जीवाचा अखंड प्रवास
महा एमटीबी   24-May-2018

 
जीवन ही पाठशाळा आहे. प्रत्येक जीवाची प्रगतीनुसार इयत्ता असते. अगदी वर्गाच्या अभ्यासापासून प्रारंभ करुन, निरनिराळे विषय शिकत वरच्या वर्गात, महाविद्यालयात जातो, तसेच माणसाच्या जन्माचे असते. मागील जन्मामध्ये सोपं शिकल्यानंतरचे कठीण धडे शिकण्याची योजना विश्वामध्ये असते. उत्क्रांती, उन्नती ही एका जन्माचं फलित नसते. त्याची उत्तरोत्तर प्रगती ज्ञानप्राप्ती ही अनेक जन्माची प्रक्रिया असते. म्हणून प्रत्येक जीवानं शिवत्वाकडे जाण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणं गरजेचं असतं.
 
पूर्ण विश्व जाणून घेणं सोपं नाही. विश्‍वाची निर्मिती ज्या परमात्म्यानं केली, त्याच्या शक्तीचं आकलन करणं, अभ्यास करणं अवघड आहे. तो विश्‍वाची उत्पत्ती-स्थिती-लयाची अवस्था कौशल्यानं, निर्लेपपणानं कसा करतो ते समजून घेणं सहजसाध्य नाही. जीव या जन्मामध्ये कशी प्रगती करतो, त्यावरुन त्याची मागील जन्मामधील अवस्था लक्षात येऊ शकते. चालू जन्मामध्ये एखाद्याला लवकर ज्ञानप्राप्ती होते. म्हणजेच मागच्या जन्मामध्ये त्या जीवानं ज्ञानप्राप्तीसाठी भरपूर साधना केलेली असते, परंतु ज्ञानप्राप्तीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत तो पोहोचू शकलेला नसतो. त्याआधीच त्याला शरीर सोडून जावं लागतं.
 
सृष्टीमध्ये अशी व्यवस्था असते की, माणसाला देह टाकून, मृत्यूला सामोरं जावं लागतं. देह अनेक कारणानं सोडून द्यावा लागतो. भगवद्‍गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे. श्रीकृष्ण सांगतात ”अर्जुना!
 
 
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा।
तथा देहान्तरप्राप्ति: धीरस्तत्र न मुह्यति॥
(भगवद्‍गीता 2-13)
 
 
देहाला बालपण, तारुण्य आणि म्हातारणपण या जशा स्वाभाविक अवस्था आहेत ना, तशीच एक देह मरून, नवीन देह धारण करणे स्वाभाविक अवस्था आहे. “अर्जुना, तू घाबरु नकोस! प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे.”
भगवान श्रीकृष्ण सोप्या शब्दांत सांगतात,
 
वासांसि जीर्णानि यथा विहाय गृह्णाति नवानिः नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही॥
भगवद्‍गीता (12-22)
 
अर्थात, “अरे अर्जुना, मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेेले कपडे टाकून देतो आणि नवे वस्त्र- कपडे अंगावर घालतो ना, त्याप्रमाणे जीव जीर्ण झालेलं शरीर टाकून देऊन, नव्या शरीरात प्रवेश करतो. जीवाचा कपडे टाकून देऊन, नवीन वस्त्रं घालण्याचा प्रवास चालू असतो. दृश्य जगतामध्ये शरीर नष्ट होऊन, ते शरीर दिसेनासं होतं. त्यामुळे माणूस गेला म्हणून दुःख, शोक होतो. परंतु, जीव मनासह अदृश्यसृष्टीत अस्तित्वात असतात. देह शरीर आपण बघतो. बघू शकतो त्यामुळे शरीर नाहीसं झालं की, माणसाचा सहवास संपतो. एक जन्म संपून, दुसरा जन्म प्राप्त होतो. देह संपला तरी जीव संपत नाही.
 
भगवंत अर्जुनाला हे रहस्य गीतेमधून उलगडून दाखवितात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
 
न जायते म्रियते वा कदाचित्।
नायं भूत्वाभविता वा न भूयः।
अजो नित्य:शाश्‍वतोऽयं पुराणो।
न हन्यते हन्यमाने शरीरे॥
भगवद्‍गीता (2.20)
 
अर्थात, जीव जन्माच्या वेळी जन्मत नाही. मृत्यूच्या वेळी मरतही नाही. तो एकदा अस्तित्वात आला की, तो पुन्हा नाहीसा होत नाही. तो न जन्मणारा..नित्य.. शाश्‍वत व पुरातन काळापासून असाच आहे. शरीराचा वध झाला, तरी तो जीव मारला जात नाही.”
 
माणसाला एकदा ही गोष्ट आकलन झाली, की मृत्यूचं भयच संपून जातं. त्यामुळे तो निर्भय होतो. लौकिक जीवन शांतपणानं जगतो. परमार्थामधील गुह्यज्ञान प्राप्त करण्यासाठी साधना करतो. साधनामार्गात अडचणी आल्या, तरी तो त्यामधून मार्ग काढत मार्गक्रमण करत राहतो. आळसाचा त्याग करुन मनाच्या शुद्धीसाठी प्रयत्न करतो, कारण जीवाबरोबर वासना, मन नष्ट न होता पुढच्या जन्मात येतं. म्हणून जीवाचा प्रवास अनेक जन्म चालू असतो. प्रत्येक जन्मात तो जे शिकला ना त्यापुढील भाग पुढील जन्मात शिकतो, आत्मसात करतो. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रगतीचे टप्पे वेगवेगळे दिसून येतात.
 
एखादा जन्मत:च गायन कला घेऊन येतो व तो उत्कृष्ट गातो. त्याला ते ज्ञान व ती कला उपजतच असते. आपण त्याच्या गाण्यानं अचंबित होतो, परंतु त्याचंं गायनामधील शिक्षण आधीच्या जन्मातच झालेलं असतं. त्याला आपण ‘दैवी देणगी’ असं म्हणतो. एखाद्या लहान मुलाची गणितामध्ये अफाट प्रगती बघून, थक्क होऊन जातो. मोठमोठ्या आकड्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पटकन आणि मोजणी यंत्राचा वापर न करता, पटापट करतो. शिक्षणाशिवाय या गोष्टी येणं म्हणजे पूर्वजन्मीची कमाई असते. आपण अशी विलक्षण माणसं बघतो. काही जणांना आपल्या पूर्वजन्माचं स्मरण असतं, हा चमत्कार नसतो, तर तो पूर्वजन्मातील साधनेचा परिणाम असतो.
 
जीवन ही पाठशाळा आहे. प्रत्येक जीवाची प्रगतीनुसार इयत्ता असते. अगदी वर्गाच्या अभ्यासापासून प्रारंभ करुन, निरनिराळे विषय शिकत वरच्या वर्गात, महाविद्यालयात जातो, तसेच माणसाच्या जन्माचे असते. मागील जन्मामध्ये सोपं शिकल्यानंतरचे कठीण धडे शिकण्याची योजना विश्वामध्ये असते. उत्क्रांती, उन्नती ही एका जन्माचं फलित नसते. त्याची उत्तरोत्तर प्रगती ज्ञानप्राप्ती ही अनेक जन्माची प्रक्रिया असते. म्हणून प्रत्येक जीवानं शिवत्वाकडे जाण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणं गरजेचं असतं. उनाड विद्यार्थ्यांसारखं वेळ व्यर्थ न घालवता, वाचन, श्रवण, नामस्मरण करावं. लौकिकामधील मोह, लोभ दूर सारून, सात्विक वृत्तीचा सत्वगुणाचा अंगीकार करणं आवश्यक आहे. चांगली कर्म करण्यावर भर दिला की, त्याचे फळ चांगलेच प्राप्त होते. म्हणून सकल संतांनी साधना सत्कर्म करण्यावर भर दिलेला आहे.
 
मृत्यूचं भय संपून साधनेमध्ये जीवानं रममाण होण्यात त्याचं हित आहे. आयुष्याचा एकही क्षण वाया न घालवता, सुयोग्यपणानं व्यतीत करणं गरजेचं आहे. उपासना करुन, या जन्मातच जास्तीत जास्त परमार्थ साधून, घेण्यात जीवाचं कल्याण आहे. संधी साधणारे साधू असतात. या आशयानं प्रत्येकानं ‘साधू’ होऊन जावं!
 
 
- कौमुदी गोडबोले