ट्रकचे झाले सिनेमागृह, सतीश कौशिक यांचा आगळा वेगळा उपक्रम
महा एमटीबी   13-May-2018
 
 
 
दिल्ली :  शहरांमध्ये वीकएंडला सिनेमा बघणे हे आता आपल्या नेहमीच्या आयुष्याचा भाग झाला आहे. शहरांमध्ये लेटेस्ट सिनेमे येतात, आणि भरपूर चालतात. साधारण कमावणारा व्यक्ती देखील सिनेमा बघण्यासाठी १००-१५० रुपये खर्च करण्यास सहज तयार होतो, मात्र ग्रामीण भागात अजून ही चैन आलेली नाही. तेथे अजून देखील सिनेमावर भरमसाठ खर्च करण्याआधी लोक हजारदा विचार करतात, सिनेमा बघण्यासाठी शहरात येणे खूप महाग पडते. मात्र सिनेमा सारखी कलाकृती ही सगळ्यांसाठी खुली असावी आणि त्याचा आनंद सगळ्यांना घेता यावा यासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक सगळ्यांचे लाडके 'कॅलेंडर' म्हणजेच सतीश कौशिक यांनी एक नवीन उपक्रम सुरु केला. ट्रकला वातानुकूलित सिनेमाघराचे रूप देवून त्यांनी केवळ ३० रुपयात ग्रामीण भागातील नागरिकांना सिनेमा बघता येईल अशी सोय केली आहे.
 
 
 

मोबइल डिजीटल मूव्ही थिएटर असे या चालत्या बोलत्या सिनेमाघराचे नाव आहे. नुकतेच चंदीगढ येथे झालेल्या 'फिल्म फेस्टीव्हल' मध्ये त्यांनी हा पहिलाच प्रयोग केला, आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अशा विविध ट्रक्स ना सिनेमाघरात परिवर्तित करण्याचे कार्य सुरु केले आहे. यामध्ये ३० रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंत सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. जे सिनेमागृहांपर्यंत पोहोचू शकत नाही, आता सिनेमागृह त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.

प्रत्येक ट्रकचे नाव एका प्रसिद्ध चित्रपटाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये 'मिस्टर इंडिया', 'बाहुबली', 'डॉन' या चित्रपटांचा समावेश आहे. "दिवसेंदिस जमीनीच्या किंमती वाढत आहेत, महागाई वाढली आहे. प्रत्येकच व्यक्ती मल्टीप्लेक्स मध्ये जावून सिनेमा बघू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मनोरंजनाचा आनंद सगळ्यांनाच जुजबी किंमतीत घेता येईल." अशा भावना सतीश कौशिक यांनी व्यक्त केल्या आहेत.

यासाठी काही प्रमाणात निधी दिल्ली सरकारतर्फे देण्यात आला आहे, तर सतीश कौशिक स्वत: देखील यासाठी आर्थिक दृष्ट्या कार्य करत आहेत. त्यामुळे आता चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि त्यामुळे मनोरंजनाचा आनंद समाजातील सर्व स्तरातील लोकांना घेता येणार आहे.