प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात
महा एमटीबी   14-May-2018

- भीषण अपघातातून सर्वजण सुखरूप

- प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर
पुणे :आगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम "शो मस्ट गो ऑन" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.
प्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रार्थना, अनिकेत आणि प्रार्थानाची सहायक हे तिघे कोल्हापूरला जात होते. लोणावळ्याच्याच रस्त्यावर घाटात रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला ही फोर्च्युनर धडकली. चढाच्या रस्त्याला चालक मोटार चालवत जात असताना, समोर अचानक थांबलेला टेम्पो दिसल्याने त्याने मोटार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेग असल्याने मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो टेम्पोला धडकून बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला धडक देऊन थांबला सुदैवाने अपघात झाला त्या ठिकाणी तो मोठ्ठा दगड होता, अन्यथा डाव्या बाजूला असलेली दरी पाहता अपघाताची भीषणता अधिक असती.
 
 
 
दोघेही या अपघातातून सुखरूप असल्याने त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच अपघाताच्या वाढत्या संख्येने या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांना विचार करण्यास भाग पाडले आहे.