तिरुपती मंदिराच्या संपत्तीवर अिंहदू डल्ला!
महा एमटीबी   22-May-2018

 
देशातील अनेक हिंदू मंदिरे जी भ्रष्टाचारी सरकारी अधिकार्‍यांच्या प्रशासनाखाली चालविली जात आहेत, त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराच्या घटना घडत आहेत. मंदिरांना मिळणार्‍या दानाच्या रकमेची कुठे विल्हेवाट लावली जातेय्‌ याचा मागमूसही लागत नाही. असाच प्रकार तिरुपतीच्या सुप्रसिद्ध तिरुमला मंदिरात उघडकीस आला. विशेष म्हणजे येथील मौल्यवान हिरा, ज्याची जगातील सर्वाधिक किमतीचा म्हणून गणना होते, त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या लिलावाविरुद्ध आवाज उठविणार्‍या पुजार्‍यालाच देवस्थानने आणि राज्यातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने बाहरेचा रस्ता दाखविला आहे.
 
 
तिरुपती बालाजी मंदिरातील भ्रष्टाचाराचा हा प्रकार उघडकीस आणणारे मुख्य पुजारी आहेत ए. व्ही. रामण्णा दीक्षितुलू. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तिरुपतीच्या बालाजीचा अतिशय दुर्मिळ हिरा आंतरराष्ट्रीय बाजारात लिलावासाठी आढळल्याची माहिती जगजाहीर केली. शेकडो वर्षांपूर्वीच्या भगवान तिरुपतींच्या दागिन्यांची लूट होत असून, तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राचीन दुर्मिळ वस्तूंना पाय फुटले असून, या सार्‍या प्रकारासाठी मंदिराचे प्रशासन आणि आंध्रप्रदेश सरकार जबाबदार असल्याचा आरोपही ए. व्ही. रामण्णा दीक्षितुलू यांनी केला.
 
 
विशेष म्हणजे महाराजा कृष्णदेवराय, म्हैसूरचे महाराज आणि पल्लव आणि चोल वंशाच्या राज्यकत्यार्र्ंनी मंदिराला मोठ्या प्रमाणात हिरे, जवाहिरे, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू दान दिल्या होत्या; त्या वस्तू आज कुठेच दिसत नाहीत, याबद्दल मुख्य पुजार्‍यांनी चिंता व्यक्त केली होती.
बातमी अशी पसरली की, देवस्थानचा अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ मौल्यवान हिरा जो हरवलेला होता, तो एका आंतरराष्ट्रीय लिलावात आढळला. सॉथबीज नावाच्या ब्रिटिश कंपनीचा मालक ब्रिटनचाच असून, या कंपनीचे मुख्यालय न्यू यॉर्कला आहे. त्या कंपनीच्या लिलावात हा हिरा जगभरातील खरेदीदारांचे लक्ष वेधून घेत होता. या हिर्‍याचे नाव ‘राज पिंक डायमंड’ असे असून, तो अतिशय मौल्यवान म्हणून गणला जातो. हा हिरा 37.3 कॅरटचा आहे. या हिर्‍याची कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री झाली असावी, असा मुख्य पुजारी दीक्षितुलू यांचा कयास आहे. तिरुपती देवस्थानाला दररोज कोट्यवधींच्या देणग्या मिळतात.
 
 
जगभरातून येणारे भाविक त्यांच्या मनोकामनांची पूर्ती झाल्याने येथे नतमस्तक होतात आणि कोट्यवधींचे गुप्तदानदेखील करतात. हे दान किमती वस्तुरूपात आणि रोखीच्या रूपातही राहते. म्हणूनच हे देवस्थान भारतातील सर्वात श्रीमंत म्हणून गणले जाते. म्हैसूरच्या महाराजाने तिरुपतीच्या बालाजीला प्लॅटिनमचा एक मौल्यवान कंठहार अर्पण केला. या कंठहाराला गुलाबी रंगाचा हिरा जडवलेला होता. 2001 साली, आयपीएस अधिकारी असलेल्या मुख्य निगराणी अधिकार्‍याच्या ही बाब ध्यानात आली. पण, ज्या वेळी याबाबत चौकशी केली गेली, तेव्हा भाविकांनी मूर्तीवर नाणी फेकल्यामुळे हा हिरा तुटल्याचे सांगितले. पण, सॉथबीज संग्रहालयातील एका दालनात हा हिरा लिलावात ठेवल्याचे आढळल्यानंतर, 2001 पासून गायब झालेल्या या हिर्‍याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सरकारी अधिकारी तिरुपती बालाजीला अर्पण करण्यात आलेल्या कंठहारातील हिरा तुटल्याचे सांगत असले, तर मग हा मौल्यवान हिरा संग्रहालयातील लिलावात पोहोचलाच कसा, असा प्रश्न आता मुख्य पुजारी करीत आहेत. हिर्‍याला पाय फुटण्याची कारणे त्यांना जाणून घ्यायची आहेत. यासाठी त्यांना या सार्‍या प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी हवी आहे, तशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तिरुपतीला मानणार्‍या भाविकांनीदेखील याविरुद्ध आवाज उठवावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि मंदिर प्रशासनातील व्यक्तींच्या सहभागाशिवाय हे प्रकार घडूच शकत नाही, हा त्यांचा दावा आहे. तिरुपती मंदिरात झालेल्या चोरी, लूट आणि गैरप्रकाराची भारतीय जनता पार्टीनेही दखल घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते अंजनेय रेड्‌डी यांनी या गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. यातील सर्वात दुःखदायक बाब म्हणजे लिलावाचा प्रकार उघडकीस येताच, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्य पुजार्‍यावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना तडकाफडकी सेवेतून मुक्त केले.
 
 
चंद्राबाबूंच्या या निर्णयावर सर्वदूर टीका सुरू झाली आहे. राज्यातील अनेक धार्मिक नेत्यांनी या निर्णयाविरोधात चंद्राबाबू सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. नुकतेच स्थापन झालेले तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळ आणि सरकारी अधिकारी, संगनमताने मंदिराच्या दैनंदित कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप मुख्य पुजार्‍यांनी चेन्नई येथे बातमीदारांशी बोलताना केला. सोळाव्या शतकातील विजयनगरचे राजे श्रीकृष्ण देवराय यांनी दिलेल्या दानातील दागिन्यांची किंमत 2 हजार कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. नवगठित तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट, तेलुगू देसम्‌चे नेते पुट्‌टा सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात काम करीत आहे. पुट्‌टा सुधाकर यादव हे, आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री यानामल्ला रामकृष्णडू यांचे नातेवाईक आहेत. दीक्षितुलू यांच्या मतानुसार, नवनियुक्त ट्रस्टी मंदिराच्या संपूर्ण कारभारावर नियंत्रण यावे यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे पुट्‌टा सुधाकर रेड्‌डी यांच्या, काही ख्रिस्ती संघटनांशी असलेल्या जवळिकीमुळे त्यांच्या नियुक्तीमुळे वादळ निर्माण झाले आहे. यापूर्वीही तिरुपती देवस्थानाच्या ट्रस्टवर ख्रिस्ती महिलेच्या नियुक्तीचे जोरकस प्रयत्न झाले आहेत. पण, भाविकांनी आणि आंध्रच्या जनतेने ते प्रयत्न उधळून लावले आहेत. ही खेळी सत्ताधारी तेलुगू देसम्‌ने ख्रिस्ती समुदायाला आमिष दाखविण्यासाठी खेळली होती. ज्या ख्रिस्ती महिलेची नियुक्ती मंदिराच्या ट्रस्टी म्हणून होणार होती, तिने नंतर, मी दलित असल्याने माझ्या नावाचा विरोध होत असल्याचा कांगावा केला. पण तिचे कारनामे, एका ख्रिस्ती वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे उघड झाले.
 
 
एकीकडे ती दलित असल्याचे सांगत असताना, या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या महिलेने मी कडवी ख्रिश्चन असून, मी माझ्या हातात नेहमी बायबल बाळगते, असे स्पष्ट केले. तिरुमला देवस्थानच्या प्रशासनात ख्रिस्ती व्यक्तींना घुसविण्याचा चंद्राबाबू नायडू सरकारचा हा काही पहिलाच प्रकार नाही. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार करून पाहिलेले आहेत. आजवर मंदिराचे शिस्तबद्ध सैनिक आणि मंदिराच्या विश्वस्ताची भूमिका प्रामाणिकपणे निभावलेले दीक्षितुलू आता प्रशासनासाठी आणि सरकारसाठी एकाएकी खलनायक झाले आहेत. आपल्या काळ्या कारनाम्याच्या आड येणार्‍यांना भुईसपाट करण्याची योजना प्रशासनाने आखली असून, त्यासाठी ट्रस्टींच्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करणार्‍यांचा सफाया केला जात आहे. दीक्षितुलू यांची गच्छंती हा त्याच धोरणाचा एक भाग आहे. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री के. ई. कृष्णमूर्ती यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणतात, दीक्षितुलू यांनी कारवाई आपणहून ओढवून घेतली आहे. त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडल्याने त्यांना मंदिरातील मूर्तीच्या पूजा-अर्चनेपासून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाया होणारे तिरुपतीचे एकमेव देवस्थान नाही. राज्यातील सर्वच हिंदू मंदिरांबाबत असे प्रकार घडत आहेत. मंदिरांच्या ट्रस्टवर कब्जा करून राज्याच्या मंत्री आणि भ्रष्टाचारी सरकारी अधिकार्‍यांनी मंदिराच्या संपत्तीची लयलूट चालविली आहे. मंदिरांचा पैसा, कुणालाही माहिती होणार नाही, अशांच्या नावावर वळविला जाऊ लागला आहे. आंध्रमधील अनेक प्राचीन मंदिरांतील दुर्मिळ दागदागिन्यांना वाट फुटली आहे. मंदिराला दिलेल्या देणग्या मदरसे आणि चर्चकडे वळत्या करण्यात येत आहेत. अल्पसंख्यक मतदारांना तेलुगू देसम्‌ पक्षाकडे वळविण्याचे हे कटकास्थान आहे. या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंदिरांना प्राप्त झालेल्या निधीपैकी 90 टक्के रक्कम मंदिरांच्या विकासावर खर्च न होता, इतरत्र वळविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सार्‍या प्रकाराबाबत आवाज उठविण्याची वेळ आलेली आहे...
 
चारुदत्त कहू
9922946774