दृष्टिकोन बदला
महा एमटीबी   21-May-2018


काही दिवसांनी शाळा सुरू होणार आहेत. तर काही विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. ती स्वाभाविकही आहे. पण याचाच लाभ अनेक विद्यालये घेतात. त्यामुळे पालकांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे अन्यथा पाल्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, असेच सध्या सर्वत्र चित्र आहे.


स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये यासाठी प्रत्येक माता - पिता काळजी घेत असतो. ही स्पर्धा जीवघेणी होत असल्याने बालकांचे बालपण हिरावून वयाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षापासून त्याला शाळेत जाण्याची सवय लावली जाते. मुलांचा बहुआयामी विकास व्हावा म्हणून तसेच स्वत:च्या ‘स्टेटस’ साठी नावाजलेल्या विद्यालयांमध्ये भलेमोठे डोनेशन देऊन आणि शुल्क भरुन मुलांचा प्रवेश घेतला जातो. अशा अनेक शाळांमध्ये शाळा या विद्येचे घर बनण्यापेक्षा अर्थार्जनाचे साधनच बनले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर वह्या - पुस्तके, गणवेश, अन्य शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच घेतले पाहिजे ही सक्ती रुढ झाली आहे. महागडी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करुन तसेच शाळेत भले मोठे शुल्क भरुन जर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर क्लासेस किंवा शिकवणी लावावी लागत असेल तर आपण स्वत:चे किती आर्थिक नुकसान तर करुन घेत आहोत याचा पालकांनी विचार करावा. शिवाय मुलांचे बालपणही हिरावून घेतले जात आहे. हे पालकांना समजतच नाही शाळा, त्यांनतर क्लास, अभ्यास, दप्तराचे ओझे, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, शाळेत राबविले जाणारे उपक्रम आणि त्यातून बालकांचे बालपण होरपळून निघत आहे.

या उलट अनेक सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांना बाहेर शिकवणी लावावी लागत नाही असे चित्र आहे. त्यामुळे नामांकित शाळांच्या शिक्षकांच्या पात्रतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. अशा विद्यालयांमधील शिक्षक वर्गात शिकवतात आणि बाहेर शिकवणीसुध्दा घेतात. दुर्देव असे की, लोकांना नामांकित शाळेत आपल्या पाल्यांसाठी शिक्षण हवे असते, तो शिकून मोठा झाला आणि शिक्षक झाला तर मात्र सरकारी शाळेतच नोकरी हवी असते.

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण होत असल्याने स्पर्धेमुळे अनेक सरकारी शाळा ‘हायटेक’ झाल्या आहेत. सेमी इंग्रजी आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत अनेक सरकारी शाळा पहावयास मिळतात. त्यामुळे नामंकित शाळांच्या मोहात न पडता जेथे मुलांना शिक्षणासाठी शाळेव्यतिरिक्त बाहेर शिकवणी लावावी लागणार नाही अशा शाळांना प्राधान्य द्यायला हवे. अन्यथा, शाळा आणि शिकवणी यातच हे कोमल जीव घुटमळत् राहतील. भविष्यात त्याचा ज्वालामुखी होऊन त्याचे पडसाद कुटुंबात पडल्या शिवाय राहणार नाही. कारण बालकांचे बालपण अप्रत्यक्षपणे आपण हिरावून घेत आहोत , ते त्यांना नक्कीच कळते.


- निलेश वाणी