मनींचे मनींच राहिले आंत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

मानवी मन ही चंचलतेची जणू एक मूर्तीच... भावनांचा कल्लोळ, अवतीभवतीच्या अनुभवांचे कडबोळे आणि वाढत्या वयाचे जाणवणारे भान... असा हा मनाचा प्रवास सोपा नसतोच मुळी. तो आपला स्वत:चा असला तरी एकट्याचा मात्र नसतो. कुट्ट अंधारात मन चाचपडत बसते. मात्र, हाती काहीच लागत नाही. अशावेळी भरकटलेल्या ‘मनोवाटां’ची सकारात्मक वाट दाखवते ते मानसशास्त्र. भारतीय समाजात काहीशा दुर्लक्षित, पण अतीव महत्त्वाच्या शास्त्राचे अनेकविध पैलू दर मंगळवारी ‘मनोवाटा’ या नवीन सदरातून उलगडणार आहोत.


आपल्या जीवनाचा मार्ग चालायला सुरुवात केल्यावर, तो वाटतो तितका सरळ नाही हे आपल्या लक्षात येते. या मार्गावर असणार्‍या व अपेक्षित नसणार्‍या वेड्यावाकड्या वळणावरच आपण आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी शिकत जातो. जीवनपथावरचे अनेक मार्ग अचानक थांबतात, संपतात वा नको असलेल्या वळणावर उभे करतात. अशा वळणांवर आपल्याला कळत नाही की, आता पुढे जाणे योग्य ठरेल की मागे वळलेले बरे? की आता या वळणावरचा हा अपरिचित मार्ग घ्यायला हवा? या मार्गावर चालतच राहावे का? पुढे काय होईल ते होईल, पाहून घेऊ! की थोडा वेळ थांबूयात, विचार करुयात आणि मग हे पुन्हा बघूयात? अशा अनेक विचारांचे चक्र आपल्या डोक्यात फिरत असते. खरे तर आपल्याला खूप सार्‍या प्रश्नांचे बिनचूक उत्तर मिळालेले हवे असते. पण, अशी बिनचूक उत्तरे पांथस्थाला जीवनपथावर मिळतीलच असे नाही. ती मिळायलाच हवीत, असाही काही नियमजगाच्या इतिहासात लिहिलेला नाही. पण, आपल्या अवतीभवतीची माणसं आपण ज्या कठीण प्रसंगांतून जात असतो वा गेलेले असतो, त्या प्रसंगांतून गेलेली असतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला अनेक वेळा मार्गदर्शन मिळतं. कदाचित बिनचूक उत्तर मिळेल असे नाही. पण, त्या अनुभवातून आपण एकटे पडलो नाही आहोत हे कळलं तरी खूप बरं वाटतं. ही मंडळी म्हणजे आपले कुटुंबीय, मित्रमंडळी. त्यांच्या अनुभवांतून आपल्या गुंतलेल्या समस्यांची वाट आपल्याला सापडते. कधी त्यांनी वापरलेली क्लृप्ती जशीच्या तशी आपल्या कानी येते. पण हेही खरे आहे की, अनेक वेळा या जवळच्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत. आपल्या बौद्धिक क्षमतेला या गोष्टी कधी खूप क्षुल्लक वाटतात, तर कधी त्या व्यावहारिक नसतात. भावनिक पातळीवर त्या आपल्याला कळत नाहीत. आपली विचारसरणी व दृष्टिकोन आपण ज्या परिस्थितीतून जातो वा ज्या सांस्कृतिक वातावरणातून येतो, त्यावर आपल्या जगण्याची एक खास शैली ठरलेली असते. आपली एक वेगळी विचारसरणी असते. त्या अमुक वैचारिक पार्श्वभूमीतून आपण आयुष्यातले बरे-वाईट निर्णय घेतो. आपली आजी त्या काळात ‘देवभक्ती’ या विषयावर जसे विचार करीत असे, तसे विचार आज आपण करू शकत नाही. पूर्वी आई सुशिक्षित असून तिला नोकरी करायची परवानगी नसे. तीसुद्धा दुसर्‍या शहरात जाऊन करायची असेल, तर इच्छा असूनही तिला जाणे शक्य होत नसे. कारण, घरापासून दूर, दुसर्‍या शहरात मुलींना पाठवणे त्या काळी नातेवाईकांना पटण्यासारखे नव्हते. अशा वेळी त्यांच्या मनात किती वैचारिक व भावनिक संघर्ष झाला असेल? असे संघर्ष होतात तेव्हा त्याचे एक निश्चित उत्तर नसते. हा संघर्ष जितका बाह्य परिस्थितीचा असतो, तितकाच तो अंतर्मनाचाही असतो. अशा विषयांबद्दलची मते पिढीपिढीत बदलत जातात. म्हणून विषय तोच असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार संघर्ष घडतच असतो. म्हणून दोन व्यक्तींमध्ये, दोन पिढ्यांमध्ये मतभेद असतात. त्यातून प्रत्येकाच्या मनात आपल्या आयुष्यातील घडणार्‍या गोष्टी कशा असाव्यात, याचा एक आराखडा असतो, अपेक्षा असतात. त्या गोष्टी जेव्हा त्या पद्धतीने घडत नाहीत, तेव्हा वाद निर्माण होतात. या वादांतून उत्तर सापडले तर सगळाच आनंदी आनंद. वैचारिक संघर्ष संपला व भावनिक कलहही टळला. पण, असे वास्तवात नेहमी होईलच असे नाही. त्या वादांची बेरीज-वजाबाकी इतकी तांत्रिक नसते. हे वाद आपल्या आयुष्यात खोलवर रुतलेले असतात. संघर्ष अटीतटीचे असतात. या सार्‍यांचे भविष्यावर दूरगामी परिणामहोत असतात. आपल्या अवतीभवतीच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींवर प्रचंड दबाव येत असतो. कदाचित आयुष्याचा मार्ग अकल्पितरित्या बदलत जातो. विचारांच्या गर्तेत भावनेच्या लाटा उठत असतात. अशा वेळी आपल्याला आपलं मन-विचार-भावना नियंत्रणात असाव्यात असं वाटतं. मन शांत व्हावं असं वाटतं. एका योग्य निर्णयाप्रत पोहोचावं असं वाटतं. संघर्षातून बाहेर यायला हवं, असं वाटतं. अशा वेळी कोणीतरी आपल्याला समजून घेत, या संघर्षातून मार्ग दाखवावा असं वाटतं. यावेळी गरज असते ती या सगळ्यांकडे प्रगल्भपणे व वस्तुनिष्ठपणे पाहणार्‍या व्यावसायिक चिकित्सकाची वा समुपदेशकाची.


समुपदेशन म्हणजे काय ?

समुपदेशन ही एक मानसिक उपचाराची पद्धत आहे. यात चिकित्सक संवाद साधून व्यक्तीच्या समस्येबद्दल व वादविवादांबद्दल मार्ग दाखवतो. व्यक्तीचा यात मानसिक आजार असतो असे नाही. पण, व्यक्तीच्या मनातील व आयुष्यातील अनेक प्रसंगांबद्दल, घटनांबद्दल व नात्यांबद्दल अनेक प्रश्न असतात, समस्या असतात, भावनिक द्वंद्व असतात. या सगळ्यांतून त्यांना समर्पक निर्णय घेता येत नाही. अशा वेळी समुपदेशनात अशा समस्या व भावनिक कल्लोळांबद्दल प्रत्येक व्यक्तीला साजेसं मार्गदर्शन केलं जातं. समस्येतून मार्ग कसा काढावा हे शिकवलं जातं. समुदपदेशनाबद्दल अनेक लोकांची अनेक मतं असू शकतात. पण, सामान्यपणे समुपदेशन ही एक सुरक्षित व विश्वासू वातावरणात केलेली उपचाराची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत ज्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यातील काही गोष्टी बदलायची गरज भासते. अशा व्यक्तीला व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाते. समुपदेशक तुम्ही नेमके काय करावे, याचा शॉर्टकट देत नाहीत, तर तुमचे विचार, भावना व संघर्ष तुम्ही कसा समजावून घ्यावा व आपल्या आयुष्यातील या समस्यांशी कसे जुळवून घेता येईल किंवा कसा मार्ग काढता येईल हे शिकवतात.

पुढील भागांमधून याविषयी आपण अधिक सविस्तरपणे ‘मनोवाटां’चा धांडोळा घेणारच आहोत.



- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@