कलारसिकांचा राजा...
महा एमटीबी   17-May-2018

 
नाशिकला एखादा नृत्य, नाट्य, साहित्यिक कार्यक्रम किंवा एखादे कला प्रदर्शन भरते, तेव्हा हमखास राजा पाटेकर यांची आठवण होते. त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाची ओळख करुन देणारा हा लेख...
 
नाशिकच्या कलाक्षेत्रात अनेक तपस्वी आपली कला वर्षानुवर्षे जोपासताना दिसतात.साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प, गायन, नृत्य आणि अनेक कलांची जोपासना करताना अनेक रसिक त्यांना साहाय्य करीत असतात. कलारसिकांना साहाय्य करताना, कलेचा आस्वाद घेणारा आणि त्यासाठी प्रसंगी पदरमोडदेखील करणारा राजा म्हणजे राजा पाटेकर होय.
 
राजा पाटेकर यांचा जन्म १९५५ मधील. अनेक खडतर अनुभवांना तोंड देत त्यांचे आयुष्य गेले. एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये काम केल्याने त्यांना सर्व क्षेत्रांची ओळख झाली. अनेक मान्यवर भेटले. त्यातील काहींशी स्नेहबंध जुळले. वसंत पोतदार नावाचा अवलिया नाशिकमध्ये वास्तव्यास होता, तेव्हा त्यांच्याशी राजाजी यांची जवळीक निर्माण झाली. स्वामी विवेकानंद यांच्यावरील कार्यक्रम आणि ’वंदे मातरम्’ कार्यक्रम यांच्यामुळे वसंत पोतदार लोकप्रिय झाले होते. पोतदार हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाची गाथा (पु. ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारित एकूण दहा हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत, ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले. वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुटलेखन केले. नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करताना साहजिकच राजा पाटेकरदेखील पोतदार यांना साहाय्य करू लागले. सांस्कृतिक जाण समृद्ध होण्यास त्यामुळे मदत झाली. नाशिकचे एक चित्रकार राजू खूळगे यांच्याशीदेखील राजा पाटेकर यांची मैत्री जमली. शंतनू गुणे आणि चारुदत्त कुलकर्णी या कला क्षेत्रातील सजग ज्येष्ठांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून राजा पाटेकर यांचा कला सेवेसाठी वेगळा अवलिया पिंड तयार झाला. त्याबद्दल या मान्यवरांचे ते नेहमीच आभार मानताना दिसतात.
 
आपण कलाकार नसून, कलाकरांची सेवा करणारे सेवक आहोत अशी त्यांची नम्र भूमिका आहे. त्यातून त्यांनी दहा वर्षांपूर्वी गंगापूर रोडवरील आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत ’हार्मनी आर्ट गॅलरी’ सुरु केली. कोणताही व्यावसायिक हेतू न बाळगता, नाशिकमध्ये छोटेखानी कलाप्रदर्शन भरविण्याची सोय करणे, हा एकमेव उद्देश त्यामागे होता. ते राहतात ती इमारत ते स्वतः धरून चार भावांची आहे. सर्वांनी एकमताने परवानगी दिल्याने हे शक्य झाले. नाशिकमधील आणि बाहेरच्यादेखील अनेक कलावंतांना त्यांनी तेथे स्थान दिले असून, शंभरवर प्रदर्शने तेथे भरली आहेत. नाशिकमधील बहुतेक सर्व कलाकार आणि प्रशासकीय आणि पोलीस अधिकार्‍यांनीदेखील या प्रदर्शनांना भेट दिली आहे. परवाच भरलेल्या ‘न्यूड’ चित्र प्रदर्शनाला नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी भेट दिली. त्याबरोबरच ’न्यूड’ चित्रपटाचे कलाकार देखील आवर्जून उपस्थित होते. अजूनही नाशिकमध्ये चांगल्या आर्ट गॅलरीची उणीव आहे. आपण मोठे प्रदर्शनाचे ठिकाण उभारण्यासाठी प्रयत्न केले का? असे विचारता ते म्हणतात की, ”आपण हौसेने हे काम करीत आहोत. मोठे स्थान तयार करायचे म्हणजे त्यात वेगळे हितसंबंध निर्माण होतात आणि मला ते नको आहे. ‘स्वान्त सुखाय’ असे हे कामच रुचते, असे त्यांनी स्पष्ट केले. कलेसाठी त्यांनी केलेले हे काम निश्चितच मोलाचे आहे.
 
आता त्यांनी आणखी एक नवीन छंद जोपासला आहे. नाशिकला होणार्‍या कोणत्याही कार्यक्रमाला जाऊन आपल्या उत्तम कॅमेर्‍याद्वारे त्याचे फोटो काढायचे आणि ते फेसबुकवर टाकायचे. यामुळे अनेक कलाकार त्यांनी जोडले आहेत. अनेकदा ही छायाचित्रे इतकी सुंदर असतात की, कोणत्याही व्यावसायिक छायाचित्रकाराने अशी छायाचित्रे काढून भरपूर कमाई केली असती. परंतु, राजाजींचे काम मात्र निरपेक्ष आहे. अनेकांनी त्यांना दाद दिली आहे. काहींनी त्यांचे पोस्टर बनविले आहे. त्यामुळेच अनेक कलाकार तर ते आपला फोटो केव्हा काढतील आणि फेसबुकवर कधी टाकतील याची जणू वाटच पाहत असतात. प. सा. नाट्य मंदिर असो किंवा कुसुमाग्रज स्मारक, तेथे कोणताही कार्यक्रम असला की तेथे राजाजी आढळतातच. त्यांना याची मनमुक्त दाद देखील मिळते. त्यांना अध्यात्माचीदेखील आवड असून ब्रह्मलीन पूज्य नारायणकाका ढेकणे महाराज यांचे ते शिष्य आहेत. कोणतीही अपेक्षा न बाळगता सेवाभावी पद्धतीने ते काम करतात यामागे ही शक्तीदेखील आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे नाशिकला एखादा नृत्य, नाट्य, साहित्यिक कार्यक्रम किंवा एखादे कला प्रदर्शन भरते, तेव्हा हमखास राजा पाटेकर यांची आठवण होते.
 
 
 
 
 
- पद्माकर देशपांडे