मोस्टलीसेनची युट्युबच्या ‘क्रिएटर फॉर चेंज’ उपक्रमासाठी निवड
महा एमटीबी   14-May-2018 

सध्याच्या वाढत्या टेक्नोलॉजीच्या युगात युट्युब हे एक लोकप्रिय क्षेत्र बनत आहे. या युट्युब चॅनल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विषय हाताळले जातात. मग त्यामध्ये राजकीय, सामाजिक, मनोरंजन अशा कित्येक विषयांचा समावेश असतो. याच युट्युबर्सपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांना मोस्टली सेन या नावाने परिचित असलेली प्राजक्ता कोळी.

काय आहे ‘क्रिएटर फॉर चेंज’ उपक्रम?

लोकांमधील सहनशीलता वाढावी आणि युट्युबवर जास्तीत-जास्त समाजोपयोगी आशय पोहोचावा यासाठी डिसेंबर २०१६ पासून युट्युबने ‘क्रिएटर फॉर चेंज’ या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. यामध्ये भारतातील एक सर्वात लोकप्रिय विनोदी युट्युबर म्हणून मोस्टली सेन म्हणजेच प्राजक्ता कोळीची निवड करण्यात आली आहे.

 

युट्युबची वाढती प्रसिद्धी बघता यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचे युट्युबच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विविध विषयांवर मोकळेपणाने संवाद व्हावा आणि समाजावर त्याचा सकारात्मक परिणाम व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी १६ देशांमधील युट्युब क्रिएटर्स निवडण्यात आले आहेत जे जवळपास २९ दशलक्ष लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोस्टली सेन म्हणजे कोण ??

सध्या युट्युबवर आपण अनेक युट्युब चॅनल्स आपण बघतो. अशा या नावाजलेल्या चॅनल्सपैकी एक म्हणजे प्राजक्ता कोळीचं मोस्टली सेन हे चॅनल. या चॅनलची खासियत म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातली काही छोटी छोटी निरीक्षण ती आपल्या व्हिडीओ मधून समोर आणते ज्या गोष्टी आजच्या तरुण मुला-मुलींना आकर्षित करतात. याचं कारण म्हणजे त्या गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडीत असतात. या व्हिडीओज मधून एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा हा प्राजक्ताचा आग्रह असतो. तिच्या या प्रयत्नामुळेच तिच्या चॅनलचे नुकतेच १.४ दशलक्ष सबस्क्राइबर्स झाले आहेत.

प्राजक्ता कोळीची निवड का?

मोस्टली सेन म्हणजेच प्राजक्ता कोळीने याआधी ‘बॉडी शेमिंग’ या विषयावर ‘शेमलेस’ नावाचा एक व्हिडीओ केला होता ज्यामध्ये गौरव गेरा, मिथिला पालकर, रफ्तार, रेडीओ जॉकी मलिष्का, साहिल खट्टर अशा अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. #iPledgeToBeMe नावाचा हॅषटॅग वापरून महिलांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा आदर बाळगावा हा एक मेसेज या व्हिडीओ दिला होता. या व्हिडीओला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्राजक्ता कोळीच्या या उपक्रमासाठी तिला अनेक लोकांचा पाठींबा मिळाला. या सर्व गोष्टी बघूनच तिची निवड करण्यात आली आहे.