कर्नाटकी जनमत
महा एमटीबी   16-May-2018
 
 
 
 
 
कर्नाटकात लोकांनी आपला कौल स्पष्टपणे भाजपला दिलेला असला तरी मागील निवडणुकीत नैतिकतेचे ढोल वाजविणार्‍या काँग्रेसने आता जे अनैतिक संबंध जोडण्याची कसरत चालविली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे.
कर्नाटकाच्या जनतेने आपला कौल सुस्पष्टपणे दिला असला तरी नैतिक विजयाचे ढोल बडविणार्‍या काँग्रेसने चालविलेल्या अनैतिक नातेसंबंधांच्या जोडणीमुळे सध्या कर्नाटकच्या जनतेसमोर आपला कौल देऊनही अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. कुमार स्वामींसारख्या सर्वात कमी जागा मिळविणार्‍या पक्षाला आज मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. प्रमोद महाजनांचे लोकसभेतले भाषण आठवायला लागावे, अशी स्थिती आज कर्नाटकात निर्माण झाली आहे. आपल्या चीनच्या संसदीय दलाच्या दौर्‍याचे त्यांनी कथन केले होते. अशाच प्रकारच्या जोडतोड राजकारणामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही त्यावेळी भाजपला सत्तेतून बाहेर राहायला लागले होते आणि आपल्या पक्षाचे एकमेव खासदार असलेले रमाकांत खलप कायदेमंत्री म्हणून या दौर्‍यात सहभागी झाले होते. यामागे अन्य कुणी नसून नैतिक विजयाचा ढोल बडविणारी काँग्रेस आहे. नैतिकतेचा आव किती खोटा आहे, हे काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच दाखवून दिले होते. यातील सर्वात मोठा धक्का हा लिंगायतांमध्ये फूट पाडून वेगळे धर्म थाटण्याचाच होता. निवडणुकीपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके तीन-चार लिंगायत धर्मगुरू पकडून सिद्धरामैय्यांनी जे खेळी केली होती, त्याची जबर शिक्षा त्यांना मिळाली. शेवटच्या टप्प्यात त्यांनी अखिल लिंगायत समाजाने आपली सगळी ताकद भारतीय जनता पक्षाच्या मागे लावली आणि धर्मद्रोहाचे हे राजकारण सपशेल झिडकारून लावले. मतांच्या लालसेपोटी अशाप्रकारे हीन राजकारण करण्याचे प्रयोग यापूर्वी महाराष्ट्रातही झाले होते. ‘शिवधर्मा’च्या नावाने मराठा तरुणांची माथी भडकविण्याचे उद्योग पवार आणि त्यांच्या पक्षातील मंडळींनी करून पाहिले होते. त्यांचा ‘कर्नाटक’ आधीच झाला होता. पण, त्यातून सिद्धरामैय्यांसारख्यांनी कोणताच बोध घेतला नव्हता. कर्नाटक निवडणूक तशी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. कर्नाटकचा कौल महत्त्वाचा मानला जातो. कारण, दरवेळी काही वेगळे निकाल देण्यासाठी कर्नाटक प्रसिद्ध आहे. प्रचंड मताने काँग्रेसला निवडून देणार्‍या मध्य कर्नाटकने यावेळी एका वेगळ्या प्रकारे भाजपची साथ दिली. याच भागाने कर्नाटकमधले सर्वाधिक मुख्यमंत्री दिले आहेत. हैद्राबादमधून कर्नाटकमध्ये विलीन झालेल्या लोकांचे शेती आणि जलसंधारण याबाबतचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. दुष्काळाचे निरनिराळे प्रश्‍न इथे आहेतच, पण तरीही लोकांनी काँग्रेससोबतच राहाणे पसंत केले आहे. यामागची कारणे निरनिराळी असू शकतील. त्यावर चर्चाही भरपूर होईल. मात्र, या निवडणुकीचे वास्तव काही निराळे आहे आणि ते समजून घ्यावे लागेल. जोपर्यंत ही निवडणूक ‘सिद्धरामैय्या विरुद्ध येडियुरप्पा’ अशी होती, तोपर्यंत ही निवडणूक कशी होईल याविषयी लोकांच्या मनात प्रश्‍न होते. मात्र, जसजशी ही निवडणूक नरेंद्र मोदींनी आपल्या ताब्यात घेतली तसतशी ती रंगून गेली. नंतरचा सारा मामला ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ असाच झाला होता आणि तो नेहमीप्रमाणे मोदींनीच जिंकला. एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे मोदी राहुल गांधींना त्यांच्या मैदानावर नेत गेले आणि राहुल गांधी त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याच्या सापळ्यात फसत गेले. राहुल गांधींच्या क्षमतेबाबत यापूर्वीही अनेक वेळा चर्चा झाली आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहिण्याची गरज नाही. मुळात हा मुद्दा राहुल गांधींचा नाही, तो घराणेशाहीच्या राजकारणाच्या अर्काचा आहे. एकाच घराण्याकडून आपल्याला उत्तम नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा ठेवून काँग्रेस आशा लावून बसली आहे. 
 
 
प्रत्येक वेळी मोदीच का जिंकतात, याचे विश्‍लेषण करायला कुणालाच वेळ नाही. कारण, आपल्याकडचे सगळेच निवडणूक विश्लेषक राहुल गांधींप्रमाणेच उपरे आणि विजय-परायजयाच्या आधी किंवा नंतर आलेले असतात. नरेंद्र मोदींचे तसे नाही. कर्नाटक निवडणुकीत त्यांनी कधी पोहोचायचे हे ठरले होते. त्यापूर्वी त्यांनी सर्वच व्यवस्था चोखपणे लावायला सुरुवात केली होती. कर्नाटकात कोणाकोणाकडे कुठल्या जबाबदार्‍या आहेत, याचे तपशीलवार वाटप झालेले होते. या उलट काँग्रेसकडून दिल्लीहून येणार्‍या मदतीवर सारी दारोमदार राहिली होती. आपल्या हुकूमाचे ताबेदार हवे म्हणून इंदिरा गांधींनी एक एक नेते खच्ची केले आणि हुजर्‍यांची फौज गोळा केली. आज काँग्रेसची स्थिती अशी झाली आहे की, अन्य कुठल्याही राज्यातून जनतेलाच काय, पण पक्ष कार्यकर्त्यांनाही उत्साह व प्रेरणा प्रदान करू शकेल, असा एकही नेता उरलेला नाही. याउलट मोदी व शाह यांची जोडी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फॉर्म्युला ठरलेला आहे.
 
 
‘आत्मकेंद्रित,’ ‘फेकू,’ ‘भाषणबाज’ अशी अनेक विशेषणे लावून मोदींना बदनाम करणारे बरेच लोक सध्या सोशल मीडियावर आहेत. मोदींबाबतचे दोन गुण जोपर्यंत ते सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना कुणालाही हरवता येणार नाही. दृढनिश्‍चय आणि त्यासाठी करावे लागणारे कष्ट, अशा या दोन गोष्टी आहेत. जोपर्यंत मोदी त्या करीत राहतील, तोपर्यंत गांधी परिवारातील कुणीही त्यांना मागे ओढू शकत नाही. राहुल गांधी कर्नाटकच्या लढाईत उतरल्यानंतर मोदींच्या नावाने शिमगा करणार्‍यांना केवढे उधाण आले होते. यापूर्वी गाडीवर कावळा बसला म्हणून अपशकुन मानणारे सिद्धरामैय्या याआधी कुणालाही माहीत नव्हते. गेल्या वर्षी केवळ या एका कारणामुळे सिद्धरामैय्या चर्चेत आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अशी काय जादू केली की, त्यांचे ट्विटही चर्चिले जाऊ लागले. अनेक उत्साही विचारवंतही जणू काही राहुल गांधी आणि सिद्धरामैय्या मोदींना संपविणार आहेत, याच निष्कर्षाप्रती पोहोचले होते. या सगळ्यांचाच आता भ्रमनिरास झाला आहे. कुमार केतकरांसारखे विद्वान आता रडीचा डाव कसा खेळला जाणार याची भाकिते वर्तवित आहेत. मोदींची खेळी संपली असून अमित शाह यांची खेळी आता सुरू होईल, अशी आशा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. एकंदरीतच कर्नाटकमधले पुढील काही दिवस नाट्यमय घटनांनी भरलेले असतील, यात शंका नाही.