रमजानमध्ये एकतर्फी शस्त्रबंदीला केंद्राची परवानगी
महा एमटीबी   16-May-2018

लष्कराने स्वतःहून कसलीही मोहिमा न राबवण्याचे आदेशनवी दिल्ली : रमजान महिन्यामध्ये भारतीय लष्कराकडून शस्त्रसंधी पाळण्याच्या जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची मागणी केंद्र सरकारने आज मान्य केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी भारतीय लष्कराला देखील आदेश दिले असून रमजान महिन्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कसल्याही प्रकारची दहशतवादी विरोधी मोहीम राबवू नये, असे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच याविषयी माहिती दिली असून रमजान महिन्यामध्ये खोऱ्यात शांतता नांदावी तसेच नागरिक आणि लष्करामध्ये सहकार्य वाढावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच लष्कराला कोणतीही मोहीम काढण्यास जरी मज्जाव असला तरी लष्करावर कोणी हल्ला केल्यास त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या अधिकार मात्र भारतीय लष्कराला देण्यात आलेला आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे. भारतीय लष्करावर रमजान महिन्यात कोणीही आणि कसल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला हल्ल्याला सशस्त्र विरोध करण्याचा पूर्ण अधिकार लष्कराला देण्यात आलेला आहे. तासेच कोणाचे प्राण संकट असतील, तर त्यावेळी देखील लष्कराला आपले शस्त्र वापरण्याचे पूर्ण अधिकार असतील, असे देखील मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.


गेल्या आठवड्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील सर्व स्थानिक पक्षांनी मुफ्ती यांच्यासह झालेल्या सव पक्षीय बैठकीमध्ये यासंबंधी एक प्रस्ताव मांडला होता. यामध्ये रमजान महिन्यामध्ये भारताने एकतर्फी शस्त्रसंधी पाळावी, अशी मागणी सर्व पक्षांनी केली होती. परंतु राज्यातील भाजप पक्षाने मात्र ही मागणी अमान्य करत, लष्कर कसल्याही प्रकारची शस्त्रसंधी पळणार नसल्याचे म्हटले होते. यावरून राज्यात एक नवा राजकीय वाद सुरु झाला होता.