ही भेट जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची : ट्रम्प
महा एमटीबी   10-May-2018

डोनाल्ड ट्रम्प घेणार किम जोंग उनची भेट 


 
वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या जून महिन्यामध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याची भेट घेणार आहेत. स्वतः ट्रम्प यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली असून येत्या १२ जून रोजी किम जोंग उन याची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

ट्रम्प यांनी नुकतेच या भेटीविषयी ट्वीट केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे कि, येत्या १२ जून रोजी सिंगापूर येथे आपण किम जोंग उनची भेट घेणार आहे. ही जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून आम्ही दोघे देखील ही भेट अधिकाधिक उत्तम कशी होईल, यासाठी म्हणून पूर्ण प्रयत्न करणार आहोत, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.


किम जोंग उन याने गेल्याच महिन्यामध्ये दक्षिण कोरिया याला भेट देऊन गेल्या ६७ वर्षापासून सुरु असलेल्या कोरियन युद्धाचा शेवट केला आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान आता अमेरिकेबरोबर देखील आपले संबंधांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्न करत आहे. याला ट्रम्प प्रशासन देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटी नेमकी काय चर्चा होईल, पाहणे  उत्सुकतेचे ठरणार आहे.