अलौकिक अनाहत नाद...
महा एमटीबी   17-May-2018
 

 
पंचमहाभूतांचा प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा आहे. आकाश तत्त्वाचा ‘शब्द’ हा धर्म आहे. ‘ॐ’ हा पहिला शब्द! ॐकारामधून अनेक शब्द तयार झाले ॐकारामधून येणारा नाद अंतर्मनापर्यंत पोहोचतो. त्याची कंपने... स्पंदने जाणवतात. त्यामध्ये शक्ती आहे. चैतन्याची अनुभूती या स्पंदनांमधून प्राप्त होते. निसर्गामधील प्रत्येक वस्तूला आवाज, नाद आहे. झाडांना, खडकांना, दगडांना आवाज आहे... सजीवाला आवाज आहे, यात कसले आश्‍चर्य? निर्जीवदेखील नादमय असतात...
 
उपासना... साधना करता करता साधकाला सुंदर सुंदर नाद ऐकायला येतात. सतारीची तार छेडली की त्यामधून नाद येतो, त्याचप्रमाणे बासरीमध्ये फुंकर घालून, नाद निर्माण होतो. कुठलाही आघात न होता, न करता जो नाद ऐकायला येतो, त्याला ‘अनाहत नाद’ म्हणतात. त्याला ‘दिव्य नाद’ किंवा ‘दिव्य संगीत’ असंही म्हणतात. इंद्रियांच्या पलीकडील अतींद्रिय आवाज. नाद...संगीत ऐकायला यायला लागलं की, साधक त्यामध्ये गुंग होऊन जातो. सूक्ष्म अनाहत नाद सूक्ष्म आहे, त्यामुळे सूक्ष्म देहात अनाहत नाद राहतो. तो कधीही थांबू नये असं वाटतं.
 
साधक, उपासक अनाहत नादामध्ये इतके गुंग होतात की लौकिक जग नको वाटतं. लौकिकाचं भान सुटतं. संत तुकाराम आपला आत्मानुभव कथन करतात-
 
अनुहाती गुंतलो नेणे बाह्यरंग,
वृत्ती येत मग बळ लागे॥
 
 
बाहेर जगतामध्ये काय घडत आहे, काय चाललं आहे, काहीही कळत नाही. भगवंताचं नामस्मरण जप करता करता त्यामधून दिव्य अनाहत नाद निर्माण होतो. या अनाहत नादाचे पुष्कळ प्रकार आहेत. आदी शंकराचार्यांनी या नादाचे बरेच स्वानुभव ग्रंथामध्ये नमूद केले आहेत. किंकिणी अनाहत नाद ! म्हणजे ज्यामध्ये घुंगरांचा छुमछुम छुमछुम आवाज येतो.
 
संत मीराबाई म्हणते, ‘पग घुंगरू बांध मीरा नाची रे’ या अनाहत नादाचे घुंगरू पायात बांधून, मीराबाई कृष्णनामात अखंड नाचत राहिली. शंखांचे नाद, घंटांचे नाद, बासरीचा नाद हे साधे, सामान्य नाद नसतात. शंख, घंटा, बासरी बाहेर कोठेही वाजत नसते, परंतु हृदयात, अंतरंगात मात्र याचे आपोआप अलौकिक नाद येत राहतात.
 
एकदा अनाहत नादानं नादावलं की माणूस तहान-भूक विसरुन जातो. शरीराचं...देहाचं बंधन निखळून पडतं. दिव्य संगीतमय साधना म्हणजे अमृतपान! आकंठ अमृत सेवन करायला मिळाल्यावरची तृप्ती काही वेगळीच! ज्या स्थानी संत, सत्पुरुष, सद्‍गुरुंनी तपश्चर्या केली असेल, त्या स्थानी विविध अनाहत नाद ऐकायला येतात. ज्याची जशी तरलावस्था असेल, तर त्याप्रमाणे हेे अलौकिक नाद एका मिनिटापासून ते पूर्ण दिवसभर ऐकायला येऊ शकतात. नादानं नादावलेले साधक, साधू भाग्यवान!
 
जीवनातील संकटं, दु:ख यांचा विसर पाडण्याची ताकद दिव्य नादामध्ये असते. मान, अपमान, यश, अपयश यांच्या पलीकडे नेऊन पोहोचविणारा हा अनाहत नाद! सद्‍गुरु, भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि नितांत, नितळ प्रेम यांमधून नादाची अनुभूती प्राप्त होते. भगवंतावर कामनारहित प्रेम करणं याला ‘शुद्ध भाव’ म्हणतात. या शुद्ध भावामुळे चित्ताची शुद्धी होऊन जाते. कामना, वासना छळत नाहीत. त्यामुळे कोणतीही साधना भगवंताच्या अलौकिक संगीतापर्यंत, नादापर्यंत जाते.
 
साधक हाताने कर्तव्य, कर्म करत असला, तरी तो स्वर्गीय नादाचा आनंद अनुभवत असतो. हे अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. ज्यानं-त्यानं अशा अनाहत नादाचा आनंद घ्यायचा असतो. या सगळ्या विविध, वैशिष्ट्यपूर्ण नादाला अन्य उपाधींची, साधनांची कणभरही गरज नसते. किणकिण, रुणझुण, मोहक, मंजुळ अशा नादामुळे मन नादावून जाते. अशा या अनाहत नादाची आत्मानुभूती साधकाच्या प्रतिभेतून साकारते.
 
कधी नुपूर रुणझुण
कधी वीणा झंकारण
कधी घंटांची किणकिण
कधी शंखाचे घुमणे
कधी भ्रमर गुंजणे
कधी ओंकार फिरणे
नाद अनाहत नाद
कानात...मनात
नादावले माझे मन
तुझ्यावरे साधनेत ॥
साधकाची, उपासकाची ही अनुभूती आगळीवेगळी आहे. त्याच्या पारमार्थिक प्रगतीची द्योतक आहे.
 
 
सातत्य, नियमितता यामुळे प्रगती होते. श्रद्धा, निष्ठा असली की संशयाला थारा मिळत नाही. नेम, नेमस्तपणा, नियमितता या तीन ‘न’ मुळे नकारात्मकता तोंड काळं करते. नाम, नामस्मरण, नामस्फुरण यामुळे मलीनता धुतली जाते. शुभ्रधवल शुद्धता येऊन, पृथ्वीवर राहूनदेखील अप्रतिम, अलौकिक, अनाहत नादाची अनुभूती अखंड येत राहते. याचं फलित म्हणजे संताप, ताप संपून, शांत शीतलतेची शिंपण होते. पारलौकिक परमानंदाची प्राप्ती होते. आपणही त्याची अनुभूती घ्यायला हवी नं?
 
 
 
 
 
 
 
- कौमुदी गोडबोले