'रणांगण'मुळे माझ्यातील नृत्याविष्कार दाखविण्याची संधी मिळाली : प्राजक्ता माळी
महा एमटीबी   05-Apr-2018
 
 
 
 
सध्या युट्यूब ओपन केल्यावर लगेचच "विनायका गजानना" हे 'रणांगण' या आगामी मराठी चित्रपटातील गाणं आपल्या समोर दिसतं. आजवर गणपतीवर चित्रित झालेली बरीच मराठी गाणी आपण पहिली आहेत पण यातही 'विनायका गजानना'ने आपले वेगळेपण सिद्ध करत सोशल मीडियावर आपला डंका चांगलाच वाजवला आहे. बघता बघता या गाण्याने २ लाखाच्या आसपासच्या व्यूअर्सचा टप्पा देखील पार केला. या गाण्याला मिळालेल्या या यशाचे मोठे श्रेय कोरिओग्राफर गणेशजी आचार्य व या गाण्यातील नृत्यांगना व प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना जात असल्याची सध्या चर्चा रंगत आहे. एखाद्या चित्रपटात केवळ एका गाण्यावर नृत्य करण्याची संधी प्राजक्ताला प्रथमच मिळाली आहे व तिने या संधीचं सोनं केलं आहे. वैशाली माडेच्या आवाजात स्वरबद्ध झालेल्या या गाण्यावर नृत्य करणाऱ्या प्राजक्ता माळीने हेच औचित्य साधून 'महा एमटीबी'शी खास बातचीत केली आहे.
 
 
प्रश्न : बॉलीवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी "विनायका गजानना" या गाण्यासाठी तुला कोरिओग्राफ केलंय, या गाण्यात स्वप्नील जोशी देखील आहे. एकूणच आजपर्यंतच्या तुझ्या प्रवासातील या वेगळ्या अनुभवाविषयी काय सांगशील?
 
प्राजक्ता : गणेश आचार्य आणि त्यांच्या कोरिओग्राफीची मी चाहती आहेच. त्याबरोबरच सरोज खान यांचीही मी चाहती आहे. त्यामुळे यांसारख्या कोरिओग्राफर सोबत काम करण्याची खूप आधीपासून इच्छा होती. ही इच्छा "विनायका गजानना"च्या निमित्ताने पुर्ण झाली. त्यातही गाणं आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणपतीवर आधारित असल्याने एक वेगळीच ऊर्जा त्यानिमित्ताने मिळत होती. वैशाली माडेने हे गाणं तितक्याच सुंदर आवाजात म्हणल्यामुळे ते खूपच छान झालं आहे. त्यामुळे हे गाणं म्हणजे माझ्यासाठी एक संपूर्ण पॅकेज होतं. गणेशजी खूपच 'नॅचरल कोरिओग्राफ' करतात. त्यांची कोरिओग्राफी दिखाऊ, सजावटी वाटत नाही. 'डाऊन टू अर्थ' किंवा आपली वाटावी अशी असते.
 
 
प्रश्न : नृत्यांगना असताना अभिनय क्षेत्रामध्ये कशी आलीस आणि यापुढे अभिनय किंवा नृत्य यापैकी एकाची निवड करायची झाल्यास कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देशील ?
 
प्राजक्ता : सगळ्या ललित कला या एमकमेकांशी संबंधीत असतात, त्यात अशी वेगळी कोणतीही कला बाजूला काढता येत नाही. मी लहानपणापासूनच नृत्यासोबत वेगवेगळ्या नाटकांमधूनही काम केलं आहे, त्यामुळे नाच आणि अभिनय दोन्हीची मला आवड आहेच. नृत्य करतानाही अभिनय करावाच लागतो आणि अभिनय करतानाही नृत्याची तितकिच मदत होत असते. त्यामुळे दोन्ही तितक्याच महत्वाच्या आहेत. मात्र जर दोन्हीमध्ये एकाचीच निवड करावी लागली तर मी नक्की नृत्याचीच निवड करेन!
 
 
प्रश्न : आजपर्यंत तू अनेक गाण्यांमधून आम्हाला दिसली आहेस पण या गाण्यातून तु तुझे वेगळेपण कसे सिद्ध केले आहेस?
 
प्राजक्ता : माझ्यासाठी नक्कीच हे गाणं वेगळं आहे ! आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात मला माझ्या नृत्याची कला अशा पद्धतीने दाखवता आली नव्हती. किंवा असं गाणं माझ्याकडे आलाचं नव्हतं, मी रोमँटिक गाणी खूप केली; पण त्यात माझ्या नृत्याला वाव मिळेल अशी संधी नव्हती. हे पहिलं असं गाणं आहे की ज्यामधून मला सेमी क्लासिकल फोक डान्स करता आला. त्या अनुशंगाने हे गाणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
 
 
 
 
 
प्रश्न : आगामी काळात तू आम्हाला कोणत्या माध्यमातून दिसशील?
 
प्राजक्ता : सचिन दरेकर यांनी दिग्दर्शन केलेला आणि लिहिलेला एक वेगळ्या विषयावरील सिनेमात मी सध्या काम करत आहे. त्याचबरोबर आणखी एका चित्रपटाचे काम सुरु आहे, ज्याची आता मी काहीच माहिती देऊ शकणार नाही. या दोन महत्वाच्या चित्रपटातून लवकरच मी तुम्हा सर्वांच्या भेटीला येईन...
 
 
प्रश्न : मराठीमध्ये आत्तापर्यंत गणरायावर चित्रित झालेली बरीच गाणी आहेत, यामधील तुझं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं?
 
प्राजक्ता : तसं गणपतीचं कुठलंही गाणं आपल्या प्रत्येकालाच भावून जातं, ते आपलंस वाटतं. पण त्यातही 'अष्टविनायक' या चित्रपटातील मुख्य 'अष्टविनायकाचं गाणं' कधीही लावलं तरीही ते तेवढ्याच तन्मयतेने आजही मला ऐकावंसं वाटतं. त्या गाण्यात एक वेगळीच भन्नाट जादू आहे!
 
 
प्रश्न : 'रणांगण' चित्रपटाबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील?
 
प्राजक्ता : 'रणांगण' या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे, आता त्यातील प्रमुख व्यक्तिरेखांचे 'लूक्स' प्रेक्षकांसमोर येत आहेत. ते प्रेक्षकांनाही खूप आवडत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि स्वप्निलचं कामही फार वेगळं असणार आहे. स्वप्नील व सचिन पिळगावकर यांच्या दर्जेदार अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट जरुर बघा !
 
 
 
 
- शब्दांकन
सोनाली टिळक