संत रामदास स्वामी आणि चमत्कार
महा एमटीबी   17-May-2018
 

 
संत आणि चमत्कारांचं नातं जवळचं आहे. प्रत्येक संताच्या नावावर काही ना काहीतरी चमत्कार सांगण्यात येतात, पण चमत्कार हे संतांचे व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. ख्रिस्ती धर्मात ‘संत’ पदवी मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर काही चमत्कार असावे लागतात. तसे हिंदू धर्मात नाही. आमच्या धर्मातील संत चमत्कार करीत नाहीत, तर त्यांच्याबाबतीत ते सहजरित्या घडत असतात. आमचे संत त्या चमत्कारांना महत्त्व देत नाहीत. रामदास स्वामींनीही चमत्कारांना महत्त्व दिले नाही, याउलट ‘जनस्वभाव गोसावी’ या त्यांनी लिहिलेल्या प्रकरणात चमत्कार करून दाखवणार्‍या भोंदू गुरुंचा भोंदूपणा त्यांनी उघड केला आहे. रामदास हे बुद्धिवादी संत होते. त्यामुळे चमत्कारांवर त्यांचा विश्‍वास नव्हता.
 
रामदासांच्या काळी निवृत्तीवादाचा पगडा महाराष्ट्रभर होता. निवृत्तीमार्गी आचार्यांनी गेली तीनशे वर्षे लोकांच्या मनात संसारविमुखता निर्माण करून ठेवली होती. ती संसारविमुखता भक्तिमार्गातही होती. हे तत्कालीन संतांच्या काही अभंगांवरून स्पष्ट होते. रामदासही भक्तिमार्गी संत होते. परंतु, देवाच्या भक्तीसाठी प्रपंचाची अवहेलना करणे रामदासांना मान्य नव्हते. ‘आधी प्रपंच करावा नेटका’ असेल त्यांनी सांगितले आहे. रामदास भक्तिमार्गी संत होते, हे त्यांच्या वाङ्मयातून सिद्ध करता येते. दासबोधाच्या सुरुवातीस त्यांनी स्पष्ट केले आहे की,
 
भक्तिचेन योगे देव ।
निश्‍चय पावती मानव ॥
ऐसा आहे अभिप्राय ।
इये ग्रंथी ॥ (दा. १.१.४)
तसेच मनाच्या श्‍लोकांतही त्यांनी सांगितले आहे की,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ (म. २)
 
तथापि हे सांगण्याचा काळ अजून आला नव्हता. नाशिकच्या मुक्कामातील त्यांचा काळ हा साधकदशेचा काळ होता. तो काळ स्थित्यंतराचा असल्याने रामदासांना कठीण जात होता. त्या काळात त्रयोदशाक्षरी मंत्रांचे पठण, गायत्री पुरश्‍चरण, राघवाची भक्ती, व्यापक, विविध ग्रंथांचे अध्ययन सारे चालू होते. आता तपश्‍चरणाचे तेज त्यांच्या ठिकाणी दिसू लागले होते. लवकरच त्यांच्या अध्यात्मशक्तीचा प्रत्यय आला.
 
नाशिकपासून जवळ असलेल्या गावी गिरिधर कुलकर्णी नावाचे एक सुशील, सत्शील गृहस्थ तरुण वयातच मृत्यू पावले. त्यांचा मृतदेह नाशिकला गंगेच्या काठावर अग्नी देण्यासाठी आणला होता. गिरिधरांची पत्नी तरुण वयातच पतीबरोबर सती जाण्यासाठी निघाली. तिचा मळवट भरलेला होता. मृतदेह गंगेकाठी ठेवल्यावर तिने आजूबाजूला पाहिले, तर तेथे थोड्या अंतरावर एक तपस्वी आपली नेहमीची ब्रह्मकर्मे करीत असल्याचे दिसले. तिने जाऊन रामदासांना नमस्कार केला. तथापि तिच्याकडे न पाहता रामदासांनी आशीर्वाद दिला, “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव”. ती स्त्री म्हणाली, “महाराज, हा आशीर्वाद पुढील जन्मासाठी समजायचा का? कारण, मी तर पतीबरोबर सती जाण्यासाठी निघाले आहे.” रामदास म्हणाले, “मी बोललो ती श्रीरामांची प्रेरणा होती. आपल्या पतीचा मृतदेह इकडे आणा.” तो पाहिल्यावर रामदासांनी प्रथम त्याला बांधलेल्या दोर्‍या सोडल्या. रामाचे नाव घेऊन त्यावर गंगोदक शिंपडले. तसे ते मृतदेह उठून बसले. गिरिधरपंतांना अकाली मृत्यू आला होता. त्यांचे गंडांतर टळले. समर्थांनी त्या बाईला आणखी दोन पुत्र होतील म्हणून आशीर्वाद दिला. असं म्हणतात की, त्यामुळे त्यांचे आडनाव ‘दशपुत्रे’ झाले. रामदासांच्या आशीर्वादाने झालेला पहिला पुत्र त्यांनी स्वामींना अर्पण केला. तोच समर्थशिष्य उद्धव होय. लोक नमस्कारासाठी धावू लागण्याअगोदर रामदास त्वरेने तेथून निघून गेले.
 
तीर्थाटनाहून परत आल्यावर त्यांनी रामरायाचे दर्शन घेतले व तीर्थयात्रेची सांगता केली. त्यांच्या मनात म्लेंच्छांच्या जाचातून या देशाला सोडवायचे होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती जाणून घ्यायचे ठरविले. नाशिकहून ते महाराष्ट्र जाणून घ्यायला बाहेर पडले. त्यावेळी त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ‘वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा’ या उक्तीप्रमाणे त्यांचे स्वरूप होते. अंगावर साधी भगवी वस्त्रे, पायात खडावा, खांद्यावर झोळी, एका हातात जपमाळ तर दुसर्‍या हातात एक गलोर होती. ते महाराष्ट्राचे लोकनिरीक्षण करीत फिरत होते. एक दिवस ते पैठणला पोहोचले. तेथे गोदावरी नदीच्या तीरावर काही ब्राह्मण मंडळी जमलेली होती. या नवख्या माणसाची त्यांनी चौकशी केली व येथून पुढे कुठे जाणार म्हणून विचारले. समर्थ म्हणाले, “आम्ही यात्रेकरू, यात्रेच्या निमित्ताने फिरत असतो. पैठणबद्दल बरेच ऐकले आहे. म्हणून इकडे आलो.” एका ब्राह्मणाने समर्थांच्या हातातील गलोर पाहिली व हे कशासाठी म्हणून विचारले. समर्थ म्हणाले, “ही गलोर आम्ही नेहमीच जवळ बाळगतो. थोडा नेमबाजीचा सराव आम्ही करीत असतो इतकेच. त्यात खास सांगण्यासारखे नाही.” ब्राह्मण म्हणाले, “मग ती आकाशात घार उडते आहे ना, तिला गलोरीने दगड मारून दाखव.” इतर ब्राह्मणांनी त्याला दुजोरा दिला. समर्थ म्हणाले, “जशी आपली आज्ञा.” त्यांनी एक दगड गलोरीला लावून आकाशात भिरकावला आणि तो त्या घारीला लागल्याने ती खाली जमिनीवर पडली. ब्राह्मण म्हणाले, “अरेरे! हे तू काय केलेस. आता तुला या पापाचे प्रायश्‍चित्त घ्यावे लागेल.” समर्थ म्हणाले, “हे पाहा, तुमच्या सांगण्यावरून मी तिला मारले. खरे दोषी तुम्ही आहात,” शेवटी भवती न भवती होऊन, समर्थ प्रायश्‍चित्त घ्यायला तयार झाले. ब्राह्मणांनी त्यांच्याकडून प्रायश्‍चित्त विधी करून घेतला. सर्व झाल्यावर समर्थ म्हणाले, “तुमच्या सांगण्याप्रमाणे मी प्रायश्‍चित्त घेतले. मग आता ती घार जिवंत झाली पाहिजे आणि ती घार जिवंत होत नसेल, तर या प्रायश्‍चित्ताचा उपयोग काय?” ब्राह्मण म्हणाले, “मेलेला प्राणी कधी जिवंत होतो का?” समर्थ त्या घारीजवळ गेले. तिला त्यांनी हातात उचलले. तिला कुरवाळले आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले, “जा, पूर्वी आकाशात उडत होतीस तशी येथून जा.” ती घार उडून गेली. ते पाहून सारे ब्राह्मण घाबरले. समर्थांना शरण गेले. समर्थांनी त्यांना उपदेश केला. “उगीच धार्मिक थोतांडाच्या नादी लागू नका. यापुढे आपले कर्म सारासार विवेक बाळगून करा. लोकांना खरे ज्ञान सांगा. ही भूमी एकनाथ महाराजांची आहे, याची सदैव आठवण ठेवा,”
 
समर्थ चरित्रकारांनी अशा अनेक अद्भुत कथा त्यांच्या चरित्रात समाविष्ट केल्या आहेत. तथापि ‘सकळ करणे जगदीशाचे’ हे जाणून, समर्थ कधीही त्यात लिप्त झाले नाहीत.
 
 
 
 
 
- सुरेश जाखडी