ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह’चे जनसंपर्क अभियान
महा एमटीबी   12-May-2018

पत्रपरिषदेत प्रफुल्ल निकम यांची माहिती

 
जळगाव, १२ मे :
ग्रामीण भारताच्या उदयाच्या विविध पैलूंचा उहापोह करणारी ‘न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह’ जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे Y4D फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेतर्फे अवनी फाउंडेशन आणि आगाखान रूरल सपोर्ट प्रोग्राम (इंडिया) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. तरुणांसह महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच ग्रामीण विकासाच्या कार्यात सहभागी प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतील, अशी माहिती शनिवारी, १२ रोजी प्रफुल्ल निकम यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. रितेश पाटील, विराज कावडिया, डॉ.प्रताप जाधव, रजनीकांत कोठारी, विनोद ढगे, डॉ. निलिमा सेठीया, रुपाली वाघ, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.
 
 
जनसंपर्क अभियानादरम्यान न्यू इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे ग्रामीण युवक तसेच कॉन्क्लेव्हच्या कार्याशी संलग्न होऊ इच्छिणार्‍या स्वयंसेवकांशी संपर्क साधला जाणार आहे. ग्रामीण विकासाचा आराखडा करण्याच्या कार्यातील न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. तसेच यातील सहभाग ही ग्रामीण युवकांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
नरेंद्र मोदींची उपस्थिती आणि अभिनेता अक्षयकुमार यांच्या पाठिंब्यामुळे परिषदेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्यासारखी व्यक्ती ‘न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह’ची ब्रँड ऍम्बॅसिडर आहे याचा अभिमान वाटतो, अशी भावना ध४व चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम यांनी व्यक्त केली.
 
चित्रपट अभिनेता अक्षय कुमार हा या कॉन्क्लेव्हचा ब्रँड ऍम्बॅसिडर आहे. न्यू इंडिया कॉन्क्लेव्हचे जनसंपर्क अभियान सध्या जळगावसह खान्देेश परिसरात सुरु आहे. त्याचा शुभारंभ नुकताच जळगाव येथे Y4D चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी न्यू इंडिया कॉन्क्लेव्हला पाठिंबा देणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.