अरविंद गोखले जन्मशताब्दी उरणमध्ये उत्साहात साजरी
महा एमटीबी   02-May-2018


रोपांचे वाटप किंवा वृक्षारोपण करून... तर आणखी कोणी आणखी काही प्रकारे...


पण मंत्रालयातून जॉईंट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यापासून नागाव-उरण येथे स्थायिक झालेल्या आणि तिथेही स्वस्थ न बसता स्थानिक आगरी भगिनींसाठी बचतगट, सामूहिक अथर्वशीर्षपठण-संघ असे विविध उपक्रम सातत्याने राबवित असलेल्या शैलजा दत्तात्रेय घरत यांनी आपला पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकताच अभिनव प्रकारे साजरा केला. साहित्यप्रेमी शैलजा घरत यांनी, उरणजवळच्या बोकडविरा या छोट्याशा गावातील समाजसेवक जयवंत पाटील यांनी आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून ग्रामपंचायतीला उभारून दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वाचनालयात कथाकार अरविंद गोखले यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा केला आणि सध्या अमेरिकेपासून अवघ्या बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गोखले जन्मशताब्दी सोहळा रायगड जिल्ह्यात प्रथम साजरा करण्याचा मान बोकडविरासारख्या छोट्या गावाला मिळवून दिला.

यावेळी बहुसंख्येने उपस्थित साहित्यप्रेमींचे स्वागत करताना जयवंत पाटील यांनी या वाचनालयात गावातील मुलांसाठी ई-लायब्ररी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सरपंच मानसी पाटील यांच्या हस्ते यावेळी समारंभाच्या अध्यक्षा शैलजा घरत, प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये आणि कथाकार अरविंद गोखले यांच्या सूनबाई रोहिणी आनंद गोखले यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


‘देशाचा संसार असो माझ्या शिरी, असे थोडे तुम्हा वाटू द्या हो. वाटावे तुम्हाला ऐसे काहीतरी, माझी आटापिटी याच्यासाठी...’ हे सेनापती बापटांचे वचन ऐकवून प्रमुख पाहुण्या नीला उपाध्ये यांनी प्रारंभीच, देणगीदात्या पाटील दाम्पत्याच्या समाजसेवेच्या तळमळीला मनापासून दाद दिली. ”आज सारे ’ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात जगत असतानाही, शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या कथाकार अरविंद गोखले यांचे पुण्यस्मरण आपल्याला करावेसे वाटते, कारण मराठी नवकथेच्या या प्रवर्तकाच्या कथा आजही आपल्याला जगण्याचे बळ देतात. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला जीवनाचा मूलाधार असूनही, अन्याय-शोषणाचे बळी बनावे लागते, याबद्दल अरविंद गोखले यांना खंत होती. म्हणूनच परमनप्रवेशाच्या सामर्थ्यामुळे ते ’मंजुळा’सारख्या स्त्रीवादी कथा उत्तम लिहून गेले. पण व्यापक समाजनिरीक्षण असलेल्या गोखल्यांचा जीवनदर्शनपटही खूप व्यापक असल्याचे त्यांच्या कथा वाचताना जाणवते,” असे ’कथाव्रती अरविंद गोखले’ ग्रंथाच्या लेखिका नीला उपाध्ये यांनी सांगितले.

अरविंद गोखले यांच्या सूनबाई रोहिणी गोखले यांनी यावेळी गोखले यांना 1945 साली ’नवकथाकारांतील बिनीचे शिलेदार’ म्हणून बिरुद मिळवून दिलेल्या ’कोकराची कथा’ या पळपुट्या सैनिकाच्या भेदरलेपणाचा कलात्मक वेध घेणार्‍या कथेचे नाट्यपूर्ण वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली.

अध्यक्षपदावरून बोलताना शैलजा घरत यांनी, “समाजसेवेचा वारसा आपल्याला रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणून सर्वमान्य असलेले आपले आजोबा कै. नारायण नागू पाटील यांच्याकडून मिळाला. कथाकार गोखले यांनी आपली धाकटी भगिनी नीला उपाध्ये हिला पत्रकार होण्याची प्रेरणा देऊन आमच्या घराशी जे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोडले, त्यामुळेच त्यांची जन्मशताब्दी रायगड जिल्ह्यातही साजरी करावीशी वाटली,” असे सांगून या कामी पुढाकार घेतल्याबद्दल जयवंत पाटील यांचे आभार मानले.

असा साजरा केला माझा वाढदिवस...


शैलजा दत्तात्रेय घरत यांनी आपला पंच्याहत्तरावा वाढदिवस नुकताच अभिनव प्रकारे साजरा केला. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “2001 ला शासन सेवा मानाने संपवून जेव्हा आम्ही नागावात राहायला आलो तेव्हा आध्यात्मिक माध्यमातून व बचतगटाच्या माध्यमातून येथील महिलांना एकत्र करून वेगळे सामाजिक कार्य अव्याहतपणे मी करू शकले, यास्तव माझ्या घरच्यांना व सर्व महिलांना धन्यवाद! आपल्या ठायी असलेले ज्ञान वाटून वाढेल, हे लक्षात घेऊन नेहमी कार्यरत राहिले.

कुठल्याही प्रकारची मदत न घेता माझ्या वेतनाचा उपयोग करून महिलांना काही उद्योग शिकवले. ओएनजीसीच्या महिलांनी काही प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली असता माजी नागाव सरपंच परीक्षित ठाकूर यांच्या सांगण्यावरून त्यांना प्रशिक्षित केले. त्या कामात अलका पाटील, वनिता ठाकूर, शमा ठाकूर, उषा म्हात्रे, मिता ठाकूर यांनी भाग घेतला. माझा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न करण्यात या महिलांचाही हातभार लागला. त्यापूर्वी ओएनजीसीने 2013 मध्ये ’जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करून माझा गौरव केला होता. आज त्या महिला उत्तम उद्योग करीत आहेत. मध्यंतरी भेंडखळच्या काही महिलांनी माझ्याकडे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू केले आहेत.

या महिन्यात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उरण नगरपालिकेच्या सुमारे सत्तर महिलांना प्रशिक्षण देऊन मी माझा वाढदिवस वेगळ्याप्रकारे साजरा केला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या बरोबर आहेतच.”