अनंत अमुचि ध्येयासक्ती, अनंत अन् आशा...
महा एमटीबी   16-May-2018
 
 
 
 
 
 
महिला रिक्षाचालक, टॅक्सीचालक अगदी अधूनमधून रस्त्यावर दिसतातही. त्यांचे आपल्याला साहजिकच कौतुकही वाटते. अशीच एक कौतुकास पात्र ठरलेली दिल्लीतील पहिली महिला उबरचालक शानू बेगम...
 
 
आपण कितीही जागतिकीकरणाचा, स्त्री-पुरुष समानतेचा आव आणला तरी कित्येकांना महिलांनी अजूनही पुरुषांच्या बरोबरीचे काम केलेले सहजासहजी रुचत नाही. त्यातही महिला जर पुरुषांपेक्षा तेच काम उत्तम पद्धतीने करत असतील, तर ती पुरुषी असूया अधिकच बळावते. वाहनचालकाचे कामही अगदी तसेच. हल्ली आपल्याला महिला सर्रास वाहने चालवताना दिसतातही. त्याचे फारसे अप्रूपही कोणाला वाटत नाह. पण, मग जेव्हा याच महिला पोटापाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी चालवताना दिसतात, तेव्हा त्यांच्याकडे जरा वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. दिल्लीच्या शानू बेगमच्या बाबतीतही असेच घडले. पण, आज हीच शानू बेगम दिल्लीतील पहिली महिला उबरचालक ठरली आहे परंतु, तिचा इथवरचा प्रवास हा नक्कीच सुकर नव्हता. अनेक वैयक्तिक आणि सामाजिक अडचणींचा डोंगर पार करत शानू बेगमने इथवर मजल मारली.
 
 
सुखी वैवाहिक जीवनाच्या अपेक्षांसह शानू बेगमचेही लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही आलबेल होते खरे, पण कालांतराने पतीच्या हिंस्र स्वभावामुळे शानूला रोजचं मरण अनुभवावं लागत होतं. तीन मुलं पदरी असतानाही पतीचा आक्रस्ताळेपणा काही थांबत नव्हता. एकदा हेच नवरा-बायकोचे भांडण पराकोटीला गेले आणि शानूच्या शौहरने चक्क स्वयंपाकघरातील वरवंट्याने तिच्यावर वार केला. शानू थोडक्यात बचावली आणि बचावात्मक पवित्र्यात तिने नवर्‍याच्या श्रीमुखात भडकावली. पण, भरपूर रक्तस्राव झाल्याने ती चक्कर येऊन खाली कोसळली. नंतर रुग्णालयात तिला कोणी दाखल केले, याचीही शुद्ध राहिली नाही. या घटनेनंतर तीन वर्षांनी शानूच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिचे अवघे आयुष्यच बदलून गेले. पण, अजिबात खचून न जाता, धीर सोडता शानूने तिच्यासाठी व तिच्या मुलींसाठी नव्याने जन्म घेतला.
 
 
आपल्या आयुष्यात शिक्षण न घेतल्यामुळे आपण पाठी राहिलो, ही खंत बोचणार्‍या शानूने आपल्या तीनही मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शानूच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, दुसरी मुलगी बी.ए.चा अभ्यास करते आहे, तर मुलगा अजूनही शालेय शिक्षण घेत आहे. आपल्या मुलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडणार्‍या या माऊलीनेही मग स्वतःही आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कारण, कुठलेही काम करायचे तर किमान दहावी उत्तीर्ण होण्याची अट ही असतेच. 
 
 
शानूने दहावाची परीक्षा कुठल्याही परिस्थितीत उत्तीर्ण होण्याचा निर्धार मनोमन पक्का केला. दोन वर्षं अहोरात्र अभ्यास करून अखेरीस शानूने आपले पहिले स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर वाहनचालक म्हणून परवान्यासाठी शानूने अर्ज केला. ‘सखा’ या दिल्लीतील फक्त महिलांसाठी असणार्‍या टॅक्सीसेवेमध्ये चालक म्हणून तिने नोकरी केली आणि त्यानंतर ‘उबर’च्या सेवेमध्ये रुजू होणारी शानू ही दिल्लीतील पहिली महिला चालक ठरली.
 
 
टॅक्सीचालक म्हणून आणि तेही दिल्लीसारख्या महिलांसाठी सुरक्षित नसलेल्या शहरात काम करताना शानूलाही अनेक बरे-वाईट अनुभव आले. शानूच्या म्हणण्यानुसार, अनेक पुरुष वाहनचालकांना उगाच महिला वाहनचालकांना कमी लेखण्यासाठी आपली वाहने दुप्पट वेगाने दामटवणे, ओव्हरटेक करणे प्रचंड आवडते. त्यासाठी प्रसंगी वाहन चालवितानाचे अनेक नियमही डावलून पुरुष वाहनचालक अरेरावी करताना दिसतात. हे सगळे का, तर केवळ महिला वाहनचालकांना कमी लेखण्यासाठी आणि त्यांना दाखवून देण्यासाठी की, आम्ही तुमच्यापेक्षा कित्येक पटीने चांगली वाहने चालवू शकतो. अशा पुरुषी मानसिकतेला सामोरे जाण्याबरोबरच त्यांच्या चाळवलेल्या नजरांचाही शानूला सामना करावा लागला. पण, घाबरून जाऊन ती कधीही मागे हटली नाही. उलट तिचे महिलांना एकच सांगणे असते की, “अजिबात हार मानू नका. परिस्थितीशी झगडत राहा. परिस्थितीला सामोरे जा आणि विजयी व्हा.”
 
 
तेव्हा, केवळ एक महिला म्हणून अमुक एक नोकरीधंदा त्यांनी करूच नये, अशी मानसिकता महिलांसह पुरुषांनीही बाळगता कामा नये. कारण, हल्ली कुठलेही काम आणि करणारी व्यक्ती ही लहान-मोठी किंवा स्त्री-पुरुष या वर्गात मोडणे, हे संकुतिचपणाचे लक्षण ठरेल. त्यामुळे शानूसारखे महिलांनी धीर न सोडता, बिकट प्रसंगांवर मात करत आपले ध्येय, आपले उद्दिष्ट गाठलेच पाहिजे. कारण, केवळ महिला सक्षमीकरणाच्या गप्पा न मारता, त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करणे तसेच शानूसारख्या महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.  
 
 
-विजय कुलकर्णी