करण माधुरीला म्हणतोय, ' चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली बकेट लिस्ट'
महा एमटीबी   03-Apr-2018


 
माधुरी दीक्षित असं नाव जरी घेतलं तरी अजूनही अगदी शब्दशः हृदयात 'धकधक' होते. अनेक वर्ष झाली तिच्यानंतर अनेक अभिनेत्री आल्या-गेल्या पण माधुरीचे तिच्या रसिकांच्या मनातील स्थान आजही तसेच अबाधित आहे. कदाचित याच तिच्यावरील प्रेमापोटी करण जोहरने देखील माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाची प्रस्तुती करायचे ठरवले असणार. त्याच्याच जन्मदिनी म्हणजेच २५ मे रोजी माधुरीचा 'बकेट लिस्ट' हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय व या चित्रपटाला धर्मा प्रॉडक्शन 'ए ए फिल्म्स'च्या सहयोगाने प्रेसेंट करणार आहे.
 
 
हिंदी चित्रपट सृष्टीतील करण आणि माधुरी ही आणखी दोन मोठी नावं यानिमित्ताने मराठीशी जोडली जात आहेत. यासंदर्भातील घोषणा नुकतीच करण जोहरने आज ट्विटरवरून केली आहे. त्यात तो म्हणतोय की, ''माधुरी दीक्षितला मराठीत प्रस्तुत करत असल्याचा मला अभिमान आहे! चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली 'बकेट लिस्ट' २५ मे रोजी पूर्ण करूयात.
 
 

या अगोदरपासून माधुरीच्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तेजस देऊसकर याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यामध्ये रेणुका शहाणे, सुमित राघवन, शुभा खोटे हे मराठी चेहरे देखील दिसणार आहेत. सध्या करण जोहर 'सैराट'च्या अधिकृत हिंदी रिमेक असणाऱ्या धडकची निर्मिती करत आहे. आणि आता तो 'बकेट लिस्ट'ला प्रेसेंट करणार आहे. त्यामुळे एकूणच करणचे मराठी प्रति प्रेम अधिक वाढत असल्याचे दिसते. या वर्षाच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर यांच्या 'आपला माणूस' या चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली आहे व त्याला 'व्हायकोम १८'ने प्रेसेंट केले होते. 'मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने मराठी चित्रपट प्रेसेंट करण्याची 'बकेट लिस्ट'च्या माध्यमातून ही दुसरी वेळ आहे. आता याचा नक्की मराठी इंडस्ट्रीला कसा आणि किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात कळेलच...