सत्कार्यास्तव जीवन अपुले कामी यावे...
महा एमटीबी   22-May-2018
 
 
छत्रपती शिवबांच्या प्रेरणेने व्यक्तिकल्याण ते कुटुंबकल्याण, कुटुंबकल्याण ते समाजकल्याण आणि समाजकल्याण ते देशकल्याण या प्रेरणेने काम करणार्‍या सुनील वारे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
  
‘यू आर विनिंग द कॉम्पिटीशन’ हे पुस्तक २०१२ साली प्रकाशित झाले. पुस्तकाचा विषय अर्थातच होता, स्पर्धा परीक्षा त्याचसोबत आयुष्याच्या वळणावर येणार्‍या परीक्षांमध्ये निर्विवाद यश कसे मिळवायचे. ‘यू आर विनिंग द कॉम्पिटीशन’ने तुम्ही स्पर्धा परीक्षा जिंकत आहात असे म्हटले होते. किती हा विश्‍वास? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना इतका आत्मविश्‍वास देणारा हा लेखक कोण? तर या पुस्तकाचे लेखक आहेत सुनील बाबुराव वारे. मूळ गाव बिळाशी, तालुका बत्तीस शिराळ, जिल्हा सांगली. त्यांनी युपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली असून सरकारी सेवेमध्ये ते उच्चपदावर कार्यरत आहेत. अर्थात, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे आणि त्यानुसार सरकारी सेवेत रूजू असणारे सर्वच तसे अभिनंदनास पात्रच आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे हेही अभिनंदनीयच. पण, त्याही पलीकडे जाऊन, सुनील वारे यांचे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे विशेष अभिनंदनीय आहे, कारण, आजपर्यंत समाजावर असे आरोप होत असतात की, समाजातील व्यक्ती यशस्वी झाली की ती आपल्या पाठच्यांना विसरते. सुनील वारेंच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही.
 
बाबुराव वारे आणि सोनाबाई या धार्मिक प्रवृत्तीच्या पतिपत्नीला तीन मुले आणि दोन मुली त्यापैकीच एक सुनील. बाबुराव दोरखंड वळणे हा पारंपरिक व्यवसाय करायचे. म्हणजे अजूनही गावात ते हाच पारंपरिक व्यवसाय करतात. घरचे वातावरण वारकरी आणि समाजशील. सुनील यांचे बालपण गावातल्या चारचौघांसारखेच गेले. पण, याही परिस्थितीत त्यांच्या मनात समाजप्रेम आणि देशप्रेम यांची ज्योत तेवत होती. सुनील म्हणतात, ”याला कारण माझे गाव आहे. १९३० साली पारतंत्र्याच्या पार्श्‍वभूमीवर बिळाशी गावाने सत्याग्रह केला होता. सगळा गाव सत्याग्रहात सामील झाला होता. या गावासंबंधीची तपशीलवार माहिती यशवंतराव चव्हाणांच्या आत्मचरित्रामध्येही आलेली. आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर बिळाशी गावाचे वास्तव दर्जेदार आहे. या बिळाशी गावाचे आपण भूमिपुत्र आहोत. आपणही देशासाठी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना मनात निर्माण झाली.”
 
लहाणपणापासूनच आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असलेले सुनील जात्याच हुशार होते. शाळेतील स्कॉलरशीप परीक्षा, माध्यमिक शिक्षणातलं राष्ट्रीय प्रज्ञा शोधपरीक्षा यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य मिळालेच. शिवाय गावातले, समाजामधून ते पहिले इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. ’स्किल ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड’च्या राष्ट्रीय परीक्षेतही ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. सांगलीचा तरूण या सर्व परीक्षांमध्ये यश संपादित करत होता. तसे पाहिले तर कसल्याही सोयीसुविधा नाहीत, मार्गदर्शक नाहीत, फक्‍त मनात एकच आस की, आपण काही तरी केले पाहिजे. पुढे त्यांची एअरफोर्समध्येही निवड झाली होती. पण सुनील यांनी ती नोकरी स्वीकारली नाही. कारण, त्यांच्या मनात एकच होते की, समाजामध्ये मिसळता यावे. कमी वेळात समाजासाठी काहीतरी ठोस काम करता यावे. पुढे नोकरी करता करता युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी केली. अर्थात, मार्गदर्शन नव्हतेच. खूप प्रयत्नांनी आणि नकारात्मक परिस्थितीत युपीएससी परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. सुनील म्हणतात, ”त्यावेळी वाटले, प्रयत्न केले तर यश नक्‍कीच मिळते. अर्ध्यावर ध्येय सुटता कामा नये.”
 
मराठी, हिंदी, इंग्रजी याबरोबरच बांगला ओडिया, आसामी, संस्कृती, नेपाळी भाषा चांगल्या प्रकारे येणार्‍या सुनील वारेंनी त्यांनतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी युपीएससी उत्तीर्ण झालेल्या गुणवानांशी संपर्क साधला. त्यानंतर समाजातील अंत्यज असलेल्या घटकांतील तरुणांमध्येही स्पर्धा परीक्षेविषयी जाणीव निर्माण व्हावी, अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. होतकरू विद्यार्थ्यांनाही ते विशेष मदत करू लागले. नोकरी व्यतिरिक्‍त त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले की ’आहे रे’ गटाशी स्पर्धा नाही, पण ’नाही रे’ गटाला प्रेरणा आणि पथदिशा मिळवण्यासाठी विशेष काही तरी करायचे. समविचारी मित्रांच्या मदतीने सुनील त्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्या अनुषंगाने खेडोपाडी शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, त्यातही स्पर्धा परीक्षांविषयी सर्वतोपरी मदत करणे हे ध्येय त्यांनी निश्‍चित केले. आज सुनील कोणत्या ना कोणत्या वस्तीत, खेड्यात, वंचित घटकांमध्ये मिसळून गेलेले दिसतील. विषय एकच - समाजामध्ये जीवनाविषयी, समाजाविषयी, देशाविषयी प्रेम आणि प्रगतिपर आस्था, एकता निर्माण करणे. देशाविषयी बोलताना सुनीलच्या डोळ्यात श्रद्धेची चमक येते. ते म्हणतात, “कामाच्या निमित्ताने देशभर फिरलो. तेव्हा देशाच्या संस्कृतीची भव्यता अनुभवली. अशातच पत्नी आरती ही एसएनडीटी महाविद्यालयात प्राध्यापक असून समाजकार्यात नेहेमी अग्रेसर असते. त्यामुळे माझ्या विचारांना आणखी बळ लाभले.”
 
मूळचे सांगलीचे आणि आताचे मुंबईचे रहिवासी सुनील वारे यांचा जीवनप्रवास वेगळा आहे. त्यांचे दोन चिरंजीव केशव आणि रोहन हे संघशाखा चालवतात. जातीयतेचा तणाव, शहरी आणि ग्रामीण दरी सुनील वारेंनी अनुभवली असेल का? पण, सुनील याबाबत एकही शब्द बोलत नाहीत. स्मितहास्य करत आपल्या भावना व्यक्‍त करताना सुनील स्वरचित काव्यपंक्ती म्हणतात-
जनाजनाच्या मनामनांना
मनामनांनी सांगत जावे
सत्कार्यास्तव क्षणाक्षणांनी
जीवन अपुले कामी यावे...
 
 
 
 
 
 
 
- योगिता साळवी