शस्त्रबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या तासाभरातच भारतीय लष्करावर हल्ला
महा एमटीबी   16-May-2018


शोपिया : रमजान महिन्यामध्ये एकतर्फी शस्त्रबंदीची भारत सरकारने घोषणा केल्यानंतर अवघ्या एका तासामध्येच भारतीय लष्करावर हल्ला झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपिया येथे गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर काही अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला असून भारतीय लष्कर त्यांच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

शोपिया येथील एका बागेजवळ भारतीय लष्कर गस्त घालत असताना अचानक काही दहशतवाद्यांनी लष्कराला लक्ष करत गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भारतीय लष्कर देखील तत्काळ सावध झाले व हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान चकमक असून सुरु असून अधिक माहिती अजून समोर आलेली नाही.


दरम्यान गेल्या काही वेळापूर्वीच गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीवरून एकतर्फी शस्त्रबंदीला परवानगी दिली आहे. परंतु सुदैवाने गृह मंत्रालयाने शस्त्रबंदीबरोबरच भारतीय लष्कराला स्वरक्षणाचे मात्र सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला आपल्या रक्षणासाठी सर्व प्रकारचे शस्त्र वापरण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या अवघ्या काही वेळातच लष्करावर अशा प्रकारचा हल्ला होणे हा चिंतेचा विषय ठरला आहे.