स्थायी समिती व शिक्षण समिती निवडणूक
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव तर शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर यांची बिनविरोध निवड झाली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट या महत्वाच्या चार वैधानिक समित्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी रीतसर अर्ज भरले होते. मात्र विरोधी पक्षाकडून व भाजपकडून एक ही अर्ज आला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले. केवळ औपचारिकता बाकी होती.
गुरुवारी स्थायी व शिक्षण समितीवर शिक्कामोर्तब झाले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आमदार तुकाराम काते, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, नगरसेवक रमेश कोरगावकर, अनंत नर, शुभदा गुडेकर, स्नेहल आंबेकर, यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, सर्व पक्षीय नगरसेवकांनी,मुंबई महापालिका वार्ताहर संघ, माजी महापौर महादेव देवळे, जनसंपर्क विभाग, सचिव आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कारकीर्द -
मंगेश सातमकर
पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी चौथ्यांदा अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. १९९४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००२ ते २०१२ पर्यंत ते नगरसेवक होते. यानंतर २०१७ मध्ये ते शीव प्रभाग क्र. १७५ मधून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. सातमकर २००४-०५ मध्ये शिक्षण समिती अध्यक्ष होते. त्यानंतर २००६-०७ आणि २००७-०८ असे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद भुषवले आहे.
यशवंत जाधव
सन १९९७, २००० मध्ये यशवंत जाधव नगरसेवक निवडून आले. स्थापत्य, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष पद भूषवले आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभागृह नेते पद मिळाले. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड त्यांची निवड करण्यात आली. यशोधर फणसे यांच्यानंतर जाधव यांनी सभागृह नेते पदावरुन स्थायी समिती अध्यक्ष पदाची पंरपरा कायम राखली आहे. जाधव यांच्या निवडीमुळे शहराला तब्बल १५ वर्षानंतर स्थायी समिती अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.