होमियोपॅथीबद्दलचे समज - गैरसमज भाग - २
महा एमटीबी   03-Apr-2018

 
होमियोपॅथी जशी दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे, अशावेळी काही लोकांमध्ये तिच्याबद्दल काही गैरसमजही निर्माण होत आहेत. यातील काही आपण मागील लेखामध्ये पाहिले. सामान्य लोकांमध्ये अजून एक गैरसमज असा आहे की, होमियोपॅथीच्या या छोट्याशा सफेद गोळ्या असाध्य रोगांवर कशा कार्य करणार? हे असे वाटणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत अनेक मोठमोठ्या गोळ्या, सिरप्स यांची सवय असलेल्या लोकांना असे वाटू शकते. पण, मी आपल्याला सांगू इच्छितो की, होमियोपॅथीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त औषधे आहेत आणि ती निसर्गामधील उपयुक्त अशा गोष्टींपासून नैसर्गिकरीत्या बनवली गेली आहेत. त्यामुळे अशा औषधांचे दुष्परिणामशरीरावर होत नाहीत व ही औषधे जेव्हा सफेद गोळ्यांमध्ये घालून रुग्णाला दिली जातात, तेव्हा त्यांमुळे अत्यंत असाध्य असे आजारही बरे होतात.

होमियोपॅथीची औषधे ही इतर औषधशास्त्रांप्रमाणे प्राण्यांवर सिद्ध केली जात नाहीत, तर निरोगी लोकांवर सिद्ध केली जातात. म्हणूनच होमियोपॅथीमध्ये माणसाच्या मन, बुद्धी आणि शरीराचा व्यवस्थित अभ्यास केला जातो.

होमियोपॅथीचा शोध लागेपर्यंत पारंपरिक औषधशास्त्र अस्तित्वात होते, ते कोणत्याही पक्क्या सिद्धांतांवर आधारित नव्हते. त्यांचे सिद्धांत सतत बदलत राहिले. आताही त्यांचे कुठलीही Fixed Principles नाहीत.

होमियोपॅथी मात्र पहिल्यापासूनच पक्क्या सिद्धांतांवर आधारित आहे व हे सर्व सिद्धांत नैसर्गिक आहेत.

औषधशास्त्राचा प्रणेता म्हणून हीपोक्रेटीसचे नाव घेतले जाते. याच हीपोक्रेटीसने असे नमूद करून ठेवले आहे की, औषधशास्त्र हे दोन नियमांवर आधारित आहे.

१) समानतेचा नियम (Law of similar)

२) विषमतेचा/विरूद्धतेचा ( Law of opposites)
नियम यातील होमियोपॅथी ही समानतेच्या सिद्धांतावर अवलंबून आहे आणि इतर औषधशास्त्रे विरूद्धतेच्या नियमावर काम करतात. होमियोपॅथीला म्हणूनच ‘समचिकित्सापद्धती’ असेही म्हटले जाते.

अजून एक गैरसमज लोकांमध्ये असा आहे की, होमियोपॅथी हे सिद्ध केलेले विज्ञान नाही, खरं तर असे मुळीच नाही. होमियोपॅथी हे औषधशास्त्र पूर्णतः वैज्ञानिक निकषांवर सिद्ध केलेले आहे. औषधे बनवण्याची पद्धतीसुद्धा पूर्णतः वैज्ञानिक आहे. हे औषधशास्त्र पूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित आहे. या शास्त्राचे नियमहे निसर्गाचे नियमअसल्यामुळे त्यात बदल झालेला नाही. याच नियमांवर आधारित असल्यामुळे होमियोपॅथी गेली सव्वा दोनशे वर्षे झपाट्याने फोफावते आहे. इतर औषधशास्त्रांप्रमाणेच या शास्त्राचाही साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रमअसतो. शरीरशास्त्र (anatomy), शरीररचना व क्रियाशास्त्र (physiology), शल्यचिकित्सा (surgery), स्त्रीरोगशास्त्र (gynecology), औषधनिदानशास्त्र (medicine). हे सर्व विषय होमियोपॅथीमध्ये शिकवले जातात व सरकारमान्य पदवी विद्यार्थ्यांना मिळते. पदव्युत्तर उच्च शिक्षणाची सुविधाही होमियोपॅथीमध्ये आहे, ज्याने डॉक्टरांना होमियोपॅथीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर होता येते.

होमियोपॅथीचे यश, उपयुक्तता व रूग्णांना होणारा फायदा लक्षात घेऊन, आता भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने ‘आयुष’ मंत्रालय स्थापन केले आहे आणि या मंत्रालयातर्ङ्गे होमियोपॅथीचा विकास होत आहे. होमियोपॅथीमधील संशोधनासाठी आयुष मंत्रालय सर्वतोपरी साहाय्य करत आहे. इतकेच नव्हे, तर भारताचे माननीय राष्ट्रपती व माननीय पंतप्रधान यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी होमिओपॅथीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली गेली आहे.

संपूर्ण भारतामध्ये होमियोपॅथीची सरकार मान्य अशी दोनशेपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत व या महाविद्यालयांतून दरवर्षी हजारो होमियोपॅथिक डॉक्टर्स भारतात सेवा देत आहेत.

होमियोपॅथीबद्दल अजूनही बरेचसे गैरसमज लोकांमध्ये रुढ आहेत. त्याबद्दल आपण पुढील भागात माहिती घेणार आहोत.- डॉ. मंदार पाटकर