आमचा राज्यपालांवर पूर्ण विश्वास : कॉंग्रेस
महा एमटीबी   16-May-2018


बेंगळूरु : निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापण्यासाठी म्हणून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय नाट्यमध्ये आमचा राज्यपालांवर पूर्ण विश्वास असून ते संविधानानुसारच योग्य तो निर्णय घेतली, अशी प्रतिक्रिया कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसने दिली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांनी दिली आहे.

निवडणूक निकालानंतर आज दुसऱ्यादिवशी कॉंग्रेस आणि जनता दल (एस) च्या नेत्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल वाला यांची भेट घेतली. या भेटीमध्ये वाला यांनी आपण संविधानाच्या मर्यादेमध्ये राहूनच काम करत असून त्यानुसारच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे कॉंग्रेसने बैठकीनंतर सांगितले. तसेच राज्यपालांनी दिलेल्या आश्वासनावर आमचा पूर्ण विश्वास असून राज्यात जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षाचीच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आजच्या दुसऱ्यादिवशी देखील राज्यात नेमकी सत्ता कोण स्थापन करणार ? हे अजून स्पष्ट झालेले नाही. भारतीय जनता पक्षाने १०४ आमदारांच्या बळावर आपण सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास प्रकट केलेला आहे. तर कॉंग्रेस आणि जेडीएसकडे बहुमत असून देखील त्यांचा दावा अजून मान्य करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्याची सत्ता दोन्ही पक्षांकडे झोपाळ्यासारखी झुलत आहे. दरम्यान भाजपकडून फोडाफोडीचे राजकरण केले जात असल्याचे आरोप देखील विरोधकांकडून केले जात आहेत. त्यामुळे सध्या कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना पक्षाने बेंगळूरूमधील एका हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सर्वानांच लागली आहे.