करु समर्थ भारतास …!
महा एमटीबी   27-Apr-2018
….पण नक्की कार्यक्रम काय आहे ?’ महेश आठवलेंनी मला दुसऱ्यांदा विचारलं. मी त्यांना सांगायचं मुद्दाम टाळत होतो. कारण रक्तपेढीच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम असला तरी त्यांच्या वर्किंग डे ला त्यांनी पळापळ करु नये असं मला वाटत होतं. पण त्यांनी आग्रहाने विचारल्यावरुन मी अखेर त्यांना कार्यक्रमाबाबत कल्पना दिली. एका मोठ्या जाहीर कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक प्रकल्पांचे स्टॉल्स लावले जाणार होते. यात जनकल्याण रक्तपेढीचादेखील सहभाग असणार होता. रक्तपेढीच्या वतीने या स्टॉलवर माहिती देण्यासाठी रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांबरोबरच काही स्वयंसेवकही असावेत असा विचार आम्ही केला आणि त्याच संदर्भात महेश  आठवलेंशी संपर्क केला गेला होता. पण त्यांचा तो कामाचा दिवस असल्याने त्यांचे येणे कठीण असल्याचे दिसतच होते. पण आमचा अंदाज चुकला. कारण ’हा कार्यक्रम तर एक चांगली संधी आहे’ असे म्हणत महेशरावांनी त्या दिवशी चक्क सुट्टी टाकली आणि ते दिवसभर रक्तपेढी कर्मचाऱ्यांबरोबर येणाऱ्या - जाणाऱ्यांना रक्तपेढीची माहिती देत अक्षरश: पाय रोवून उभे राहिले.

--------------------------


एका नावाजलेल्या बॅंकेमध्ये शाखाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुरेश पराड हे एके दिवशी आपल्या धर्मपत्नी व इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलास घेऊन रक्तपेढीत आले आणि या दोघांसमोर त्यांनी रक्तदान केलं. निमित्त होतं, या मुलाच्या वाढदिवसाचं. ’माझा मुलगा सध्या रक्तदाता होऊ शकत नसला तरी ’योग्य वयात रक्तदान करायचं असतं, हे त्याला दिसायला हवं, म्हणून त्याला सोबत घेऊन आलो,’ असं श्री. पराड यांनी सांगितलं. अन्य वेळांतही ते रक्तपेढीत येतात, आपला काही वेळ रक्तदाता, रुग्ण यांच्याशी संवाद करण्यासाठी मनापासून देतात. पहिल्या भेटीतच ’ माझ्या वेळात मला कोणतंही काम दिलं तरी चालेल’ असे त्यांनी बोलुन दाखवले होते.


--------------------------


निवृत्त बॅंक अधिकारी रवींद्र हेजीब यांना ज्या दिवशी वेळ असेल तेव्हा ते फोन करुन ’उद्या रक्तदान शिबिर कुठे आहे ?’ असं विचारतात आणि दुसऱ्या दिवशी शिबिराच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून हजर होतात. मग तिथे पडेल ते काम अत्यंत सकारात्मक भावनेतून ते करतात. याव्यतिरिक्त रक्तपेढीतून रक्तघटक घेऊन गेलेल्या रुग्णांना भेटायलाही ते रक्तपेढीच्या वतीने जातात. रुग्णांची आस्थेने विचारपूस करतात. एखाद्या कार्यक्रमास येणं शक्य नसेल तर आवर्जून फ़ोन करुन खेद व्यक्त करतात.

--------------------------


शिक्षणाने यंत्र अभियंता आणि एका कारखान्याचे संचालक असलेले अजय वैद्य हेदेखील असेच विलक्षण व्यक्तिमत्व. ’तुम्ही आम्हाला task सांगा, आम्ही ते पूर्ण करुन दाखवू’ अशा शब्दांत कारखान्याच्या कामात अंगवळणी पडलेला विश्वास ते रक्तपेढीच्या कामासाठीही बोलुन दाखवतात. खरोखरीच जे काम सांगितले जाईल ते पूर्ण शक्ती लावून तडीला नेण्याची त्यांची विलक्षण जिद्द काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्हालाही पहायला मिळाली.

--------------------------


अपर्णाताई कदम या एका बॅंकेत काम करतात आणि सुट्टीच्या दिवशी रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदाता नोंदणी, रुग्णसंपर्क अशा कामांमध्ये किंवा रक्तदान शिबिरांमध्ये लिखापढीच्या कामामध्ये आपले योगदान देतात.


--------------------------


डॉ. तेजस्विनी कुलकर्णी या स्वत: आयुर्वेद पदवीधर आहेत आणि रक्तपेढीच्या कामाबद्दल मनस्वी जिव्हाळा राखून आहेत. आपल्या उपलब्धतेनुसार त्यांनीही काही कार्यक्रमांतून आपला मूल्यवान वेळ दिला आहे. सध्या कौटुंबिक जबाबदारीचा विचार करुन वेळ व ठिकाणाच्या दृष्टीने अधिक सोयीच्या अन्य एका संस्थेसाठी त्यांनी निरपेक्षपणे काम करण्यास सुरुवात केली आहे.

--------------------------


वर उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तींशी जनकल्याण रक्तपेढीचा संबंध अगदी अलिकडे आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ’समर्थ भारत’ या व्यासपीठाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी रक्तपेढीशी जोडली गेली आहेत. कुठल्याही सामाजिक प्रकल्पाची खरी शक्ती असतात ती तिथे काम करणारी, वेळ देणारी ’माणसे.’ साधन-सामुग्री, पैसा वगैरे गोष्टी महत्वाच्या असल्या तरी माणसांच्या तुलनेत त्या दुय्यमच. सकारात्मक मनोवृत्तीची माणसे जर एकत्र आली तर कितीही मोठे काम तडीस जाऊ शकते, हे तर अनुभवसिद्ध आहे. आजच्या घडीला आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या विविध क्षेत्रांमध्ये असंख्य सामाजिक संस्था काम करत आहेत. या संस्थांमध्ये समर्पित मनोवृत्ती असलेली माणसेदेखील आहेत. परंतु काही समस्यांची व्याप्तीच इतकी असते की कितीही हात मदतीला आले तरी ते कमीच वाटावेत.

दुसऱ्या बाजुला ’सेवाभाव’ हा तर भारतीयांच्या रक्तातच रुजलेला आहे. एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण गेल्यानंतर साधा पत्ता जरी कुणाला विचारला तरी तो पत्ता सविस्तरपणे सांगायला उस्फ़ूर्तपणे आजुबाजुच्या तीन-चार व्यक्ती सहज जमा होतात, असे चित्र आपल्यापैकी बहुतेकांनी केव्हा ना केव्हातरी पाहिले असेल. विविध सार्वजनिक उत्सवांत कुठल्याही अपेक्षेविना रात्रंदिवस झटणाऱ्या, प्रसंगी पदरमोड करणाऱ्या कष्टाळू कार्यकर्त्यांची संख्याही कमी नाही. दिवाळसणाला आपल्या घरच्यांप्रमाणेच घरकाम करणाऱ्या महिलेस न चुकता भाऊबीज देणारी कितीतरी घरे आहेत. एकंदरीतच निरपेक्षपणे केलेले काम समाधान मिळवून देते, हा संस्कार बहुतांश लोकांच्या रक्तात आहेच. फ़क्त असे निरपेक्ष काम किंवा सर्वसामान्यांच्या भाषेतील ’चांगले’ अथवा ’पुण्याचे’ काम सातत्याने करायचे तर ते नक्की कुठे आणि कसे करायचे, याबाबत मात्र संभ्रमाची स्थिती आहे.

’समर्थ भारत’ हे या संभ्रमाला दिले गेलेले स्पष्ट उत्तर आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आजवर ज्या ज्या क्षेत्रात कामे उभी केली ती पूर्णत: ’परिणाम केंद्री’ (result oriented) स्वरुपाची कामे आहेत. एक वेळ ती प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असु शकतील पण या कामातून काय मिळवायचे आणि हे काम समाजोपयोगी कसे ठरेल याबाबतच्या कल्पना मात्र सर्वच ठिकाणी अगदी सुस्पष्ट आहेत. ’समर्थ भारत’ या व्यासपीठाची निर्मितीही अशाच विशिष्ट उद्देश्याने करण्यात आली. २०१६ साली पुण्यात झालेल्या ’शिवशक्ती संगम’ या संघाच्याच प. महाराष्ट्र प्रांताच्या भव्य सांघिक कार्यक्रमात सुमारे ऐंशी हजारजण पूर्ण गणवेषात उपस्थित होते. याखेरीजही अन्य व्यवस्थांमध्ये हजारो जणांनी आपला सहयोग दिला होता. एकंदर संघावर लोकांचा विश्वास वाढत असल्याचे ते द्योतक होते. या निमित्ताने जोडल्या गेलेल्या नवीन लोकांना त्यांच्या रुची - क्षमतेप्रमाणे चांगल्या कामांचे पर्याय देता आले पाहिजेत, असा विचार पुणे महानगरात नंतर केला गेला. वर म्हटल्याप्रमाणे एका बाजुला झपाटुन काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि दुसरीकडे उत्कट सेवाभाव मनात असलेला बहुसंख्य समाज – अशा दोन गोष्टींना परस्परांशी जोडता आले तर या जोडणीमधून सामाजिक संस्थांची ताकद वाढण्यास आणि पर्यायाने समाज सशक्त होण्यास कितीतरी मोलाची मदत होऊ शकेल, असे संयुक्तिक तर्कशास्त्र यामागे होते.

यासाठी मागील वर्षी ५ मार्च (२०१७) रोजी पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणावर एक भव्य कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमात सुमारे तीन हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. विविध सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या सुमारे नव्वदेक संस्था आणि सामाजिक कामासाठी काही ना काही वेळ निरपेक्षपणे देण्याची इच्छा असणारे हजारो स्वयंसेवक अशांचा हा एकत्रित कार्यक्रम होता. अशा संस्थांची व स्वयंसेवकांची आधी रितसर नोंदणी केली गेलेली होती. आपल्याकडे एखादा नवीन कार्यकर्ता निरपेक्षपणे काम करण्यास आला तर त्याला काम कसे द्यावे याबाबत सामाजिक संस्थांचेही प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. आलेल्या स्वयंसेवकांना शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, धर्मजागरण अशा निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रांशी या कार्यक्रमाव्दारे प्रत्यक्ष जोडले गेले आणि पुढील काळात या स्वयंसेवकांनीही या संस्थांसाठी आपले योगदान देण्यास सुरुवात केली. अनेक संस्थांना नवीन व कार्यक्षम असे कार्यकर्ते यातून सहजपणे उपलब्ध झाले. हे कार्यकर्ते सर्व सामाजिक स्तरांतील आहेत. सुरुवातीला दिलेली उदाहरणे ही अशाच काही कार्यकर्त्यांची आहेत. ही उदाहरणे अर्थातच प्रातिनिधिक आहेत. कारण केवळ जनकल्याण रक्तपेढीला जोडल्या गेलेल्या अशा कार्यकर्त्यांची संख्या वीसहून अधिक आहे.

सुरुवातीला एक कार्यक्रम म्हणून झाला असला तरी ’समर्थ भारत’ हा केवळ एक इव्हेंट नव्हे, तर ’कार्यकर्ते आणि कार्य’ यांना सातत्याने जोडत राहणारी ती एक चळवळ आहे. आता तर ’समर्थ भारत’ ने आपले काम एखाद्या अ-सरकारी (NGO) संस्थेप्रमाणे स्थिर स्वरुपात चालु ठेवायचे ठरवले आहे. त्यामुळे काहीतरी चांगले काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी हे व्यासपीठ सामाजिक कार्याच्या अनेक पर्यायांसह सदैव उपलब्ध आहे. हे पर्याय इच्छुक स्वयंसेवकांना उपलब्ध करुन देणे, कामाशी जोडणी करणे, पाठपुरावा करणे, आवश्यक तिथे कामांत बदल करणे अशा यंत्रणा सक्षमपणे उभ्या रहात आहेत. समाजात सज्जनशक्ती प्रचंड आहे हे खरेच, पण दुर्दैवाने ती विखुरलेली आहे हेही वास्तव आहे. विखुरलेली ही सज्जनशक्ती एकत्र आली तरच हा देश खऱ्या अर्थाने समर्थ होऊ शकेल हा ’समर्थ भारत’ चा गाभा आहे.

काम चालु आहेच, गरज आहे फक्त आपल्या सहभागाची !


- महेंद्र वाघ