एका लढवय्याचा प्रेरणादायी प्रवास
महा एमटीबी   04-Apr-2018
 
 
 
 
 
अपंगत्वाचा बाऊ न करता मुरलीकांत पेटकर यांनी जलतरणामध्ये आतापर्यंत देशासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत, भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे.
 
आपल्या प्रत्येकामध्ये काही खास गुण, कला-कौशल्यं दडलेली असतात. फक्त गरज असते ती त्याला पारखण्याची. आपल्या आवडी-निवडीनुसार काही व्यक्ती त्या-त्या क्षेत्रामधले ज्ञान मिळवून करिअर करण्यासाठी सज्ज होतात. आपली स्वप्नं साकारण्यासाठी नव्या उमेदीने, महत्त्वाकांक्षा बाळगून त्यांचा प्रवास सुरू होतो. पण, हा प्रवास सुरू असताना दुर्दैवाने काही व्यक्तींच्या बाबतीत काही घटना घडतात आणि मग हा प्रवास इथेच संपणार की काय, अशी भीती वाटू लागते. पण, अशा कठीण परिस्थितीवर मात करत आयुष्यात उठलेल्या वादळाला तोंड देत पुन्हा काही व्यक्तींची एक नवीन इनिंग सुरू होते. अशीच महत्त्वाकांक्षा बाळगणारे आणि यंदा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मुरलीकांत पेटकर यांचा प्रवास रंजक असाच आहे.
 
मुरलीकांत यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४७ मध्ये इस्लामपूर येथे झाला. मूळचे सांगलीचे असणारे पेटकर हे १९७९ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले. मुरलीकांत पेटकर यांना शालेय वयापासूनच खेळाची आवड. त्या काळात अभ्यासाबरोबरच ते कुस्ती खेळण्यावर विशेष भर द्यायचे. त्यानंतर काही कारणांमुळे ते पुण्यातल्या आपल्या आत्याकडे राहू लागले. मुरलीकांत पेटकर यांनी सैन्य दलामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी संपादित केली. यानंतर काही वर्षांनी पेटकर सिकंदराबाद येथे बॉईज बटालियन लष्करात भरती झाले. मग त्यानंतर ते हॉकीकडेही वळले. १९६० मध्ये पेटकर लष्कराच्या संघाकडून हॉकी खेळत होते, पण तिथे संघात निवड होणे मुश्किल आहे, हे जाणवल्यानंतर ते बॉक्सिंगकडे वळले. त्यात राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चमकही दाखविली. खरंतर मुरलीकांत यांचे खेळाशी खूप जवळचे नाते होते. मुरलीकांत यांना बॉक्सिंग, स्विमिंग, शॉटपुटमध्ये विशेष रूची होती. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या बरोबर झालेल्या युद्धामध्ये मुरलीकांत यांच्या पायाला नऊ गोळ्या लागल्याने त्याचा एक पाय निकामी झाला. दिव्यांग झाल्यानंतर मुरलीकांत यांनी हार मानली नाही. यापुढे जे काही करायचं ते खेळाच्या मैदानामध्ये करून दाखवायचं, असा निश्चय त्यांनी केला. अर्थात, हा प्रवास इतका सोपा नव्हता. रोज वेगवेगळ्या खेळांचा सराव करत असताना त्यांना वेदना व्हायच्या. पण, तरीदेखील या परिस्थितीचा सकारात्मक विचार करून हाताळायचे असं त्यांनी मनाशी पक्क केलं होतं. याकाळात त्यांच्या कुटुंबाने तसेच त्याच्या प्रशिक्षकांनी त्यांच्यासाठी विशेष मेहनत घेतली. या सर्वांमध्ये जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला. पायात ताकद नसली तरी ते आत्मविश्वासाच्या जोरावर समर्थपणे उभे राहिले. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना व्यायाम म्हणून जलतरणाचा सल्ला दिला.
 
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पेटकर यांनी बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्या काळात सेनादलातले सर्व सहकारी जलतरणाला त्यांना घेऊन जायचे आणि त्यांची काळजीही घ्यायचे. विजय मर्चंट आणि लष्करातील अधिकार्‍यांच्या मदतीमुळे ते पुढे इंग्लंडमध्ये १९६८ मध्ये स्पर्धेसाठी गेले आणि तिथे त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. १९७२ साली जर्मनीला झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर जलतरणासाठी ३७.३३ सेकंदामध्ये जागतिक विक्रमकरत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक त्यांनी पटकावले. त्यानंतर भालाफेक आणि गोळाफेकमध्येही भाग घेतला. तिथेही आपल्या कौशल्याची छाप पाडली. १९७५ साली पेटकर यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी एकूण १२७ सुवर्ण, तर १५४ रौप्यपदके पटकावली आहेत. ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर पेटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले, अशी भावना त्यांनी ‘पद्म’ पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केली होती. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मुरलीकांत पेटकर सांगतात की, “एक दिव्यांग क्रीडापटू म्हणून केलेल्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. माझा हा संघर्ष इतरांना प्ररेणादायी वाटत असल्यामुळे आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवल्याचं एक वेगळं मानसिक समाधान मिळतं. खरंतर माझ्या आयुष्यात हा अपघात घडला नसता, तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. जीवनाच्या अनेक टप्प्यावर असे छोटे-मोठे अपघात घडत असतात. फक्त तुम्ही त्यावेळी खचून न जाता त्याला धीराने कसं सामोरं जाता, त्यावर पुढची सगळी गणितं अवलंबून असतात. आज माझ्यासारखे अनेक खेळाडू तयार व्हावेत, यासाठी माझा आतापर्यंतचा प्रवास ऐकण्यासाठी मला काही शाळा, संस्था आमंत्रित करत असतात. तिथे माझा खूप आदर केला जातो. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असं मी मानतो.’’ आज भोपाळमध्ये सैन्याने मुरलीकांत पेटकर यांच्या नावाचा जलतरण तलाव उभारला आहे. रिओ द जनेरिओला झालेल्या ऑलिम्पिकमध्येच दिव्यांगांनी मिळविलेल्या पदकांची संख्या ही खरेतर जास्त होती. म्हणजेच दिव्यांग क्रीडापटू सामान्य क्रीडापटूंपेक्षा कुठेही कमी नाहीत, हेच खरं.
 
 
 
- सोनाली रासकर