जीवन सुंदर आहे...
महा एमटीबी   15-May-2018
 
 
 
 
 
 
हिमांशू रॉय या अत्यंत सक्षम पोलीस अधिकार्‍याने आत्महत्या केल्याचे बातम्यांत आले आणि मनात चर्र झाले. आयुष्यात येताना आपण आपल्या जन्मानंतर काय काय घडेल याची कल्पना करु शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या ते कुणालाही शक्य नाही. आपण या जगात जन्माला येणारे जीव. खरे तर जैविक निर्मितीतून येतो. पण, येण्याआधी खरेतर कुणाला कल्पना नसते की, आपण या जगात कसे, कोणाकडे व कुठे येणार आहोत. आपल्या या जगात येण्याचा उद्देश काय हे, ही आपल्याला नंतर खूप वर्षांनी कळले तर कळते, नाहीतर तसेही आपण जीवनाच्या प्रवाहात त्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. त्यावेळी त्या प्रवाहाची दिशा किंवा फोर्स काहीच आपल्याला आटोक्यात ठेवता येत नाही. प्रवाहाचा वेग आवेग आपल्याला कळत नाही. कधी कधी आपण वाहात जायची प्रक्रिया कुठे सुरु केली व आपण कुठे पोहोचणार आहोत, याची जाणीव आपल्याला नसते. पण, आपण जगायला का हवे, हा प्रश्न मात्र उत्तर मिळवायचा प्रयत्न केला नाही तर सोपाही आहे.
 
 
आपण भूतलावर प्रवेश मिळवला तेव्हाच खरेतर काही मिळविले आहे याची जाणीव मनाला उभारी देणारी आहे. मुळात आपल्याला अस्तित्व असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे.कारण, अस्तित्वाबरोबर आपल्याला एक खूप मोठी गोष्ट पुन्हा पुन्हा मिळत राहते, ती म्हणजे संधी. काहीतरी मिळविण्याची संधी, काहीतरी करायची संधी, नवनिर्मितीची संधी, विधायकतेची संधी, विकासाची संधी. या संधीत असणारी सुखाची कल्पना खूप सुंदर आहे. कारण, या संधीबरोबर मिळणारी जगण्याची प्रेरणा एक असीम ऊर्जा आहे. ती वाढत जाते व त्या ऊर्जेला कोणी रोखू शकत नाही.
 
 
तर आपल्याला या जगात का जगायला हवं, याची अनेक कारणं आहेत. आपल्या मनासारख्या गोष्टी घडतातच असे नाही. आपली सगळी स्वप्ने साकार होतीलच, असेही नाही. अनेकदा यशापेक्षा अपयश पचवायची वेळ आपल्यावर येते. पण, तरीही जगायची वाट आपल्याला पुढे जायला शिकवते. आपण का जगायला उत्सुक आहोत? आपण मृत्यूच्या कल्पनेने अर्धमेले का होतो? कारण आपल्याकडे जगण्यातला आनंद मिळण्यासाठी खूप कारणे आहेत. आपण आनंदाने जगतो, कारण आपल्याला आवडणारी मंडळी आपल्याभोवती आहेत. शिवाय आपल्यावर प्रेम करणारी मित्रमंडळीही आपल्याभोवती आहेत. या लोकांपासून दूर जाऊन, लुप्त व्हायची कल्पनासुद्धा मन घायाळ करते. म्हणजे आपल्याला ती मंडळी हवी असतात आणि आपणही त्यांना हवे असतो, ही भावनाच या पृथ्वीतलावर सुखदायी वाटते.
 
 
आपण जगतो याच्यामागचं एक सुंदर कारण आहे, ते म्हणजे आयुष्य सुंदर होऊ शकतं ही सुप्त इच्छा. आजचा दिवस किती वाईट का असेना, पण उद्याची सकाळ सूर्यप्रकाश घेऊन येणारच, ही आशा आपल्याला जगायला प्रवृत्त करते. पुढच्या क्षणाला, उद्याला किंवा भविष्यात काय घडणार हे पाहायची इच्छा आपल्या सगळ्यांच्या मनात जगत असते; तेव्हा जीवनाबद्दलची आपली ओढ वाढते.
 
 
आयुष्य ही तशी एक शाळाच आहे. आपल्याला जीवनविद्या शिकायची संधी तर या शाळेतच मिळत असते. प्रत्येक क्षणातून, प्रसंगातून आपण काही ना काही वेचत असतो. भले ते चांगले असो वा वाईट असो. जगणे काही आपले एकट्याचेच नसते. ते दुसर्‍यासाठीही असते, किंबहुना बर्‍याचदा ते आपल्यावर अवलंबून असणार्‍या आपल्या प्रियजनांसाठीही असते, म्हणून तर आईची मुलासाठी काहीही झाले, कितीही कष्ट पडले, तरी जगायची इच्छा कधी कमी होत नाही, म्हणून तर त्या दुसर्‍यांचे जगणे सुंदर व्हावे, म्हणून आपण आपले जगणे सुंदर करणे गरजेचे असते. असं स्वत:च्या पलीकडे जाऊन जगताना, स्वतःला स्वतःबद्दलच अनेक शोध लागतात. आपली माणूस म्हणून लोकांनी केलेली प्रशंसा खूप महत्त्वाची आहे. आपली दौलत व यश याची कोणी वारेमाप स्तुती केली, तर त्यात नवीन काही नाहीच. जग हे असेच आहे. सुखाचे व दिल्या-घेतल्याचे, पण आपण माणूस म्हणून जगतो व माणूस म्हणून इतरांना आवडतो, तेव्हा ती खर्‍या अर्थाने मोठी गोष्ट आहे. तर जगण्याने स्वत:मध्ये काहीतरी सुंदर शोधण्याची जी दृष्टी आपल्याला मिळते, तीच आपली साथ जीवनभर देते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत, रोजच्या जीवनातील काही सामान्य तर काही खूप कठीण प्रसंगांना सामोरे जाताना कधी आपण खूप थकतो. पण, त्या प्रयत्नांतूनच आपल्याला सामर्थ्य मिळते. हे सगळे कठीण प्रसंग आणि निराश करणार्‍या समस्या या आपल्याला विकल करणार्‍या असतात. असे नाही तर त्यामुळेच आपण किती सक्षम आहोत व कठीण परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो, हे आपल्याला कळते.
 
 
जगण्याची कला अनेक मार्गांनी आपल्याला आनंद देते, पण आनंदासाठी आयुष्यातील अनेक गोष्टी प्रामाणिकपणे अनुभवता आल्या, तरच जगणं आनंददायी होऊ शकते. आज आहे त्यापेक्षा बरंच ऐहिक उद्या मिळवायच्या प्रयत्नात आज झोप लागली नाही, तर उद्या जे हवे ते सगळे मिळविल्यावरसुद्धा शांत झोप लागेल, याची खात्री देता येत नाही. जीवन जगताना आपण काहीतरी वेगळे, मनाला आनंद देणारे केले, तर जगायला कुणालाही आवडेल. पण, जगणं कधी कधी खूप कठीण वाटतं, कारण खरंच ते खूप कठीण असतं. निदान आपल्याला वाटतं त्या क्षणी ते कठीण असतं. पण, थोडं थांबावं. त्या कठीण क्षणांना पार करता येईल इतका वेळ स्वतःला द्यावा. पुन्हा जगणं सुंदर होऊन जातं. स्वतःसाठी, स्वतःवर प्रेम करणार्‍या सगळ्या मित्रमंडळींसाठी. त्या क्षणासाठी आणि आयुष्यभरासाठी...  
 
 
 -डॉ. शुभांगी पारकर