन खूप प्रिय आहे. जर आज माझा राधेय इथे असता, तर किती छान झालं असतं! पण, तुम्हीच त्याचा अपमान करून ही वेळ आणली आहे, तुमच्यामुळे तो आज इथे नाही. अर्जुनाचा पाडाव तुम्ही कराल अशी मला आशा आहे!”
 
दुर्योधनाचे असे कठोर भाषण ऐकून, भीष्म एकदम दु:खी झाले. आपण क्षत्रिय म्हणून का जन्माला आलो असे त्यांना झाले! ते त्वेषाने अर्जुनावर चालून आले. एका तीक्ष्ण बाणाने त्यांनी कृष्णाला जखमी केले, तर अर्जुनाने पितामहांच्या सारथ्यास मारून टाकले. इतर ठिकाणचे युद्ध थांबवून, सारे हे युद्ध पाहण्यास जमले होते. अर्जुन व भीष्म दोघेही तुल्यबळ होते. कोणीच माघार घेत नव्हते! अर्जुनाने आतापर्यंत कौरवांच्या सेनेचा खूप संहार केला होता. हे पाहून दुर्योधन क्रोधायमान झाला, एकीकडे द्रोण आणि द्रुपद यांचे घमासान युद्ध सुरु होते. हे एकमेकांचे जुने कट्टर शत्रू! एकमेकांवर आग ओकत होते. धृष्टद्युम्न आपल्या पित्याच्या मदतीला समोर आला, हे पाहून द्रोणांनी त्याच्यावर भाला फेकला. पण, त्याने तो आपल्या बाणाने दूर केला आणि उलट द्रोणांवर भाला फेकला, त्यामुळे द्रोण खाली पडले. हे थरारक दृश्य पाहून सारे चकित झाले. द्रोणांनी कसेबसे स्वत:ला सावरले आणि धृष्टद्युम्नाला तोडीस तोड उत्तर दिले.
 
भीम धृष्टद्युम्नाच्या मदतीला आला, द्रोणांचे हाल पाहून, दुर्योधनाने कलिंगराजाला मदतीस पाठविले. कलिंगराज भीमाला भिडला, मदतीला केतुमान पण आला आणि कलिंगपुत्र शक्र पण मदतीसाठी आला. सर्व बाजूंनी भीम घेरला गेला. मोठ्ठी लढाई होऊन, भीमाने शक्राला ठार केले. आपला पुत्र ठार झाला हे पाहून कलिंग राजा चिडला. त्याच्या मदतीला भानुमान आला. भीमाने भानुमानालाही ठार केले! कलिंगाच्या बाजूला असलेल्या अनेक जणांचा भीमाने वध केला. सत्य आणि सत्यदेव पण ठार झाले! भीम रागीट पिसाळलेल्या हत्तीसारखा लढत होता. त्याने अनेकांचा धुव्वा उडवला. कलिंगराज पण जखमी होऊन त्याला मूर्च्छा आली. त्याच्या सैनिकांनी त्याला सुरक्षित जागी नेले.
 
भीमाच्या मदतीला शिखंडी सैनिक घेऊन आला. धृष्टद्युम्न पण त्याच्या बाजूला आला. सात्यकीही येऊन पोहोचला. ही त्रयी कलिंगाच्या सैन्याशी खूप लढली. खूप कोलाहल माजला, कारण या त्रयीने कैक सैनिक ठार केले. हे पाहून भीष्म वेगाने तिथे आले. भीष्मांनी एक भाला भीमाला फेकून मारला, तो त्याने शिताफीने चुकविला. सात्यकीने आपल्या बाणांनी भीष्मांच्या सारथ्याला ठार केले. त्यामुळे भीष्मांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. कलिंग राजाही धुमश्चक्रीत ठार झाला. सात्यकी भीमाजवळ येऊन म्हटले, ”आज तू राजा कलिंग, त्याचा पुत्र केतुमान, सत्य, सत्यदेव, त्यांचे सारे सैन्य आणि भानुमान यांना ठार केलेस! तू एक महान वीर आहेस!” सात्यकीने प्रेमाने भीमाला आलिंगन दिले.
 
भर दुपारची वेळ झाली होती. द्रुपद पुत्रांना अश्वत्थामा येऊन भिडला. त्याच्या मदतीला कृप आणि द्रोण आले. पांडवांकडून अभिमन्यू मदतीला आला. अभिमन्यू घमासान लढला. इकडे भीष्म आणि द्रोण पुन्हा अर्जुनाच्या समोर आले. भीष्म द्रोणांना म्हणाले, “आज अर्जुन हरणे अशक्यच आहे. तो क्रोधाने पेटला आहे. आपल्या सैन्याचा संहार करतो आहे. हाती त्रिशूळ असलेल्या शंकरासारखा तो दिसत आहे. मला त्याच्याशी लढणे सहक्या होणार नाही. आपल्या सैन्याने त्याचा धसकाच घेतला आहे आणि आता सूर्यही मावळत आला आहे. आपण सैन्य मागे घेऊ. सनी भ्यालेल्या अवस्थेत असताना लढणे योग्य नाही. उद्या ताजेतवाने होऊन हे अधिक चांगले लढतील. आता आपण थांबू.”
 
सूर्य मावळला आणि सर्व सैन्य आपापल्या तंबूत परतले. आज पांडवांची सरशी झाली होती, म्हणून तिकडे आनंदाचे वातावरण होते. आजचा वीरनायक भीम होता, त्याची सर्वांनी स्तुती केली. अर्जुनानेही अप्रतिम युद्धकौशल्य दाखविले होते, म्हणून तो पण स्तुतीस पात्र ठरला. सगळे कौरव मात्र आज निराशेच्या दरीत बुडाले होते. दुर्योधनाला आपला अंदाज चुकला आहे हे कळले होते. दोन दिवसांत विजय मिळेल, असे जे त्याला वाटत होते, ते दूर निघून गेले. पांडवांचा पडाव करणे सोपे नाही हे त्याला कळून चुकले.
 
 
 
- सुरेश कुळकर्णी