इस्राईलविरोधी हिंसाचारात ३७ पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू
महा एमटीबी   14-May-2018

अमेरिकेच्या दूतावासाविरोधात गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईन सीमेवर हिंसाचार
जेरुसलेम :
अमेरिकेचे दूतावासाचे जेरुसलेममध्ये करण्यात आलेल्या स्थलांतराला विरोध म्हणून पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्राईलविरोधात केलेल्या हिंसाचारामध्ये एकूण ३७ पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजाराहून अधिक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे अमेरिकेने आपले दूतावास काल जेरुसलेममध्ये स्थलांतरित केले. अमेरिकेच्या या कृतीला पॅलेस्टाईन नागरिकांचा विरोध होणे हे पूर्वगृहीतच होते. त्यामुळे इस्राईलने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त केले होते. यावेळी गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनच्या ताब्यातील जेरुसलेमच्या भागांमध्ये जोरदार निदर्शने आणि हिंसक आंदोलने करण्यात आली. यावेळी काही जणांकडून इस्राईलच्या सीमेवर हल्ले देखील करण्यात आले. यावेळी इस्राईलने सुरक्षेसाठी तैनात केलेल्या इस्राईलच्या लष्कराने आणि सुरक्षा रक्षकांनी पॅलेस्टाईन आणि इतर विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली. यामध्ये पॅलेस्टाईनचे एकूण ३७ नागरिक ठार झाले. तर गाझा पट्टीमध्ये तब्बल ५०० अधिक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान इस्राईलच्या या कृतीचा इस्लामिक देशांकडून तीव्र विरोध केला जात आहे. इस्राईल जेरुसलेमच्या भूमी अनधिकृतपणे गिळू पाहत असून अमेरिका देखील त्याला साथ देत आहे, अशी प्रतिक्रिया काही मुस्लीम देशांकडून दिली जात आहे. तर इस्लाम आणि मुस्लीमांच्या हिताच्या दृष्टीने सर्व मुस्लीम देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन काही कट्टर इस्लामिक संघटना करत आहेत.