कलेची राख
महा एमटीबी   03-Apr-2018
 

 
तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, अग्निपथ... या ओळी आज आठवण्याचे कारण म्हणजे अहमदनगर शहरात शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली भीषण आग आणि त्या आगीत जळून खाक झालेले कलाविश्र्व. एखाद्या कलाकाराची कला ही त्याचा श्वास असते. ती कला जपण्यासाठी तो आयुष्य वेचतो. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या या कलादालनात त्यांनी जमविलेल्या अनेकविध कलाकृती, पुस्तके, दुर्मीळ चित्रे व शिल्पे, त्यांना मिळालेली बक्षिसे व पुरस्कार, फायबरची प्राणी शिल्पे, त्यांचे फायबरचे मोल्ड असे सगळे कोट्यवधींचे कलाविश्र्व खाक झाले. सात-आठ वर्षांपूर्वीही त्यांच्या गुलमोहोर रोडवरील कलानगर चौकातील आर्ट गॅलरीला आग लागून त्यातही अनेक दुर्मीळ कलाकृती भस्मसात झाल्या होत्या. त्यातून उभारी घेत त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली, पण त्यानंतर रविवार १ एप्रिलला लागलेल्या आगीत त्यांचे सारे कलाविश्र्व भस्मसात झाले.
 
स्टुडिओच्या मागील बाजूस असलेला कचरा पेटवण्यात आला होता. ही आग पसरली आणि स्टुडिओतील इतर सामानाला लागली. आग लागली तेव्हा कांबळे याच स्टुडिओमध्ये होते. आग लागल्याचे त्यांना उशिरा कळले. आगीने रौद्र रूप धारण केले. आपल्या डोळ्यासमोर अनेकविध कलाकृतींची अशी राखरांगोळी होताना पाहून कांबळे व त्यांच्या पत्नी स्वाती कांबळे यांना जबर मानसिक धक्का बसला. प्रत्येक कलाकृती भस्मसात होताना त्यामागील कष्ट, घेतलेली मेहनत सगळंच उघड्या डोळ्यांनी बघावं लागणं, यासारखं दुसरं दुःख, दुर्दैव कलाकाराच्या आयुष्यात नाही. आगीच्या भीषणतेपुढे हतबल झालेले कांबळे हे केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकले आणि त्याचाच मानसिक धक्का त्यांना बसला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या कलाकृतींचे झालेले नुकसान हे पैशात कधीच भरून निघणार नाही आणि मनावरील घावही. एक एक कलाकृती जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली खरी, पण सोन्याला जितकी झळाळी द्याल ते तेवढे चकाकते, असे म्हणतात. प्रमोद कांबळेदेखील लवकरच अशाच उमेदीने पुन्हा उभे राहतील. फिनिक्स पक्षी राखेतूनच जन्म घेतो, तसे कांबळेही लवकरच पुन्हा उत्तमोत्तम शिल्पं साकारतील, अशी आशा आहे.
 
 
=============================================================== 
 
अपेक्षांचे ओझे आणि अपेक्षाभंग
 
‘लाईफ इज अ रेस’ म्हणणार्‍या ’थ्री इडियट’ चित्रपटातील बोमनच्या तोंडून सत्यच बाहेर पडते. चित्रपटात ’कामयाब होने के लिये नहीं, काबील होने के लिये पढों,’ म्हणणारा आमीर प्रत्येकाला समजावतो. पण, त्याचा परिणाम मात्र प्रत्येकावर होताना दिसत नाही. आजही सतत पुढे जाण्याची स्पर्धा, तुलना आणि असूया प्रत्येकात दडलेली आहे. तरुण पिढीत ही स्पर्धा तुलनेने तशी अधिक. सर्वसामान्य घरातून विशेषतः मुलांच्या मागे चांगला अभ्यास, सरकारी नोकरी आणि पगार यासाठी तगादा लावला जातो. कौटुंबिक अपेक्षांचे हे ओझे शालेय पातळीवरच मुलांच्या खांद्यांवर असते. पुढे ही स्पर्धा मोठी होते, कौटुंबिक अपेक्षा वाढत जातात, पण या संघर्षात कुठेतरी माणूस थांबतो आणि संघर्षाला, अपेक्षांच्या ओझ्याला एका क्षणात संपवतो ते थेट आत्महत्या करून.
 
डिप्रेशन थेरपी, मानसोपचारतज्ज्ञांकडे तरुणांनी धाव घेण्यासाठी अपेक्षांचे हेच ओझे कारणीभूत आहे. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर काय? केवळ या विचारानेच काही विद्यार्थी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. नुकतेच हरियाणातील एका विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत अव्वल क्रमांक न मिळाल्याने आत्महत्या केली. आत्महत्येसाठी तिने वडिलांचे पिस्तूल वापरले. अपेक्षांचे ओझे वाढल्यानेच तिने हा टोकाचा निर्णय घेतला असावा. दरम्यान, पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणार्‍या आनंद यादवनेही आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. त्यानेही वडिलांच्या पिस्तुलाचा वापर केला आणि तोंडात गोळी मारून घेत आत्महत्या केली. आनंद हा काही वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याला नैराश्यही आले होते. त्यातूनच त्याने मागील वर्षी डिप्रेशन थेरपी घेतली होती. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्य हेच कारण असावे, असा पोलिसांचा कयास आहे. मग थेरपीचा काहीच उपयोग आनंदवर झाला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. आत्महत्या केल्यानंतर त्या त्या व्यक्तीने आत्महत्या का केली? याचे मानसिकदृष्ट्या कयास बांधले जातात. काहीजण कारणे लिहितातही, पण अपेक्षांचे ओझे त्या व्यक्तीवर किती होते, याचा विचार ती व्यक्ती हयात असताना केला जात नाही. अपेक्षांच्या ओझ्याचे मूल्यमापन करणारे शास्त्र अद्याप तरी उदयास आलेले नाही. ज्या दिवशी ते उदयास येईल त्यावेळी अपेक्षांचे ओझे किती असते याचा अंदाज येईल. तोपर्यंत अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून किती आत्महत्या होतील, याची गणती न केलेलीच बरी.
 
 
 
  
- तन्यम टिल्लू