एप्रिल महिन्यात सरकारकडे १ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा
महा एमटीबी   01-May-2018 

नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर यंदा एप्रिल महिन्यामध्ये सरकारकडे तब्बल १ लाख कोटी रुपये इतके वस्तू आणि सेवा कराचे संकलन झाले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकतीच याविषयी घोषणा करण्यात आली असून कालपर्यंत जमा झालेल्या जीएसटीची संपूर्ण माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रानुसार एप्रिल २०१८ मध्ये सरकारकडे एकूण १ लाख ३ हजार ४५८ कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये १८ हजार ६५२ कोटी रुपयांचा सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तु आणि सेवा कर असून २५ हजार ७०४ कोटी रुपयांचा एसजीएसटी अर्थात राज्य वस्तु आणि सेवा कर आहे. तसेच आयजीएसटी अर्थात संयुक्त वस्तू आणि सेवा कर अंतर्गत एकूण ५० हजार ५४८ कोटी रुपये तर सेसच्या अर्थात अधिभाराच्या माध्यमातून एकूण ८ हजार ५५४ कोटी रुपये जमा झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
याचबरोबर एप्रिल महिन्यातील कम्पोजीशन योजनेद्वारे भरण्यात येणाऱ्या तिमाही कर परताव्यांमध्ये वाढ झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये देशातील १९ लाख ३१ हजार कम्पोजीशन योजनेपैकी ११ लाख ४७ हजार जणांनी आपले तिमाही रिटर्न भरल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या द्वारे एकूण ५७९ कोटी रुपये इतका कर सरकारदरबारी जमा झाला असून या कराचा देखील समावेश वरील एकूण आकड्यामध्ये करण्यात आला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
 
तसेच यंदाच्या जीएसटी रिटर्न भरण्यास पात्र असलेल्या लोकांच्या संख्येत देखील वाढ झाली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील एकूण ८७ लाख १२ हजार लोकांपैकी एकूण ६० लाख ४७ हजार नागरिकांनी जीएसटीआर ३बी रिटर्न भरल्याचे मंत्रालयाने जाहीर केले आहे. जीएसटी करसंकलनामध्ये आणि रिटर्न भरणाऱ्यांमध्ये झालेले ही वाढ अत्यंत सकारात्मक असून भारतीय अर्थ व्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.