जपानला भूकंपाचा धक्का !
महा एमटीबी   09-Apr-2018

६.१ रिश्टर तीव्रतेचा धक्का, पाच जण जखमी
ओदा : जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या ओदा शहरामध्ये आज पहाटे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. जपानच्या भूवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ही ६.१ रिश्टर एवढी मोजण्यात आली असून यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. तसेच शहरातील अनेक ठिकाणी घरांची नासधूस झाली असून शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा देखील बंद पडला आहे.

जपानच्या स्थानिक वेळेनुसार आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हा ओदा शहराच्या उत्तरेला १२ किमी अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. मध्यरात्री भूकंपाचा पहिला झटका बसल्यानंतर अनेक नागरिक आपापल्या घरांमधून बाहेर पडले. अनेक ठिकाणी काही घरे देखील कोसळली आहेत, परंतु सुदैवाने यामध्ये कसलीही जीवित्त हानी झाल्याचे वृत्त अजून समोर आलेले नाही.

दरम्यान भूकंपामुळे शहरातील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला आहे. शहरातील काही मोठ्या रुग्णालयांचा देखील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. रुग्णांना याचा त्रास होऊ नये, म्हणून स्थानिक प्रशासनाकडून यासाठी तात्पुरती दुसरी सोय करण्यात आली आहे. भूकंपामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना देखील भेगा पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असून लवकरच सर्व परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती चुगोकू इलेक्ट्रिसिटी पॉवर कंपनीकडून सांगण्यात आले आहे.