निसर्गाचं अलौकिक सामर्थ्य
महा एमटीबी   05-Apr-2018
 
 

निसर्ग संवाद साधणारा आहे. पशू, पक्षी आणि मानवाशी संवाद साधून, मैत्रीचा हात पुढे करतो. अनेक जीवांना जीवदान देतो. निसर्ग सकल सृष्टीला सजग करतो. पानांची सळसळ, पाण्याचा प्रवाह चैतन्याची जाणीव करुन देतो. चैत्रपालवी मनाला साद घालते. एकीकडे सूर्याचं वाढतं तेज, तर दुसरीकडे आम्रवृक्षांतून कोकिळेचं कूजन! आसमंत स्वच्छ शुद्ध झालेला! मनाला शुद्धतेचा संदेश देणारा निसर्ग! पुढे घडणार्‍या घटनांची सूचना देतो. भविष्याची नांदी रचतो. आपण त्याच्या सहवासात राहिलो, म्हणजे हा वेगळा गुण लक्षात येतो. त्याचं सूक्ष्मनिरीक्षण केलं की, त्याची भविष्यवाणी कळते.
 
माणसं भ्रमणध्वनीच्या म्हणजे कृत्रिम, यांत्रिक वस्तूच्या सहवासात जास्त वेळ व्यतीत करतात. त्यामुळे निसर्गाच्या सहवासातून प्राप्त होणार्‍या आनंदापासून दूर राहतात. तो मैत्रीसाठी, संवादासाठी उत्सुक असतो. परंतु, माणसं यंत्राच्या अधीन झाल्यामुळे, त्यांच्या हे लक्षात येत नाही. त्याचं लक्ष जवळ वावरणार्‍या माणसांकडे, नात्यांकडे नसतं. मग निसर्गाची हाक कानी कशी येईल? माणसामाणसातील संवाद संपला आहे. भावनांचा ओलावा नाहीसा होऊन, कोरडेपणा आला आहे.
 
संतांना कलियुगातील यंत्रयुगाचा धोका लक्षात आला होता. त्यांनी निसर्गाला सगे, सोयरे, सोबती मानलं. सागर, सरिता आणि डोंगर, जंगलं यांना आपलं मानलं. समस्त समाजाला निसर्गाकडे वळवण्याचा सोपा उपाय निवडला. स्वत: निसर्गाच्या सान्निध्यामध्ये साधना केली. निसर्गात लपलेल्या भगवंताला शोधलं. जप, तप, ध्यान करुन, स्वानुभव कथन केले. निसर्गातील पंचमहाभूतांचं माहात्म्य वर्णन केलं. निसर्गाच्या कुशीत साधना लवकर फलदूप होते. भगवंताची प्राप्ती लवकर होते. संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर जाऊन साधना केली.
 
‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’’
 
हा आत्मानुभव त्यांनी अभंगांतून कथन केला. वृक्षांच्या शीतल छायेनं देहासह मनाला गारव्याचा लाभ झाल्याचं सांगितलं. ते एखाद्या सोयर्‍याप्रमाणे आपली सोय करतात. अशा सुखद वातावरणामधे पांडुरंगही रमतो. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या अस्तित्वाच्या प्रचितीने मनाला आनंद होतो. तुकारामांनी आपल्या गाथेमध्ये ते व्यक्त केलं आहे.
 
संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार ‘शुलीभंजन’ या डोंगरावर ध्यानावस्थेमध्ये, भगवंताच्या चिंतनामधे रममाण झाले. त्यांच्या मस्तकावर भुजंगानं छाया धरली तरी त्यांना भान नव्हतं. एका गुराख्यानं महाकाय भुजंग फणी उभारुन उभा असल्याचं बघितलं. तो गुराखी प्रचंड घाबरला. त्यांना हाका मारल्या, तेव्हा एकनाथ महाराजांची समाधी उतरली. ते भानावर आले. घनदाट जंगल, शुलीभंजन डोंगराचा दुर्गमभाग या नितांत नितळ अशा निसर्गामध्ये ताकद, शक्ती असून, भगवंताच्या निर्गुणत्वाची आत्मानुभूती आल्याचं एकनाथ महाराजांनी कथन केलं आहे.
 
हिमालयाच्या बर्फाच्छादित शुभ्र रांगा योगीजनांना, साधूंना नेहमीच साद घालतात. शेकडो साधू, संन्यासी, योगी आजही हिमालयामध्ये तप, साधना करत आहेत. भगवंतभेटीचा परमानंद उपभोगत आहेत. प्रत्यक्ष भगवान शिवशंकरदेखील तिथे वास करतात. भक्तांना दर्शन देऊन ज्ञान प्रदान करतात. मोक्षाचा लाभ करुन देतात. कृष्णाकाठी औदुंबराच्या गर्द छायेत, रानामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी साधना केली. दत्तप्रभूंना प्रिय असणारा घनदाट अरण्याचा हा भाग आहे. रामदास स्वामींनी नंदिनी आणि गोदावरीच्या संगमस्थानी निसर्गाच्या सान्निध्यात तप करुन, शक्ती प्राप्त केली. तिथे सामर्थ्याची प्राप्ती झाल्यानं ते समर्थ झाले. संतांनी निसर्गाच्या स्थानी साधना करुन, निसर्गातील शक्तीचा अनुभव घेतला. निसर्गाशी मैत्रभाव जुळला की, चैतन्याशीसुद्धा तो सहजपणानं जुळतो.
 
निसर्गाच्या भाषेचे आकलन झाले की विश्र्वाशी संवाद साधण्याची कला साधता येते. निसर्ग मानवी मनाला प्रेरणा देणारा, ऊर्जा प्रदान करणारा आहे. तो लौकिकापासून पारलौकिकापर्यंतच्या वैभवाची प्राप्ती करुन देतो. जे निसर्गामध्ये आहे तेच मानवामध्ये आहे. शांती, परमशांती प्रदान करण्याची क्षमता याच्याठायी आहे. कलियुगामधे शांतीचा दुष्काळ पडलेला असताना निसर्गाच्या ठायी शांतीचा सुकाळ आहे, असं ज्ञानेश्र्वर माऊली सांगतात. म्हणूनच संतांच्या ठायी शांतीची शीतलता नित्य वास करते.
 
आपल्याला शांतीचा लाभ होण्यासाठी संतांनी निसर्गाच्या अद्भुत खजिन्याचं महत्त्व विशद केलं. नरदेहाद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा सुंदर मार्ग निसर्ग होय. निसर्गाचं संरक्षण, संवर्धन करणारे संत वंदनीय आहेत. निसर्ग आपल्या सर्वांगाचं संरक्षण करतो. त्याला जपलं की तो आपल्याला जपतो. त्याच्या संवर्धनामध्ये आपलं आत्मिक हित सामावलेलं आहे. चैतन्यामधून महाचैतन्याची प्राप्ती सुगमपणानं होते. भगवंत नादमय रुपात जाणवतो. भगवंत प्रकाशमय असल्याचा साक्षात्कार देणारा निसर्ग महान आहे. सर्व प्राणीमात्रांठायी वास करणार्‍या हरीचं मनोहारी दर्शन घडवणारा निसर्ग शक्तिमान आहे. तो साम्य भावापर्यंत सहजपणानं घेऊन जातो. ऊर्जेचा अफाट साठा याच्याठायी एकवटलेला आहे. म्हणून सामान्य माणसानं निसर्गाच्या अलौकिक शक्तीचा लाभ घेऊन, आत्मिक सुखाची प्राप्ती करुन घेणं नितांत गरजेचं आहे.
 
 
 
 
- कौमुदी गोडबोले