रक्तदान : पडद्यावरचं आणि वास्तवातलं
महा एमटीबी   11-May-2018

 
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. ते बऱ्याच अंशी खरंही आहे. ’बऱ्याच अंशी’ अशासाठी की काही गोष्टी अशाही आहेत, ज्या आधी या आरश्यात दिसतात आणि मग त्यापासून ’प्रेरणा’ घेऊन वास्तवात प्रकटतात. ते असो. पण एकंदरीत समाजातील सर्व प्रवृत्ती, घटना आणि माहितीचे प्रतिबिंब या आरश्यात कधी ना कधी तरी उमटले आहे आणि पुढेही उमटत राहणार आहे. याला रक्तदानही अपवाद कसे असणार ? रक्तदानामागे असणाऱ्या परोपकाराच्या उदात्त भावनेचा काही चित्रपट-दिग्दर्शकांनी मोठ्या खूबीने वापर करुन घेतला आहे.
खूप लहान असताना मी ’नणंद भावजय’ नावाचा मराठी चित्रपट पाहिला होता. त्यातील श्रवणीय गीतांमुळे तो चांगलाच लक्षात राहिला आहे. यातल्या नणंद-भावजयी आधीपासूनच्या मैत्रिणी असतात पण नंतर मात्र त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. ही नणंद आपल्या भावजयीला घरातून हाकलून देते. बऱ्याच घटनाक्रमानंतर शेवटी या नणंदेचा दुर्दैवाने अपघात होतो आणि तिला एका रुग्णालयात दाखल केले जाते. याच रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत असलेली तिची भावजय आपले रक्त देऊन नणंदेला वाचवते आणि मग सुखांत, असे कथानक असलेला हा चित्रपट होता. ’आपली लग्नाआधीची मैत्रीण आणि नंतर झालेली नणंद - वाचली पाहिजे’ या भावनेपोटी तिच्याचकडून झालेला आत्यंतिक छळ विसरुन स्वत: रक्तदान करणारी भावजय प्रेक्षकांना भावून गेली. मात्र एका खाटेवर नणंद आणि शेजारच्या खाटेवर भावजय असून भावजयीच्या शरीरातील रक्त थेट नणंदेच्या शरीरात एका नलिकेच्या सहाय्याने सोडले जात आहे असे दृश्य वैद्यकीय शास्त्राशी विसंगत असल्याचा विचार ना निर्मात्याने केला ना दिग्दर्शकाने. प्रेक्षकांनी तर हा विचार करण्याचे काही कारणच नव्हते कारण ते सर्वजण त्यावेळी डोळे पुसत होते.
यावर कडी करणारा प्रसंग ’अमर अकबर ॲथनी’ या गाजलेल्या चित्रपटात पहायला मिळाला होता. एकाच आईची तीन मुलं लहानपणीच आईपासून ताटातूट होऊन योगायोगाने (या चित्रपटाचे दिग्दर्शक अशा ’योगायोगांसाठीच’ प्रसिद्ध होते) हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती परिवारात वाढतात. पुढे दैववशात या खऱ्या आईला अपघात होऊन रक्ताची गरज भासते. अशा वेळी ’भावनांचा महापूर आला पाहिजे’ अशा कल्पनेने दिगदर्शकाने या तीनही मुलांना आईसमोरच तीन खाटांवर झोपवून तिघांनाही आईस एकदम रक्त द्यायला भाग पाडले होते. तेही तीन वेगवेगळ्या बाटल्यांतून तीन नळ्या पुढे एकाच नळीला जोडून या आईला हे रक्त दिले गेले होते. (नशीब, वाचली बिचारी !) अर्थात वैद्यकीय शास्त्र काहीही सांगो, या एका प्रसंगातून परोपकार, मातृप्रेम, त्याग, राष्ट्रीय एकात्मता वगैरे सबकुछ साधले गेले होते, हे मात्र नक्की.
हिंदी चित्रपटसृष्टीचे काकाजी अर्थात राजेश खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’अवतार’ या चित्रपटातही रक्तदानातील भावनिकता वेगळ्या प्रकारे दर्शविण्यात आली होती. स्वत:च्याच मुलांनी घराबाहेर काढल्यानंतर ’आता पुढे काय करायचे’ या विवंचनेत असलेला हा मोटर मेकॅनिक नायक पुन्हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करतो. त्यासाठी लागणारे साहित्य कसे जमवायचे ही त्याची चिंता सोडवतो, तो त्याच्यासोबत असलेला त्याचा एकनिष्ठ ’सेवक.’ हा सेवक रक्तपेढीत जाऊन रक्तदान करतो, त्याबद्दल मिळालेले पैसे घेऊन पुन्हा रांगेत उभा राहतो (चित्रपटगृहाची तिकिटखिडकी वाटावी असे या रक्तपेढीचे काऊंटर आहे.) – पुन्हा रक्तदान करतो, असे करुन मिळालेल्या पैशात नायकाची, म्हणजेच आपल्या मालकाची निकड भागवतो असे हे दृश्य आहे. नायकाला हे अर्थातच नंतर कळते आणि हे कळाल्यानंतर हा नायक (आणि प्रेक्षकही) गहिवरला नाही तरच नवल.
अगदी अलिकडच्या ’आयत्या घरात घरोबा’ या सचिन दिग्दर्शित चित्रपटातही अशाच प्रकारचे रक्तदान पहायला मिळते. उद्योजक केदार कीर्तीकरांच्या घरात चोरुन राहणारा गोपुकाका हा मुळात प्रामाणिक, परोपकारी मनुष्य. कीर्तीकरांचा बंगला फ़क्त राहण्यासाठी वापरुन शक्य तितक्यांना मदत करीत राहणारा आणि स्वत:चा वैयक्तिक खर्च भागविण्यासाठी ’रक्तदान’ करुन पैसे जमवणारा गोपुकाकाही त्यावेळी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला उतरला होता.
अर्थात ही केवळ काही उदाहरणे आहेत. याशिवाय अन्यही अनेक चित्रपटांत रक्तदानाची झलक पहायला मिळते. त्यामागची भावना प्रेक्षकांना कळेल अशाच पद्धतीने ती चित्रित केली जाते. पण या भावनेबरोबरच संबंधित काही तथ्येही अवश्य समजून घ्यायला हवीत. जसे – कुठल्याही रुग्णास रक्ताची गरज भासल्यास त्या रक्तगटाच्या दात्यांना बोलवावे लागणे, ही काही तितकीशी चांगली स्थिती नाही (अपवाद – दुर्मीळ रक्तगट). हल्ली ज्या रुग्णालयांत सातत्याने निरनिराळ्या शस्त्रक्रिया होत असतात त्या ठिकाणी एक तर रुग्णालयाची स्वत:ची रक्तपेढी तरी असते किंवा रक्तसाठवणूक केंद्र तरी असते. हे दोन्ही नसेल तर एखाद्या सक्षम रक्तपेढीशी रक्ताच्या उपलब्धतेबाबत करार करुन ठेवलेले असतात, ज्यामुळे ऐन वेळी गरज भासल्यास रक्त सहजपणे उपलब्ध होऊ शकेल आणि रक्तदाते मिळविण्यासाठी पळापळ करावी लागणार नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी सातत्याने रक्तदान केले तर कुठल्याही वेळेला ’रक्ताची उपलब्धता’ हा प्रश्नच उरणार नाही. शिवाय एखाद्या तातडीच्या प्रसंगी रक्तदात्यास बोलवून त्याचे रक्त घेतले गेले तरी त्यानंतर या रक्ताच्या तपासण्या, रक्तविघटन, जुळवणी अशा सगळ्या महत्वाच्या प्रक्रियांसाठी वेळ हा द्यावाच लागतो. त्यामुळे ’एका खाटेवर रुग्ण आणि शेजारच्या खाटेवर रक्तदाता’ हे दृश्य भावनिकदृष्ट्या कितीही प्रभावी वाटले तरी प्रत्यक्षात असे होत नाही. क्वचित जर तसे कुठे झालेच तर ’रक्तदात्याचे रक्त अजिबात न तपासता रुग्णाला दिले गेले’ असाच त्याचा अर्थ होईल. दुसरे म्हणजे, रक्तदान केल्याबद्दल काही मोबदला देणे अथवा घेणे यावर आता कायद्याने बंदी आहे. पूर्वी अशा व्यावसायिक रक्तदानावर बंधन नव्हते पण आता मात्र ते आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. शिवाय एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांपर्यंत रक्तदान करण्याला परवानगी नाही, त्यामुळे रक्तदान करुन लागलीच पुन्हा रक्तदान करण्यासाठी रांगेत उभे राहणे हेही वस्तुस्थितीला धरुन नाही. किंबहुना असे काही पडद्यावर दाखविणे हे रक्तदानासंबंधी गैरसमज निर्माण करणारे आहे. शिवाय हेही लक्षात घ्यायला हवे की, रक्तदान करण्यासाठी केवळ रक्तगट जुळला इतक्याने भागत नाही तर अन्यही काही पात्रता रक्तदात्याकडे असाव्या लागतात. जसे – हिमोग्लोबिनची मात्रा, योग्य वजन, रक्तदाब संतुलन इ. हे सर्व असल्यानंतरच रक्तदान करता येते आणि असे रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यास सामान्यत: कुठलाच त्रास होत नाही. हे मुद्दाम अशासाठी की, चित्रपटांमध्ये रक्तदान केलेला रक्तदाता हा (कदाचित प्रेक्षकांची सहानुभूति मिळविण्यासाठी) उगाचच गलितगात्र दाखविला जातो. त्यामुळे योग्य वैद्यकीय पात्रता असलेला रक्तदाता (अति शारीरिक कष्टांची कामे – तीही चोवीस तासांसाठी – वगळता) रक्तदान केल्यानंतरही हसत हसत आपल्या कामाला लागु शकतो.
जिथपर्यंत भावनेचा प्रश्न आहे, ती तर सर्वत्र शुद्धच असते. पण कितीही भावनप्रधान असली तरी रक्तदान ही शेवटी एक तांत्रिक प्रक्रिया आहे आणि त्यात काही कायदेशीर बाबीदेखील आहेत. या सर्व बाबी नीटपणे समजावून घेऊन जर हे रक्तदान पडद्यावर आले तर ते अधिक वास्तवदर्शी होऊ शकेल. आजचा चित्रपट त्या मानाने वास्तवतेशी अधिक इमान राखून आहे. त्यामुळे यापुढे तरी रक्तदान प्रक्रियेतील वास्तविकता आणि रक्तदानामागील पवित्र भावनेतील उदात्तता या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल रुपेरी पडद्यावर राखला जाईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. किंबहुना आजवर रक्तदान हे संपूर्ण चित्रपटाच्या लांबीतील एक छोटासा तुकडा म्हणून आले आहे, पण एखाद्या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय होऊ शकेल इतके भरपूर कंटेंट हे रक्तदानाच्या क्षेत्रातही नक्कीच आहे. याही दृष्टीने जर कुणी विचार केला तर रक्तदान-प्रबोधनास चांगली गती मिळेल, यात शंका नाही. कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ’चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे’ आणि या आरश्यात रक्तदानाचं अनोखं विश्वही अवश्य प्रतिबिंबित होत रहायला हवं !
- महेंद्र वाघ