व्यर्थ न हो तव दान !
महा एमटीबी   06-Apr-2018“समजा, सकाळी उठल्या उठल्या तुमच्यासमोर कोणी ’पुरणपोळी वगैरे सणासुदीला केल्या जाणाऱ्या पंचपक्वान्नांनी भरलेले ताट समोर आणून ठेवले तर ? तितके सगळे पदार्थ तुम्हाला या वेळी खावेसे वाटतील ? नक्कीच नाही. कारण ती वेळच अशी आहे, ज्या वेळी केवळ पोहे, उपमा, इडली यांसारखा एखादाच पदार्थ पुरेसा आहे, कारण त्यावेळची गरज तितकीच आहे. अन्यथा आपल्यालाच त्रास होईल.”

एका रुग्णालयामधील प्रशिक्षण वर्गामध्ये जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी ’रक्तघटक’ हा विषय तेथील डॉक्टर्स आणि परिचारिकांना समजावून सांगत होते. कितीही क्लिष्ट विषय असला तरी अत्यंत सोप्या भाषेत आणि समर्पक उदाहरणांसह समजावून सांगण्याचे खास कसब डॉ. कुलकर्णी यांच्याकडे आहे. वरील उदाहरणातूनही ’विशिष्ट परिस्थितीमध्ये आवश्यक तोच रक्तघटक रुग्णास दिला गेला पाहिजे अन्यथा त्याला त्रास होऊ शकतो’ ही महत्वाची बाब उपस्थितांच्या लक्षात तर आलीच पण मनावर ती ठसली देखील.

रक्तघटक - अर्थात रक्तात असलेले घटक - वेगवेगळे करणे तंत्रज्ञानामुळे आता सहज शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी रुग्णास रक्त देणे याचा अर्थ शब्दश: रक्तदात्याचे रक्त जसेच्या तसे रुग्णाला देणे असा होई. या रक्तास वैद्यकीय परिभाषेत ’संपूर्ण रक्त’ किंवा whole blood असे संबोधले जाते. बऱ्याच जुन्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे रक्तसंक्रमण पहायला मिळते. आता मात्र ’रुग्णाला रक्त द्यायचे आहे’ या वाक्याचे किमान चार अर्थ निघु शकतात. लाल रक्तपेशी (red blood cells), रक्तबिंबिका (platelets), रक्तरस (plasma) आणि क्रायो (cryoprecipitate) हे ते चार अर्थ आहेत. रक्तापासून वेगळे करता येऊ शकणारे हे सर्व प्रमुख रक्तघटक आहेत. अर्थात ’रुग्णाला रक्त द्यायचे आहे’ या वाक्यात रक्त या शब्दासाठी या चारांपैकी कुठलाही एक शब्द असु शकतो. आज रक्तसंकलनासाठी पीव्हीसी प्लास्टिकच्या विशिष्ट प्रकारच्या पिशव्या वापरल्या जातात पण पूर्वी मात्र यासाठी काचेच्या बाटल्या वापरल्या जात. सध्याच्या या रक्तपिशव्या एकेरी, दुहेरी, तिहेरी किंवा चौपदरी अशा चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच एक तर ती एकच पिशवी असते किंवा या पिशवीला एक, दोन किंवा तीन अन्य पिशव्या नलिकांच्या सहाय्याने जोडलेल्या असतात. अधिक रक्तघटक निर्माण करता येण्यासाठी ही चौपदरी (quadruple) रक्तपिशवी सामान्यत: वापरली जाते. म्हणजेच रक्तसंकलन एकाच मुख्य पिशवीमध्ये करुन त्यातील रक्तघटक पूर्णत: निर्जंतुक स्थितीमध्ये वेगळे करण्यासाठी अन्य तीन पिशव्या वापरल्या जातात. रक्तसंकलन झाल्यानंतर हा रक्तपिशव्यांचा संच एका शीतचक्रातील (refrigerated centrifuge) कप्प्यांमध्ये फ़िरविण्यासाठी ठेवला जातो. एका मिनिटात सुमारे दोन ते पाच हजार फ़ेरे (rpm) इतक्या वेगाने ही रक्तपिशवी फ़िरल्यानंतर रक्तातील लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाज्मा हे घटक बाहेरुन ओळखू येण्याइतपत वेगळे दिसु लागतात. हे शक्य होते ते अर्थातच प्रत्येक घटकाच्या वेगवेगळ्या घनतेमुळे. यानंतर शीतचक्रातून बाहेर काढलेल्या या रक्तपिशवीतून स्वयंचलित रक्तविघटकाच्या (automated blood component extractor) सहाय्याने विशिष्ट ठिकाणी दाब देऊन अन्य पिशव्यांमध्ये रक्तघटक वेगळे केले जातात. अर्थात पूर्णत: निर्जंतुक स्थितीमध्ये. या प्रक्रियेमध्ये शीतचक्र, रक्तविघटक आणि रक्तपिशव्यांची ही विशिष्ट रचना हे घटक फ़ार महत्वाचे आहेत, कारण त्यामुळेच रक्तघटक वेगळे करता येऊ शकतात. पूर्वी काचेच्या बाटल्या असताना हे शक्यच नव्हते.
रुग्णाला झालेल्या आजाराप्रमाणे त्यास ’कोणता रक्तघटक देणे आवश्यक आहे’ याचा निर्णय डॉक्टर करतात. ’एखादाच घटक आवश्यक आहे’ यातच ’काहीतरी अनावश्यकही आहे’ हे अध्याहृत आहे. उदाहरणार्थ, एखाद्या पंच्याहत्तर वर्षांच्या आजींचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्त द्यायचे आहे. अशा वेळी लाल रक्तपेशी हा एकच घटक खरे तर पुरेसा आहे, ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळु शकेल. लाल रक्तपेशीच्या एका पिशवीमुळे एक ग्रॅम हिमोग्लोबिन वाढते, असे सर्वसाधारण समीकरण आहे. परंतु लाल रक्तपेशी या रक्तघटकाऐवजी या आजींना जर ’संपूर्ण रक्त’ (whole blood) दिले गेले तर जितक्या पिशव्या दिल्या जातील तितक्या अनावश्यक प्लाज्माचा मारा आजींच्या हृदयावर होईल आणि या वयात आधीच कमकुवत झालेले त्यांचे हृदय अतिरिक्त प्लाज्माचे पंपिंग करणे भाग पडल्याने कदाचित अचानक बंदही पुकारेल. जी समस्याच नाही, ती उद्भवण्याची शक्यता या अनावश्यक रक्तघटकांच्या संक्रमणामुळे निर्माण होते. नेमकेपणाने योग्य परिणाम साधणारे आणि अनावश्यक घटकांचे घातक दुष्परिणाम टाळणारे रक्तघटक द्यायला हवेत ते यामुळे !
अर्थात काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, म्हणजे अपघातांच्या वगैरे प्रसंगी, जिथे खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेला असतो, त्यावेळी सर्वच रक्तघटक दिले जाण्याची गरज निर्माण होऊ शकते. पण मग अशा वेळी ’संपूर्ण रक्त’ द्यावे का ? आधुनिक वैद्यक विज्ञान असे सांगते की, अशा प्रसंगीदेखील संपूर्ण रक्ताऐवजी रक्तघटकांचे पुनर्गठन (reconstitution) करुन ते देणे अधिक सोयीचे. याचे कारण एकदा रक्त हे दात्याच्या शरीरामधून बाहेर आले की रक्तातील प्रत्येक घटक उपयोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या तापमानांना साठवला जाणे आवश्यक असते. जसे, लाल रक्तपेशी दोन ते सहा अंश सेल्सियसला, प्लाज्मा व क्रायो उणे पस्तीस अंशांपर्यंत तर प्लेटलेट्स हा घटक बावीस ते पंचवीस अंशांनाच ठेवण्याची आवश्यकता असते. रक्तघटक वेगळे झाल्यानंतर अर्थातच ही काळजी घेतली जातेच. शिवाय प्रत्येक रक्तघटकांचे आयुर्मानही निरनिराळे असते. लाल रक्तपेशी ४२ दिवसांपर्यंत साठवता येतात, उणे पस्तीस अंशांपर्यंत गोठवल्यानंतर प्लाज्मा व क्रायो एक वर्ष टिकतात तर प्लेटलेट्सचे आयुर्मान केवळ पाच दिवसांचे असते. जेव्हा रक्तघटक वेगळे न करता ’संपूर्ण रक्त’ म्हणूनच हे रक्त साठविण्यात येते, तेव्हा मात्र ते एकाच तापमानाला (2 to 6०C) साठविण्यात येते. यामुळे त्यातील लाल रक्तपेशी वगळता अन्य सर्व घटक हळुहळु निरुपयोगी होत जातात. त्यामुळे असे संपूर्ण रक्त देण्यापेक्षा योग्य पद्धतीने साठविलेल्या रक्तघटकांचे योग्य पद्धतीने पुनर्गठन करुन संक्रमित करणे हे रुग्णासाठी अधिक परिणामदायी ठरते.
वैद्यकीय क्षेत्रात रक्तघटकांच्या वापराबद्दल आता बऱ्यापैकी सजगता आली आहे. रुग्णांच्या नातलगांनाही रक्तघटकांचे प्रकार माहिती असतात. नव्या पिढीतील डॉक्टर्स रक्तघटकांच्या वापरावर ठाम असल्याचे दिसते. जनकल्याण रक्तपेढीने तर संकलित झालेल्या सर्व म्हणजे शंभर टक्के रक्ताचे विघटन करण्यास २०१५ सालापासूनच प्रारंभ केला आहे. मात्र हे झाले पुण्या-मुंबईसारख्या शहरांतील चित्र. रक्तघटकनिर्मिती आणि रक्तघटकांचा वापर यांपासून ग्रामीण भाग मात्र अद्यापही दूरच आहे. अगदी दुर्गम अशा ग्रामीण किंवा वनवासी भागात तर मूळ ’संपूर्ण रक्त’ मिळण्याचीदेखील मारामार आहे तर तिथे रक्तघटक कुठुन मिळणार ? अशा ठिकाणी रक्तघटक उपलब्ध होण्यासाठी ’रक्तसाठवणूक केंद्रांची’ भूमिका महत्वाची ठरु शकते. रक्तसंकलन किंवा रक्तप्रक्रिया इ. न करता केवळ रक्तसाठवणूक आणि रक्तजुळवणी करणारी ही केंद्रे रुग्णालयांमध्ये उभारता येऊ शकतात. या ठिकाणी रक्तविघटनाचे तंत्रज्ञान उपलब्ध नसले तरीही उत्तम पद्धतीने विघटित झालेले आणि तपासलेले रक्तघटक मोठ्या रक्तपेढ्यांकडून आणून ते साठविण्याची सोय मात्र असते, ज्याचा उपयोग त्या त्या भागांतील गरजू रुग्णांस होऊ शकतो. आज जनकल्याण रक्तपेढीसारख्या तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत रक्तपेढीमध्ये प्रक्रिया झालेले उत्तम गुणवत्तेचे रक्तघटक अशा रक्तसाठवणूक केंद्रांच्या माध्यमांतून शिरवळ, फ़लटण, वाई, पाचगणी, सासवड आणि शिरूरसारख्या ग्रामीण भागांतील रुग्णांनादेखील उपलब्ध होत आहेत. शिवाय आता तर एका रक्तपेढीने दुसऱ्या रक्तपेढीस मोठ्या प्रमाणावर रक्तघटक देण्यासही शासनाने संमति दिली आहे, त्यामुळे ग्रामीण भागांतील रक्तपेढ्यांना याचा लाभ निश्चितच मिळु शकतो.
रक्तघटकांबाबत सर्वांत महत्वाची बाब म्हणजे शुद्ध भावनेने केलेल्या या दानाचा एक कणही व्यर्थ जात नाही. अर्थात एकाच रक्तदात्याच्या रक्तापासून तीन ते चार रुग्णांना नवजीवन मिळु शकते. एका रक्तपिशवीपासून तयार होणारे हे रक्तघटक म्हणजे चार रुग्णांचे जणु चार आशीर्वादच. कोणाच्या रक्ताचा घटक कोणत्या रुग्णास दिला जाणार आहे हे ना रक्तदात्यास माहिती, ना रुग्णास. पण एकदा रक्त देऊन ही चार रक्ताची नाती निर्माण होतात. ही नाती प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती दोन्ही बाजुंना समाधान देऊन जातात, हेही खरेच. ’हा समाज माझा आहे आणि मी या समाजाचा आहे’ हा भाव या अनोख्या नात्यांमुळेच वाढीस लागतो.

शेवटी, समाज उभा आहे तो अशा नात्यांवरच !

- महेंद्र वाघ