राष्ट्राला अभिवादन करणारी शौर्य आणि विज्ञान पुरस्कारांची अखंडित परंपरा
महा एमटीबी   23-May-2018

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

 
 
सन १९३८ मध्ये मुंबईत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आदेश दिला होता की, ”राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत. राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफल क्लबात घुसा, सैन्यांच्या शिबिराकडे वळा...शिवरायाने युगधर्म ओळखून, सरस्वतीच्या रक्षणार्थ सरस्वतीकडे काही काळ पाठ फिरवून शुंभनिशुंभ मर्दिनीची उपासना केली. लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे. त्याप्रमाणे तुम्हीही लेखणी मोडून बंदूक हाती घ्यावी.”
 
आज त्यांची भविष्यवाणी किती सार्थ होती, याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत आहे. आज आपल्या देशाचे संरक्षण करणारे अनेक जवान धारातीर्थी पडत आहेत. अनेकजण शत्रूशी मुकाबला करत आहेत. दहशतवादाचा बिमोड करत आहेत, म्हणूनच आज आपण सुखाने झोपू शकतो. त्यांच्या शौर्याला सलाम करायलाच पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे सीमेवर पराक्रम गाजविणार्‍या एका सैनिकाचा शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करीत असतो.
 
दुसरा पुरस्कार विज्ञान. जन्मजात जातिभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातिभेदाचा उद्धार. हे विज्ञानाने सिद्ध केलेले स्वातंत्र्यवीर सावरकर स्वीकारल्याशिवाय समाज एकसंघ, बांधीव होणार नाही, परंतु आपणाला या बाबतीत फार मोठे अपयश आले आहे, हे मान्य करावेच लागेल. कारण राजकारण्यांना मतदार जपायचा असतो आणि आपण...
 
विज्ञान संपादनाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आग्रह होता. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आणि विज्ञान संपादनामुळे राष्ट्रीय भौतिक सामर्थ्य वाढते, हे सत्य आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान जगतात आपण लक्षणीय प्रगती केलेली आहे आणि रोजच्या रोज त्यात वाढच होताना दिसते. ही गोष्ट नाकारता येणार नाही. शेती, दुग्धव्यवसाय, अवकाश, उद्योग, आरोग्य, शिक्षण, प्रसारमाध्यम, अणु क्षेत्र, संगणक, भ्रमणध्वनी अशा अनेक क्षेत्रांत भारत प्रगतिपथावर आहे.
 
आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता, पण त्याचबरोबर थोडे वाईट वाटल्यावाचूनही राहिले नसते. कारण आजकाल आपण पाहतो, आपल्या भारतातील अनेक बुद्धिवान, संशोधक, विद्यार्थी परदेशात ज्ञान संपादन करायला जातात. पण आपल्या देशात परत येऊन त्याचा उपयोग भारतीयांसाठी किती करतात? नंतर परदेशात राहतात. पैसा कमावतात आणि कधीतरी गंमत म्हणून भारतात येऊन जातात. वास्तविक आपल्या भारतात परत येऊन समाजातील गैरसमज, भाबडेपणा अज्ञान नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का?
 
एक नक्की की, आपल्या भारतावर प्रेम असणार्‍या अनेक व्यक्ती परदेशातून विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या देशात परत येतात आणि आपले ज्ञान समाजासाठी देताना दिसतात. विज्ञानाचे व्यक्त स्वरूप म्हणजे यंत्र. ही यंत्र मानवाचे शत्रू नसून मित्र आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विज्ञाननिष्ठ विचारांना आता पाठिंबा मिळून त्यात भारत प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे.
 
या विज्ञानविषयक विचारांतून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दरवर्षी विज्ञानात लक्षणीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीचा सन्मान करत असते. आज शौर्य आणि विज्ञान पुरस्काराच्या परंपरेकडून पाहताना विचार केला तर १९८९ पासून शौर्य पुरस्कार देण्याची परंपरा सुरू झाली. त्यात सुभेदार बासिंग, साधना पवार, नीला सावंत, संतोष यादव, शिवाजी जगताप, शांतीस्वरूप राणा, माधवराव नाईक, बद्रीनाथ लुनावत, विक्रम बात्रा, मनोज कुमार पांडे, तरलोक सिंग, सज्जनसिंग मलिक, मनीष पितांबरे, तुकाराम ओंबळे, अजयसिंग, नवदीप सिंग, मनीष सिंग, डॅरिल कॅस्टेलिनो, निरजकुमार सिंह, मोहन नाथ, पांडुरंग गावडे यांचा समावेश आहे. काही मंडळींना आपल्या कार्यात शौर्य दाखवता दाखवता वीरमरण पत्करावे लागले तर काही जणांना अतुलनीय शौर्याबद्दल कार्यरत असतानाच पुरस्कार स्वीकारण्याचा मान मिळाला.
 
 
विज्ञान पुरस्काराचे वितरण २००५ पासून देण्यात येत असून विज्ञान क्षेत्रात डॉ. दीप्ती दि. देवबागकर, डॉ. गजानन गानू, डॉ. बी. बी. सिंग, डॉ. विजय भाटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. वसंत गोवारीकर, अनिल दातार, डॉ. अमोल गोखले, डॉ. रवींद्र हस्तक, व्यंकटेश व्ही. परळीकर, डॉ. सतीश कामत, जितेंद्र जाधव यांना हा मान मिळाला आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने यावर्षी शौर्य पुरस्कारासाठी भारतीय भूसेनेच्या गुरखा पलटणीत मोठ्या उत्साहाने दाखल झालेला कीर्तिचक्र विजेता हवालदार प्रेमबहादूर रेसमी मगर यांची (मरणोत्तर) निवड करण्यात आली आहे. प्रेमबहादूर रेसमी मगर यांनी जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील तंगधर या भागातून हल्ला करायला सुरुवात करून शत्रूंना नामोहरम केले. शत्रूंशी लढताना त्यांना शत्रूची गोळी लागून ते खाली कोसळले आणि त्यांना वीरमरण आले. त्यांनी दाखविलेले शौर्य, साहस अतुलनीय असेच होते.
 
भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य नाव असलेल्या डॉ. हीना गोखले विज्ञान पुरस्कारासाठी यंदाच्या मानकरी आहेत. पीट्सबर्ग विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर हैद्राबाद विद्यापीठात व्याख्याती म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांवर काम करीत नवी दिल्ली येथील डीआरडीओच्या मुख्यालयात संशोधकपदी त्यांची नियुक्ती झाली. आज डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या कुलगुरूपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. तिथे त्यांचे संशोधन, तांत्रिक कार्य, प्रशासन अशा अनेक पातळ्यांवर जोमाने काम सुरू आहे. अनेक संस्थांच्या त्या आजीवन सदस्य असून अनेक पुरस्कारांनी आजवर त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय संशोधन क्षेत्रासाठी मोलाचा सहभाग असणार्‍या व्यक्तीला सन्मानित करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानविषयक विचारांचे नक्कीच सार्थक झाले, असे म्हणावेसे वाटते. प्रज्ञावान, महाकवी, इतिहासाचे भाष्यकार, नाटककार, थोर समाजपरिवर्तन अशी अनेक रूपे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रखर राष्ट्रभक्तीसमवेत आपणाला आढळतात. पण विज्ञाननिष्ठ सावरकर हे त्यांचे रूप वैशिष्ट्यपूर्ण होते. राष्ट्र समर्थ, समृद्ध व्हावे, त्याचबरोबर ते सुरक्षित राहावे, ही त्यांची आंतरिक तळमळ होती आणि हे सर्व घडायला हवे असेल तर सैनिकी शिक्षण आवश्यक आहे, हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी मार्ग कोणता निवडायचा हे प्रत्येकाने ठरवावे, त्यासाठी शिवराय आठवावा, हा त्यांचा आग्रह होता.
 
आज २०१८ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार किती योग्य आहेत, त्याचा वस्तुपाठ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शौर्य आणि विज्ञान पुरस्कार देऊन घालीत आहे. ही गोष्ट स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. त्याचबरोबर यंदा स्मारकाच्या वतीने समाजसेवा पुरस्कार ’माय होम इंडिया’च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे सुनील देवधर यांनादेखील देण्यात येत आहे. हे एक वेगळेपणदेखील आहे.
 
 
 
 
 
- मंदाकिनी वासुदेव भट