हे कधी कळणार ?
महा एमटीबी   14-May-2018


 
राज्यस्तरीय ओबीसी जातीनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्यावतीने काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना ’ओबीसी योद्धा’ म्हणून पुरस्कृत करण्यात येणार होते. वर असेही घोषित केले होते की, सन्मान प्रदान करण्याच्या दिवशी भुजबळ तुरुंगातून सुटले नाहीत तर त्यांच्या नावे रिकामी खुर्ची ठेऊन हा सोहळा पार पडण्यात येईल. तसेच या परिषदेचा समारोप प्रकाश आंबेडकर करणार असेही जाहिर करण्यात आले होते.

पण कार्यक्रमाला छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर आले नाहीत. त्यामुळे पुरस्कार सोहळा झाला नाही. त्यामुळे या घटनेचे बातमीमूल्य कमी झाले असले तरी सामाजिक घडामोडीत या घटनेला महत्त्व आहे. ओबीसी समाजाची जनगणना करीत असलेल्या संघटनेने आपल्या समाजाचा योद्धा छगन भुजबळ आहे, असे ठरवले म्हणून समस्त ओबीसी वर्गाला तसे वाटते का? तर तसे मुळीच नाही. तसेच इतर ओबीसी समाजाचे हिंदू संस्कृती जपण्यामध्ये, टिकवण्यामध्ये आणि रूजवण्यामध्येही अतिमोलाचे काम आहे. हिंदू म्हणून ज्या काही संकल्पना आहेत त्या या समाजाच्या मानबिंदू, जीवनश्‍वास आहेत. त्यामुळे हिंदू समाजाला नेहमीच दूषणे देणार्‍या प्रकाश आंबेडकरांबद्दल समाजाला काय वाटते, हे ओबीसी जातीनिहाय जनगणना अभियान कृती समितीला माहिती नसेल, असे शक्यच नाही. तरीसुद्धा या समितीने प्रकाश आंबेडकरांना या कार्यक्रमाच्या समारोपाला बोलावले होते. अर्थात संस्थेला स्वातंत्र्य आहे म्हणा, पण प्रकाश आंबेडकर किंवा छगन भुजबळ देाघेही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. कारण स्पष्ट आहे की, कोणीही एखादे मंडळ, संस्था आपण समाजाचे प्रतिनिधी असल्याचा आव आणण्याचे दिवस आता संपले. समाज म्हणजे कोण्या एका संघटनेचा बटिक नाही. त्यामुळे अमुक एका संघटनेच्या ठरावानुसार त्या समाजाचे प्रतिनिधी किंवा मानबिंदू ठरू शकत नाहीत.

हे स्वतःला इतर मागासवर्गीय समाजाचा नेता म्हणविणार्‍या छगन भुजबळ आणि मागासवर्गीय समाजाचा स्वयंघोषित तारणहार असणार्‍या प्रकाश आंबेडकरांनाही माहिती आहे. बाकी जातीपाती-गटाच्या संस्था बांधून राजकारण खेळणार्‍यांना हे कधी कळणार?

0000000000
समाजाने पुढे यावे

श्रीमंत असो, गरीब असो, आईबाप आपल्या मुलांच्या इच्छेसाठी वाट्टेेल तो त्याग करतात. मात्र कित्येक आईबापांना वृद्धापकाळी मुलांकडून अन्यायाचीच वागणूक मिळते. आपल्या तरुण जीवनात वृद्ध आईबापांमुळे अडथळा येतो, असे कित्येकांना वाटते. काहीजण आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्‍लेल्या आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवतात. काहीजण त्यांना वार्‍यावर सोडतात. काहीजण माळ्यावरची अडगळ वस्तू समजून त्यांची अक्षम्य हेळसांड करतात.


लिहितानाही अतीव दुःख आणि संताप येतो. आईबाबांबद्दल प्रेम-आत्मीयता नसेल पण इतकी कृतघ्नता? आईबाबांनी मुलांच्या वात्सल्यप्रेमासाठी कणाकणांनी झिजवलेल्या तारुण्याची परतफेड कोण करणार? ज्या वयात आईबाबांना गरज असते त्या वयात त्यांना मरण्यासाठी सोडणार्‍या, त्यांचा छळ करणार्‍या स्वार्थी क्रूर मुलांविरुद्ध, संबंधित पाल्यांविरुद्ध दाद कुठे मागायची?

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याने पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल तसेच कल्याण कायद्यात दुरुस्ती करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार पाल्यांना आपल्या वृद्ध आईबाबांची देखभाल म्हणजे त्यांना खाणे-पिणे, कपडे, निवारा, आरोग्य सेवा पुरवणे, त्यांच्या सुरक्षेची आणि सुरक्षिततेची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास व आईबाबांना छळल्यास त्या पाल्याला सहा महिन्याची तुरुंगवासाची सजा होणार आहे. तसेच पाल्याला देखभाल भत्ता म्हणून आईबाबांना महिना दहा हजार रुपये व उच्च मिळकत असलेल्यांना त्यापेक्षा अधिक भत्ता द्यावा लागणार आहे. (यामध्ये अपत्य म्हणून जन्म दिलेली मुले, नातवंडे, दत्तक पुत्र, सावत्र मुले, जावई, सुना यांचीही गणना आहे.) मेन्टेनन्स ट्रिब्युनलकडे आईबाबांना यासाठी दाद मागता येणार आहे. अर्थात उतारवयात थकलेल्या शरीराने आणि विझलेल्या मनाने आईबाबा आपल्याच वशंजांविरुद्ध दाद मागायला पुढे येतील का? ही एक चिंता आहे पण अशा अन्यायग्रस्त आईबाबांना न्याय्य हक्‍क मिळवून देण्यासाठी समाजाने कायद्याची साथ घेऊन पुढे यायला हवे.


- योगिता साळवी