गेली सांगून द्यानेसरी न् मानसा परास जनावरं बरी...
महा एमटीबी   11-May-2018

पन्नास-साठ वर्षांपूर्वी माणसांना जनावरांपैकी कुत्रा, मांजर या घरगुती आणि घोडा, बैल, खेचर अशा वाहतुकीची साधनं असणार्‍या जनावरांचीच जास्त माहिती होती. यापेक्षा वेगळं एखादं जनावर दृष्टीस पडल्यास माणसं एकतर त्याला घाबरून असायची किंवा हातात हत्यार असल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करायची.

हीच प्रवृत्ती साहित्यातही होती. अर्ध शतकापूर्वी जिम कॉर्बेट या लेखकाच्या वन आणि वन्यप्राण्यांबद्दलच्या ज्या कथा प्रसिद्ध नि अतोनात लोकप्रिय झाल्या, त्या शिकारकथा म्हणजे मुख्यतः हिंस्र प्राण्यांना ठार मारण्याच्या कथा होत्या. आपल्याकडेदेखील भानू शिरधनकरांसारख्या लेखकांच्या शिकारकथा फार लोकप्रिय होत्या.

पण, काळ फार झपाट्याने बदलला. स्वत: जिम कॉर्बेटच शिकारकथांऐवजी वन्य प्राण्यांच्या रक्षणाबद्दल, पर्यावरण संरक्षणाबद्दल लिहू लागला. त्याच्या पाठोपाठ किंवा आसपास फर्ले मोवॅट, जॉर्ज शेल्लर, पीटर मॉरिसन, जेन गुडाल, इयान डग्लस, ओरिया डग्लस असे अनेक लेखक वन्यप्राण्यांबद्दल लिहू लागले. फर्ले मोवॅटने उत्तर ध्रुव प्रदेशातल्या हरिणांबद्दल लिहिलं. जॉर्ज शेल्लरने वाघांबद्दल लिहिलं. जेन गुडालने गोरिलांबद्दल लिहिलं. पीटर मॉरिसनने हिमप्रदेशातल्या चित्त्यांबद्दल लिहिलं, तर इयान-ओरिया डग्लसनी हत्तींबद्दल लिहिलं. हे सगळे लोक मुळात संशोधक होते. त्या-त्या विषयातल्या आपल्या संशोधनावरच त्यांनी पुस्तकं लिहिली. ती जगभर गाजली. वन, वन्यप्राणी, पर्यावरण याबद्दल लोकांचे प्रबोधन होण्यात या लेखनाने फार मोठी भूमिका बजावली.

आपल्याकडेदेखील व्यंकटेश माडगूळकर, लालू दुर्वे, मारुती चितमपल्ली अशा लेखकांनी जंगलं, निसर्ग, वन्यप्राणी, पक्षी यांच्याबद्दल समाजात फार मोठी आवड निर्माण केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हेमलकसा नावाच्या गावात वनवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्प चालतो. बाबा आमट्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे तो चालवतात. प्रकाशरावांनी चित्रे आणि अस्वलांपासून विषारी सापांपर्यंत असंख्य वन्यप्राणी पाळलेले आहेत. प्रकाशरावांचे एक सहकारी विलास मनोहर यांनी या विषयावर ’नेगल’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. मराठी वाचकांना, विशेषत: मुलांना, तरुणांना ते अतिशय आवडतं.
 
 
पाश्चिमात्य जगात वन्यप्राण्यांबद्दल लोकांना जिव्हाळा निर्माण होण्याचं ताजं कारण म्हणजे विविध वाहिन्या. नॅशनल जिओग्राफिक किंवा त्यासारख्याच अन्य वाहिन्यांवरून वन्यजीवनाचं जे चित्रण दाखवलं जातं, त्याला ‘अप्रतिम’ याखेरीज दुसरं विशेषण लावता येणार नाही.
 
अशा गोष्टींचे काही दुष्परिणामही असू शकतात. ‘डब्ल्यू. डब्ल्यू. एफ.’ म्हणजे ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फाऊंडेशन’ या वन्यप्राणी संरक्षणाचे कार्य करणार्‍या संस्थेच्या संचालिका स्यू लिबरमन यांनीच अलीकडे अशी काही उदाहरणं सांगितली.
 
दक्षिण आफ्रिकेतल्या एका प्राणिसंग्रहालयात एक तरुण पोर्‍या आपली आई आणि मैत्रीण यांच्यासह गेला होता. मैत्रिणीला आपला पराक्रम दाखवण्यासाठी या शूरवीराने तळहातावर काहीतरी खाद्यपदार्थ ठेवून हात सिंहाच्या पिंजर्‍यात आत घातला. सिंहाने खाद्यपदार्थ उचलण्याऐवजी हातच धरला, पिंजर्‍यात आणखी चार सिंह होते. तेही धावून आले. पण, या पोर्‍याची दोरी बळकट म्हणायची. सिंहांचे रक्षक जवळपास होते. ते धावले आणि सिंहांना पाठी हटवून त्यांनी या आचरट बाळाची सुटका केली.
 
पण, सगळेच जण एवढे सुदैवी नसतात. तैवानमधलं एक जोडपं आफ्रिकेतल्याच एका अभयारण्यात संरक्षित गाडीतून फिरत होते. त्यांना एक सिंहांची जोडी दिसली. हे जोडपं त्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो घेऊ लागलं. इथवरही ठीक आहे, पण सिंह काही हालचाल करत नाहीत म्हटल्यावर यांची हिंमत वाढली. हे गाडीतून खाली उतरून, सिंहांच्या अगदी जवळ पोहोचून फोटो घेऊ लागले. आचरटपणाची इतकी कमाल झाल्यावर व्हायचं तेच झालं. सिंहांनी या फोटोबहाद्दरांवर झडप घातली नि त्यांचा निकाल लावला.
 
 
तज्ज्ञ लोक म्हणतात की, हा वाहिन्यांचा परिणाम आहे. वाहिन्यांवर वन्यप्राण्याचे चित्रण इतकं सफाईदार दाखवलं जातं की, लोकांना वाटतं, वाहिनीच्या कॅमेरामनला पोझ देण्यासाठीच जणू प्राणी जंगलात फिरत असतात. अशा प्रकारचं चित्रण करण्यासाठी विविध तंत्रं वापरली जातात. अनेकदा कॅमेरामन जीव धोक्यात घालूनही चित्रण करतात. पण, त्यांना त्याची मर्यादा नेमकी माहीत असते. लोकांना याची जाणीव होत नाही. त्यांची अशी समजूत होते की, कुत्र्यामांजरांना थोपटावं तसं आपण वाघसिंहांना देखील थोपटू शकू आणि आपलं हे प्रेमळ थोपटणं वाघसिंहांनी समजून घ्यावं. परंतु, वाघसिंह दूरदर्शन वाहिन्या बघत नसल्यामुळे प्रत्यक्षात असे घडत नाही.

एका चोराने एक घर फोडलं. त्या घरात एक वृद्ध जोडपं राहत होतं. त्यांच्या आरडाओरड्याने लोक जागे झाले, तसा चोर पळाला. शेजारीच प्राणिसंग्रहालय होतं. चोराने मोठ्या सफाईने उंच तारांच्या कुंपणावरून आत उडी घेतली. आत गडद अंधार होता. त्यामुळे आपण साक्षात मृत्यूच्या जबड्यातच उडी घेतोय, हे चोराला कळलं नाही. त्याने वाघाच्या खुल्या पिंजर्‍यात उडी घेतली होती. माणसाला अंधारात दिसत नाही, पण प्राण्यांना दिसतं. वाघाने एकदम अस्मानातून टपकलेल्या या आयत्या शिकारीचा एका क्षणात निकाल लावला.

दुसर्‍या ठिकाणी, दुसर्‍या चोराने गोरिलाच्या पिंजर्‍यात उडी घेतली. आता गोरिला हा खरं म्हणजे हिंस्र पशू नव्हे, पण त्याच्या निवासातच एखादा मनुष्यप्राणी घुसला तर त्याने काय करावं? चोराच्या हातात पिस्तुल होतं. त्याने सरळ गोरिलावर गोळ्या झाडल्या. पण जबर जखमी होऊनही गोरिलाने चोराची मानगूट सोडली नाही. चोर पकडला गेला आणि सुदैवाने गोरिलाही मेला नाही. ही हकीकत पेपरातून झळकल्यावर गोरिला एकदम हिरोच झाला.

माणूस ज्याप्रमाणे स्वत:पेक्षाही स्वत:च्या पोराबाळांसाठी जीव टाकतो, तसंच जनावरांचंही असतं. घरातली पाळलेली मांजरसुद्धा तिच्या पिल्लांना धोका आहे, असं वाटलं तर खवळून उठते. मग वन्यप्राण्यांनी तसं केलं तर काय नवल? युगांडातल्या एका अभयारण्यात एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन फिरत होते. त्यांना एक हत्तीण आणि तिचं गोजिरवाणं पिल्लू दिसलं. आजोबांना प्रेमाचं भरतं आलं आणि ते नातवासकट त्या पिलाला कुरवाळायला पुढे सरसावले. हत्तीचं पिलू म्हणजे घरच्या गाईचं वासरू नव्हे, हे ते विसरले. वन्यप्राण्यांशी सलगी करता येते, पण त्याचीही काही पद्धत असते. परिणामी, बिथरलेल्या हत्तीणीने आजोबांना पायाखाली तुडवलं.

सील हा प्राणी आपण पाहिलेलाच असेल. अतिशय चकमकीत कातडीचा, चपळ, चलाख असा हा सील खरोखरच मोठा गोड दिसतो. त्याच्या त्या चकमकीत अंगावरून हात फिरवावा असं वाटतं. पण, सीलला हे आवडेल की नाही, याचा विचार नको का करायला?

दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन शहराच्या समुद्र किनार्‍यावर खूप सील आहेत. त्यांना पाहायला जगभरातून पर्यटक येत असतात. अशीच एक आजी आपल्या नातवाबरोबर सील पाहायला गेलेली असताना, तिला सीलचं एक गोजिरवाणं पिल्लू दिसलं. स्वतः सील इतका गोजिरवाणा दिसतो, मग सीलचं पिलू भलतंच गोजिरवाणं दिसावं, यात नवल काय? पण सील म्हणजे पाळलेला ससा नव्हे, हे आजी विसरली. “हाऊ क्यूट!” असे उद्‍गार आणि ’च्यॅक’ असा आवाज तोंडातून काढीत आजी त्या पिलाला कुरवाळायला गेली. तेव्हा सीलच्या मादीने सरळ हल्ला चढवला आणि आजीच्या नाकाचा तुकडाच पाडला.

स्यू लिबरमन म्हणतात, ”अलीकडे माणसं, विशेषतः शहरी माणसं निसर्गापासून इतकी दुरावलेली आहेत की निसर्ग हा आपल्यासारखाच पोषाखी आणि कृत्रिम आहे, अशी त्यांची समजूत आहे. पण निसर्ग हा जितका सुंदर आहे, तितकाच रौद्रही आहे. मनुष्यप्राण्याचे भलतेच चाळे त्याने का खपवून घ्यावेत?”

आपल्याकडे हल्ली पर्यावरण संरक्षण शिबीर, निसर्ग भटकंती वगैरेंची थोडी फॅशन झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे सुट्टीत मुलाबाळांना घेऊन कुठल्या तरी अभयारण्यात वगैरे जायचं आणि परत आल्यावर लोकांना, ’आम्ही हत्ती पाहिले, रानगवे पाहिले,’ असा मोठेपणा मिरवायचा, एवढ्यापुरतंच हे निसर्गप्रेम असतं. एरवी मग बिनधास्तपणे निसर्गाविरुद्ध वागायचं. प्रदूषण वाढविणार्‍या वस्तू बेधडक वापरायच्या, असं चालतं. अर्थात, नुसत्याच उनाडक्या करत हिंडण्यापेक्षा किंवा उघड्यावाघड्या नटनट्या बघत घरात बसण्यापेक्षा, फॅशन म्हणून का होईना, लोक निसर्ग सहलींना जात आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण, याच्याहीपुढे जाण्याची गरज आहे.

जॉर्ज शेल्लर हा माणूस चक्क आपल्या बायकोला बरोबर घेऊन आफ्रिकेतल्या काँगो नि युगांडाच्या घनदाट जंगलात वर्षभर राहिला आणि त्याने गोरिलांचा अभ्यास केला. हाच जॉर्ज शेल्लर भारतात, मध्य प्रदेशात, कान्हा-किसली अभयारण्यातही वर्षभर येऊन राहिला होता. तिथे त्याने वाघांचा अभ्यास केला. जेन गुडाल ही तर तरुण स्त्री. आफ्रिकेतल्या टांगानिका सरोवराकाठी वाघ, रानरेडे, विषारी नाग अशा जीवघेण्या जनावरांच्या संगतीत वर्षानुवर्षे राहून तिने चिंपांझी माकडांचा अभ्यास केला.

आमच्या शंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात असा अभ्यास करणारे दोन हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच का असावेत?


- मल्हार कृष्ण गोखले