सामान्यांच्या 'स्टेप्स'मुळेच मी आज इतका लोकप्रिय : गणेश आचार्य
महा एमटीबी   04-Apr-2018
 

 
 
मराठीमध्ये सध्या 'रणांगण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. स्वप्नील जोशी प्रथमच या चित्रपटातून 'निगेटिव्ह' भूमिकेत दिसणार आहे त्याचबरोबर बऱ्याच वर्षांनी स्वप्नील व सचिन पिळगावकर एकाच चित्रपटात काम करत आहेत. हे तर या चित्रपटाचे विशेष आहेच पण याशिवाय प्रसिद्ध नृत्यरचनाकार (कोरिओग्राफर) गणेश आचार्य 'रणांगण'मधील एका गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीशी जोडले जात आहेत. "विनायका गजानना" हे रणांगण मधील पाहिलं गाणं गेल्या आठवड्यात प्रेक्षकांसमोर आले आहे. बघता बघता या गाण्याने २ लाखाच्या आसपासच्या व्यूअर्सचा टप्पा देखील पार केला. या गाण्याला मिळालेल्या या यशाचे मोठे श्रेय कोरिओग्राफर गणेशजी व या गाण्यातील नृत्यांगना व प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना जात असल्याची सध्या चर्चा रंगत आहे. हेच औचित्य साधून गणेश आचार्य यांनी 'महा एमटीबी'शी विशेष खास बातचीत केली आहे.
 
 
प्रश्न : बॉलीवूडमध्ये एक यशस्वी कोरिओग्राफर म्हणून आज तुमच्याकडे पहिले जाते. यशाच्या शिखरावर असताना हिंदीतून मराठीत येण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात व तो अनुभव कसा होता?
आचार्य : इतकी वर्ष मी बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफी केली पण तेव्हा माराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी किंवा प्रेक्षक हे मला जास्त ओळखत नव्हते, त्यामुळे तेव्हा मराठीमध्ये काम करता आले नाही. पण मी मराठी माणूस आहे, त्यामुळे मला भाषेची कधी अडचण वाटली नाही. त्यातही 'रणांगण' व 'भिकारी' या दोन्ही चित्रपटात स्वप्निल जोशी होता, तो मला अगदी माझ्या लहान भावासारखा आहे. त्याच्यामुळे मराठी चित्रसृष्टीत रुळायला अधिक मदत झाली. त्यातच 'रणांगण'मधील मी करत असलेलं गाणं गणपतीचं असल्याने मी अधिक तीव्रतेने याकडे आकर्षित झालो. यापुढेही मराठी चित्रसृष्टीत काम करायला मला नक्कीच आवडेल.
 
 
प्रश्न : आजपर्यंत तुम्ही हिंदीतील अनेक दिग्गज अभिनेत्रींसाठी कोरिओग्राफी केली आहे, आता मराठमोळ्या प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल कामाबद्दल काय सांगाल?
आचार्य : प्राजक्ता ही खूप चांगली नृत्यांगना आहे. तिने नृत्याचे अधिकृत शिक्षण घेतले असल्याने त्यातील बारकावे तिला खूप पटकन समजतात. एखादे गाणे अधिक प्रभावी होण्यासाठी चेहऱ्यावरील हावभाव महत्वाचे असतात, प्राजक्ताचे याबाबत मला जास्त कौतुक वाटते की, ती खूप चांगल्या प्रकारे आपल्या हावभावांवर काम करते. 'विनायका गजानना' या गाण्याच्या निमित्ताने तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. भविष्यात परत तिच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल.
 
 
 
 
 
प्रश्न : कोरिओग्राफी करत असतानाच तुम्ही २०१७ मध्ये 'भिकारी' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. हिंदीत दिग्दर्शक म्हणून तुमची ओळख आहे पण मराठी रसिकांना यानिमित्ताने दिग्दर्शक गणेश आचार्य प्रथमच बघायला मिळाले, कसा होता मराठी चित्रपट दिग्दर्शनाचा अनुभव?
आचार्य : 'भिकारी' हा चित्रपट पुर्णपणे वेगळ्या धाटणीचा होता. त्याची जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली होती, ती खूप चांगली होती, त्यांचा विषय खूप चांगला होता. तसंच त्या चित्रपटामध्ये आई आणि मुलाचे खूप सुंदर नातं दाखविण्यात आलं होतं. चित्रपटाच्या भावनिक विषयामुळेच मराठीतल्या पहिल्या दिग्दर्शनासाठी मी 'भिकारी'ची निवड केली होती. यानिमित्ताने मराठी चित्रसृष्टीशी मी नव्याने जोडला गेल्याचा मला अभिमान वाटतो.
 
 
प्रश्न : तुम्ही 'भिकारी' आणि 'रणांगण' या दोन्ही चित्रपटात गणपतीवर आधारित गाणी कोरिओग्राफ केली आहेत, मग दोन्हीचे वेगळेपण कसं सांगाल?
आचार्य : दोन्ही गाणी गणपतीचीच असली तरी या दोन्हींचा आशय वेगळा आहे. दोन्ही गाण्यांमध्ये खूप गोडवा आहे, तसंच दोन्हीही खूप एनर्जेटीक गाणी आहेत. अगदीच वेगळेपण सांगायचे झाले तर 'रणांगण'च्या गाण्यातून एक कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यातूनच चित्रपटाच्या नायकाची एंट्री होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करुन त्याचे दिग्दर्शन केले आहे. 'देवा हो देवा' पेक्षा 'विनायका गजानना' हे गाणं मला अधिक भावलं.
 
 
 
 
 
प्रश्न : तुमच्या गाण्यातील बहुतांश 'स्टेप्स' खूप प्रसिद्ध होतात. सध्या गाजत असलेल्या 'खली-बली'च्या स्टेप्सची सुद्धा प्रचंड प्रशंसा होत आहे. अशा 'स्टेप्स'ची निर्मिती करताना त्यामागची संकल्पना तुम्हाला कशी सुचते?
आचार्य : मला गाणं आवंडल की त्या गाण्यामध्ये जशी कोरिओग्राफी योग्य वाटते तशी मी करतो. सामान्य प्रेक्षकांना मी आवडतो, ते मला पसंत करतात म्हणून कदाचीत माझ्या 'स्टेप्स' हीट होत असाव्यात. माझी कोरिओग्राफीसुद्धा सामान्य प्रेक्षकांसाठीच असते, जसे ते डान्स करतील त्याप्रमाणे विचार करुन ती कोरिओग्राफी मी करतो. आणि म्हणूनच कदाचित मला यश मिळत असावे.
 
 
प्रश्न : यापुढे मराठी चित्रसृष्टीमध्ये कशा प्रकारचे काम करायला आवडेल ?
आचार्य : मी आधी सांगितलं तसं मला भाषेचा काही प्रॉब्लेम नाही, माझ्या काही अवास्तव मागण्या देखील नाहीत, मला प्रेमाने जिथे बोलवले जाईल, तिथे मी काम करेन. काम महत्वाचे आहे, त्यामुळे मराठी हिंदी असा काही विषय नाही.
 
 
- शब्दांकन
सोनाली टिळक