‘नासा’चा नवीन प्रयोग
महा एमटीबी   19-May-2018
 

 
मंगळ म्हटले की, दिसतो तांबड्या रंगाचा ग्रहगोल. त्यावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे अस्तित्व आहे का? त्याच्या भूगर्भात काय दडलेले असेल? अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्याचे काम खगोलशास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. भविष्यामध्ये मंगळावर दुसरं जग निर्माण होईल, असे भाकित नेहमीच केलं जातं. परंतु, सद्यस्थितीमध्ये जे काही प्रयत्न सुरू आहेत त्यावरून हे भाकित प्रत्यक्षात पूर्ण होणार की काय, असं वाटू लागलं आहे. अमेरिकन अंतराळ संस्था ’नासा’ मंगळ ग्रहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आणखी एक यश मिळविण्याच्या तयारीत आहे. ’नासा’ २०१० मध्ये मंगळ मोहिमेत अतिप्रगत रोव्हरसोबत छोटे हेलिकॉप्टर पाठविणार आहे. पृथ्वीवरील हवाई वाहन परग्रहावर पाठविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
 
हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर नेऊन ठेवल्यानंतर रोव्हरला सुरक्षित अंतरावर थांबण्याचे निर्देश मिळतील. बॅटर्‍या चार्ज झाल्यावर आणि चाचण्या घेतल्यानंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून स्वयंचलित हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या कमांड मिळतील. ३० दिवसांत हेलिकॉप्टरची पाच उड्डाणे होतील. ’मंगळ हेलिकॉप्टर’ असे त्याचे नाव असून त्याचे वजन केवळ चार पौंड म्हणजेच १.८ किलोग्रॅम असणार आहे. एखाद्या सॉफ्टबॉल इतका त्याचा छोटा आकार असेल. एखाद्या ड्रोनसारखे दिसणारे हे चॉपर मंगळावर जाऊन तेथील प्रतिमा घेईल. त्यांचा वैज्ञानिक अभ्यास करतील. जुलै २०२० मध्ये ’नासा’ हे हेलिकॉप्टर मंगळावर पाठविणार असून ते मंगळाच्या जमिनीवर फेब्रुवारी २०२१ मध्ये पोहोचेल, असा अंदाज सध्या वर्तविण्यात आला आहे. हेलिकॉप्टरचा आकार सॉफ्टबॉलइतका मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन टीमने चार वर्षांहून अधिक काळ त्यावर काम केलं आहे. या हेलिकॉप्टरचं वजन १.८ किलो आहे. मंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा १०० पट कमी गुरुत्वाकर्षण आहे. ’नासा’ने या हेलिकॉप्टरचं वर्णन ’वार्‍यापेक्षा अधिक जड एअरक्राफ्ट’ असं केलं आहे. या हेलिकॉप्टरच्या दोन पाती प्रति मिनिट तीन हजार वेळा फिरतील. पृथ्वीवरच्या एखाद्या सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा हा वेग दहा पटीने अधिक असणार आहे. मंगळासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करण्यासाठी ‘नासा’कडे २३० प्रस्ताव आले होते. त्यातील एक प्रस्ताव यांत्रिक माश्या पाठविण्याबाबतचा होता. अशा माश्या बनविण्यासाठी ‘नासा’ने संशोधकांना निधी दिला आहे. या यांत्रिक माश्यांना ‘रोबोटिक बीज’ असे नाव देण्यात आले आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ आहे. त्यामुळे या ग्रहावर उड्डाणासाठी या माश्यांचे पंख मोठ्या आकाराचे असतील. अमेरिकी व जपानी शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनातून यांत्रिक माश्या बनविल्या आहेत. त्यांच्या शरीरात सेन्सर, वायरलेस संपर्क आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत. मंगळावर भूप्रदेशाची मापे घेणे, खडक, माती आदींचे नमुने गोळा करणे, जीवसृष्टीचे अस्तित्व आढळल्यास त्याचे पुरावे गोळा करणे ही कामे या यांत्रिक माश्या करणार आहेत.
 
मंगळ ग्रहावरील एकूण वातावरणाबाबत ‘नासा’चे रोव्हर्सच्या माध्यमातून आधीपासून संशोधन सुरू असले, तरी ते धिम्या गतीने पुढे सरकते आहे. ‘नासा’ने २०१२ मध्ये ’क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळावर उतरविला आहे. हा आजवर फक्त ११.२ मैलच अंतर कापू शकला आहे. रोव्हरप्रमाणेच यांत्रिक माश्यांचेही मोबाइल बेसद्वारे रिचार्जिंग होणार आहे. आता मानवाला मंगळाची आस लागली आहे. जगातील अनेक वेगवेगळे देश मंगळावर आपली याने पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि भारतही यात मागे नाही. परंतु, भारताची ‘इस्रो’, अमेरिकेची ‘नासा’ किंवा युरोपमधील ‘इसा’ या सरकारी संस्था आहेत. पण, आता मात्र काही खाजगी कंपन्याही मंगळावर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
 
 
 
- सोनाली रासकर