अखेरकार अमेरिकन दूतावास जेरुसलेमला स्थलांतरित
महा एमटीबी   13-May-2018जेरुसलेम : अनेक देशांचा विरोध पत्करून अखेरकार अमेरिकेने इस्राईलमधील तेल अवीव येथील आपले दूतावास जेरुसलेम येथे स्थलांतरित केले आहे. इस्राईल आणि अमेरिका यांच्या मैत्रीची साक्ष देत भव्य अशा कार्यक्रमाच्या माध्यामतून आज या दूतावासाचे जेरुसलेममध्ये स्थलांतरण करण्यात आले असून जगाच्या इतिहासामध्ये ही एक ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प याने आपले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल नेतान्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार देखील व्यक्त केले असून अमेरिकेप्रमाणेच सर्व देशांनी देखील आपले दुतावास जेरुसलेममध्ये स्थलांतरित करावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
.

जेरुसलेम दिनाचे औचित्य साधून अमेरिकेने आपले दूतावास जेरुसलेममध्ये स्थलांतरित केले आहे. अमेरिकेबरोबरच ग्वाटेमाला आणि पेरुग्वे या दोन देशांनी देखील आपापले दूतावास जेरुसलेममध्ये आज स्थलांतरित केले आहे. यानिमित्त या दोन्ही देशांनी आपले प्रतिनिधी, शुभेच्छा पत्र आणि काही भेटवस्तू इस्राईल पाठवल्या आहेत. त्यामुळे नेतान्याहू यांनी या देशांचे देखील आभार व्यक्त केले आहे. तसेच लवकरच अमेरिका, ग्वाटेमाला आणि पेरुग्वे या देशांच्या नव्या दूतावासांच्या पायाभरणीला आजपासून सुरुवात होईल. तोपर्यंत याठिकाणी या देशांच्या दुतावासासाठी म्हणून तात्पुरत्यास्वरुपात काही व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान कार्यक्रमासाठी म्हणून इस्राईलच्या ताब्यात असलेला जेरुसलेम शहराचा संपूर्ण भाग सजवलेला आहे. पंतप्रधान नेतान्याहू हे स्वतः जेरुसलेममध्ये उपस्थित असून शहराच्या भोवती चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्व ठिकाणी अमेरिका आणि इस्राईल यांच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून दोन्ही देशांचे झेंडे लावण्यात आले आहेत. नेतान्याहू यांनी जेरुसलेम आणि इस्राईलसाठी आजपर्यंत शहीद झालेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहिली असून जेरुसलेम आता इस्राईल अधिकृत राजधानी असल्याचे जाहीर केले आहे. 
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. तसेच अमेरिकेचे दूतावास लवकरच जेरुसलेममध्ये स्थलांतरीत करणार येणार असल्याचे जाहीर केले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. याविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील मतदान घेण्यात आले, परंतु हे मतदान पूर्णपणे अमेरिका आणि इस्राईल यांच्यात विरोध झाले होते. सर्व देशांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवलेला असताना देखील ट्रम्प यांनी दूतावास स्थलांतरीत करणारच असा पवित्रा घेतला होता. यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष माईक पेन्स यांनी इस्राईलमध्ये जाऊन मे २०१८ मध्ये अमेरिकन दूतावास जेरुसलेममध्ये स्थलांतरित करण्याची अधिकृत घोषणा केली होती.