निवडणूक निरिक्षकांनी घेतला लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
महा एमटीबी   14-May-2018
 
 
 
 
 
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा
 
मतदार जागृती वर भर द्या
 
 
भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये प्रथमच ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. याबाबत मतदारांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष मतदार जागृती मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था, रोख व मद्य वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा बैठकीचे रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना निवडणूक निरिक्षकानी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा निवडणूक निरिक्षक यांनी घेतला.
 
 
या बैठकीत आचार संहिता, मतदार याद्या प्रसिध्द करणे निवडणूक साहित्य छपाई, मतदार जागृती कार्यक्रम, उमेदवारांचा खर्च, राजकीय पक्षांचा खर्च, वाहन परवाने, कायदा व सुव्यवस्था, नाकाबंदी, मद्य व रोख वाहतूकीला आळा आणि मतदानाची तयारी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा आढावा सादर केला. 
 
 
सर्व राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या सभा आणि कॅार्नर सभाचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. व्हिडिओ पथक व भरारी पथकांना सक्रीय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विविध मार्गाने येणाऱ्या मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्क विभागाने पायबंद घालावा, असे निर्देश देण्यात आले.