भुसावळ सामाजिक विचार मंचाने रुग्णांसाठी दिलेला कुलर डॉक्टरांच्या कक्षात
महा एमटीबी   16-May-2018

 

 
भुसावळ, १६ मे :
भुसावळ नगरपालिकेच्या रुग्णालयात उष्माघात कक्षात कुलर नसल्याने भुसावळ सामाजिक विचार मंचाच्या सदस्यांनी रुग्णांसाठी भेट दिलेला कुलर डॉक्टरांच्या कक्षात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
 
भुसावळ सामाजिक विचार मंचने भुसावळ नगरपालिका दवाखान्यातील उष्माघात कक्षास गेल्यावर्षी २ एप्रिल रोजी कुलर भेट दिला होता. भुसावळसारख्या शहरात ४५ ते ४७ अंश तापमान असल्याने उष्माघाताने बळी पडणार्‍या रुग्णांचे प्रमाण मोठे असते. अशा रुग्णांना आराम मिळावा म्हणून हा कुलर देण्यात आला होता. परंतु मंचाचे सदस्य संदीप पाटील १६ मे रोजी अचानक रुग्णालयात गेले असता उष्माघात कक्षात रुग्ण होता परंतु या कक्षासाठी देण्यात आलेला कुलर तेथे नव्हे तर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दालनात आढळून आला. पाटील यांनी याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.
 
उष्माघात कक्षात रुग्ण कुलरपासून वंचित
शहरासह तालुक्यातील रुग्णांना सुविधा मिळावी म्हणून सामाजिक भावनेतून आम्ही कुलर रुग्णालयास भेट दिले. वर्षभरानंतर कुलरची स्थिती अशी आहे हे पाहण्यासाठी गेलो असता रूग्णांसाठीच्या कुलरचा उपयोग वैद्यकीय अधिकारी घेत असल्याचे दिसले. सामाजिक भान असलेल्या नागरिकांच्या भावनांचा असा अनादर होणे योग्य नाही.
- संदीप पाटील, सदस्य, भुसावळ सामाजिक विचार मंच