कर्नाटकचा विजय असामान्य आणि अद्वितीय : पंतप्रधान मोदी
महा एमटीबी   15-May-2018

 
 

नवी दिल्ली :
'कर्नाटकचा विजय हा असामान्य आणि अद्वितीय असा असून या विजयामुळे भारतीय जनता पक्षाची एक हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय पक्ष असल्याची ओळख कर्नाटकी जनतेनी पूर्णपणे पुसून टाकली आहे' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे. कर्नाटक निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान आणि पक्षाचे इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते.


भाजपला एका विशिष्ट मर्यादेत आणि विचारधारेमध्ये बांधू पाहणाऱ्यांना कर्नाटकाच्या जनतेनी खूप मोठी चपराक या निवडणुकांच्या निमित्ताने दिलेली आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून काही पक्षांनी देशाच्या आणि संविधानाच्या मुळ तत्त्वांवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतात वाद लावणे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु कर्नाटकी जनतेनी या सर्व कृत्यांचे उत्तर या सर्वांना दिले असून भाजपचा हा विजय कर्नाटकी जनतेच्या आणि तेथे काम करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

प.बंगालमध्ये लोकशाहीची हत्या

आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील स्थितीचा देखील आढावा घेतला. पश्चिम बंगालमध्ये काल निवडणुकीतील हिंसाचारावर चिंता व्यक्त करत, प. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. प.बंगालमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत सर्वत्र हिंसाचार करण्यात आला परंतु वर कोणीही कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत बिनविरोध विजयी होण्यासाठी म्हणून प.बंगालच्या भूमीवर निर्दोष नागरिकांचे रक्त सांडले जात आहेत, त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेने याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 
कॉंग्रेस मुक्त कर्नाटकसाठी जनतेनी मनापासून प्रयत्न : शाह

पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील याविजयासाठी आपल्या कार्यकर्त्यांचे आणि कर्नाटकी जनतेचे कौतुक करत, कॉंग्रेस मुक्त कर्नाटकासाठी जनतेनी अत्यंत मनापासून काम केले असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये काँग्रेसने यंदाच्या या निवडणुकीमध्ये सर्वव अनैतिक मार्गानाचा वापर करत, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्नाटकाच्या जनतेनी कॉंग्रेसच्या या वृत्तला जोरदार चपराक देत, कर्नाटकाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सामान्य जनता आता भाजपसोबत असून पक्षाचा विजयरथ आता कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिपादन शाह यांनी यावेळी केले.


अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेरकार आज जाहीर झाले. निवडणुकांच्या एकूण निकालावरून भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक १०४ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर भाजप पाठोपाठ कॉंग्रेस पक्ष हा ७८ जागांसह दुसऱ्या देवीगौडाचा जनता दल (एस) हा ३८ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान कॉंग्रेसने जनता दलाला सत्ता स्थापणेसाठी आपला पाठींबा दिला आहे. परंतु भाजपने कॉंग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापण्याच्या दाव्या अगोदर राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे कर्नाटकात नेमकी कोणाची सत्ता येणार हे मात्र असून तळ्यात-मळ्यात आहे.