रमजाननिमित्त मुस्लीम रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे मंत्रालयाची भेट
महा एमटीबी   23-May-2018


नवी दिल्ली : मुस्लीम समुदायासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात झाली असून रेल्वे विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व मुस्लीम कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रमजानमध्ये दिवसभर उपवास असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना रोजा सोडण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी म्हणून रेल्वे मंत्रालयाने सर्व मुस्लीम कर्मचाऱ्यांना दररोज वेळेअगोदरच सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने याविषयी एक अद्यादेश काढाल असून रमजान संपेपर्यंत मुस्लीम कर्मचाऱ्यांना आता लवकर आपल्या घरी जाता येणार आहे.

मंत्रालयाने या संबंधी एक सूचना पत्र जारी केले असून देशभरात या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. रमजानमध्ये मुस्लीम नागरिक हे दिवसभर उपवास करतात यानंतर त्यांच्या इफ्तारला सुरुवात होते. अशावेळी घरापासून दूर असलेल्या आणि आपल्या सेवेवर असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे त्यांना आपला उपवास सोडण्यासाठी देखील उशीर होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून मुस्लीम कर्मचाऱ्यांना रमजान संपेपर्यंत कामावर लवकर जाता येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.