सहकार चळवळीच्या इतिहासातील सोनेरी पान : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील
महा एमटीबी   27-Apr-2018


सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ३७ वी पुण्यतिथी त्यानिमित त्यांच्या कार्यकतृत्त्वावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि भारतीय सहकार चळवळ अतूट नातं आहे. सहकार चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे पद्मश्री विखे पाटील होत. त्यांच्या नावाशिवाय सहकारी चळवळीचा इतिहास लिहिता येणार नाही. १९०१ मध्ये नगर जिल्ह्यातील लोणी बु. येथे त्यांचा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. शंभर-सव्वाशे वर्षापूर्वीच्या काळाचे अवलोकन केले म्हणजे तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती लक्षात येते. विशेषत: शेतकर्‍यांची हलाखीची स्थिती, दुष्काळ, पावसाचे अनिश्चित गणित यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जबाजारी होऊन सावकारशाहीच्या पाशात अडकला होता. शिक्षणाचा अभाव, दारिद्य्र, अडाणी, शेतीचा बेभरवसापणा यामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झाले होते. या परिस्थितीचा परिणाम विठ्ठलरावांच्या जीवनावर होणे स्वाभाविक आहे.

त्यांना शालेय शिक्षण अर्धवट सोडून वडिलांना शेतीच्या कामात मदत करावी लागली. परंतु त्यांच्या बालमनावर धर्मपरायणतेचे संस्कार घडत होते. इतरांप्रमाणे त्यांच्यावरही भागवत धर्माचा प्रभाव होता त्यामुळे मोठ्या श्रद्धेने विठ्ठलराव ग्रंथ पारायणात, कीर्तनात रंगून जात.


बालपणापासूनच चिकित्सक-चौकस वृत्ती, समाजजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण, तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेण्यात उपयोगी पडत होती. शिक्षणाच्याही पलीकडचे असलेले शहाणपण त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. हळूहळू घरच्या कारभारात लक्ष घालू लागले आणि नंतर गावच्या कारभारातही भाग घेऊ लागले. गावातील सहकारी सोसायटी डबघाईला आली होती. कारण घेतलेले कर्जफेड करण्याची ताकद शेतकर्‍यात नव्हती. याउलट, खासगी सावकार शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण करत कर्जाची दामदुप्पटीने वसुली करत होते. गहाण टाकलेली शेती गिळंकृत करून आर्थिक सुबत्तेमुळे चांगली पिके काढून अधिक श्रीमंत होत होते. विठ्ठलरावांनी गावच्या या सोसायटीची आर्थिक स्थिती इतर सहकार्‍यांच्या मदतीने सुधारण्यासाठी मेहनत घेतली. मूळ स्वभावातच पडद्यामागे राहून इतरांना मोठं करणं हे तत्त्व आयुष्यभर जपलं. कधीही मोठेपणाचा अहंकार आणि पदाची हाव धरली नाही. यथावकाश संसाराची जबाबदारी येऊन पडली. आई-वडील आणि आजी ही त्यांची दैवते होती. त्यांचे आज्ञापालन केले.

सहकारी साखर काढण्याचे दिव्य स्वप्न विठ्ठलरावांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने प्रत्यक्षात उतरून दाखविले. शेतकर्‍यांच्या मालकीचा साखर कारखाना काढणे ही त्या काळातील अशक्य कोटीतील गोष्ट होती. एकतर सामान्य शेतककर्‍यांकडे एवढं भांडवल कुठून येणार ? शिवाय एकत्र येऊन परस्पर विश्वासावर आपले आर्थिक जीवन सुधारणे याचाही अभाव त्या काळात होता. साधारणत: १९४०-४५ च्या दरम्यान कॅनालचे पाणी शेतीला मिळू लागले होते. त्यामुळे छोट्या प्रमाणावर ऊस शेती सुरू झाली होती, अशा स्थितीत विठ्ठलरावांनी गावोगावी जाऊन शेतकरी बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या आर्थिक हिताची चर्चा सुरू केली. त्यांना अडचणीही आल्यात परंतु त्याकडे दुर्लक्ष करत विखे पाटलांनी अखंड मेहनतीमुळे शेतकर्‍यांना एकत्र आणले. परिस्थितीची जाणीव करून दिली. आपला उद्धार आपणच करायचा असतो हे ठामपणे सांगितले. त्या काळात गावोगावी जाण्यासाठी आजच्यासारखी व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांनी घोड्यावर बसून गावोगावी जात शेतकरी बांधवांना एकत्र आणले आणि त्यांच्या सहकार्याने सहकारी तत्त्वावर सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी भांडवल उभारणी, सरकारी परवाने, यंत्रसामुग्रीची खरेदी, कारखाना उभारणीसाठी लागणारे तंत्रज्ञ आणि कुशल कारागिराची शोधाशोध सुरू झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहकारी कार्यकर्ता प्रकट होत होता. त्या काळात किमान भांडवल शेतकरी सदस्यांकडून गोळा करणे अशक्य होते; परंतु अथक प्रयत्नातून त्यांनी हे शक्य करून दाखवलं. पुढे कारखान्याची नोंद करणे, आवश्यक मशिनरी खरेदी करणे, राज्य सरकारचे विविध परवाने मिळविणे आणि कारखान्याची उभारणी करून प्रत्यक्ष साखर उत्पादन सुरू करणे ही अत्यंत जटील प्रक्रिया सहकार्‍यांना बरोबर घेऊन पूर्णत्वास नेली. कुशल तंत्रज्ञ नेमताना काळजी घेतली. डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि स्व. वैकुंठभाई मेहता यांनी मनापासून सहकार्य केले. अध्यक्ष म्हणून डॉ. गाडगीळ यांना या पहिल्यावहिल्या सहकारी कारखान्याचे नेतृत्व बहाल करण्यात त्यांचा मनाचा उमदेपणा आणि शहाणपण दिसून येते. डॉ. गाडगीळांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला, मात्र कारखान्याचे श्रेय पद्मश्रींना देण्यास ते कधीच विसरले नाहीत.

काही वर्षांनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रवरानगर सहकारी कारखान्याला भेट दिली आणि पद्मश्रींच्या या भगीरथ प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या जीवनातील तो अत्यंत आनंदाचा क्षण होता. या साखर कारखान्याची त्यांनी पोटच्या अपत्याप्रमाणे काळजी घेतली. कारखान्याचा कारभार पारदर्शी ठेवला आणि सभासदाच्या हितसंबंधाला बाधा येणार नाही असे नेतृत्व केले. संस्था जीवनातही चढ+उतार होत राहतात. या न्यायाने काही काळ कारखान्याचे नेतृत्त्व दुसर्‍या गटाकडे गेले. या काळात त्यांनी सातत्याने सभासदांच्या हिताचे रक्षण केले. पुढे त्यांचे चिरंजीव पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी येथे प्रतिनिधीत्त्व केले. पद्मश्रींच्या निधनानंतर कारखान्याच्या सर्व सभासदांनी एकमुखाने ठराव करून प्रवरानगर सहकारी कारखान्याचे नाव बदलून ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना मर्यादित’ असे नामपरिवर्तन करून पद्मश्रींची स्मृती कायमस्वरूपी जपली आहे.

केवळ सहकारी कारखाना काढून थांबले नाहीत. आपल्या भागातील भूमीपुत्रांना मुलांना चांगले शिक्षण मिळावे, म्हणून उच्च शिक्षण मिळावे म्हणून या भागातील शेतकर्‍यांच्या मुला-मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रवरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी सल्लामसलत करून शाळा, महाविद्यालये स्थापन केली. आज वेगवगळ्या विद्याशाखेत ५० हजारच्या सर्वस्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांनी ग्रामीण आरोग्याची समस्या लक्षात घेऊन प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून या भागातील जनतेला कमीतकमी दरामध्ये आरोग्यसेवा पुरविण्यासाठी हॉस्पिटल सुरू केले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सहकारी चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शक राहतील. पहिला महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा कमालीचा साधेपणा. कार्यक्रम कोणताही असो - मात्र त्यांचा साधा वेष, धोतर, कोट आणि फेटा यात शेवटपर्यंत फरक पडला नाही.


दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता. हा गुण त्यांच्यात उपजतच दिसून येतो.


तिसरा म्हणजे अहंकाराचा अभाव. त्यांनी कधीही श्रेयाचा वाटा उचलला नाही. प्रवरा सह. साखर कारखान्याचा आपला अध्यक्षपदाचा मान त्यांनी थोर अर्थतज्ञ प्रा. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांना दिला. आज लोक श्रेयासाठी, पदासाठी धडपडताना दिसतात. त्यातून गटबाजी, राजकारण सुरूवात होते. अहंकाराचा वारा त्यांना कधीच लागला नाही.

चौथा महत्त्वाचा गुण म्हणजे बदलत्या परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेणे. आपली राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून संस्थेच्या व्यापक हितासाठी वेळ पडली तर जुळवून घेऊन त्यांनी प्रवरा सह. कारखान्याचे नेतृत्व केले.

पाचवा गुण म्हणजे स्पष्टवक्तेपणा. एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ते अत्यंत स्पष्टपणे सांगायला हयगय करीत नसत. त्यांच्या स्पष्टपणाचा प्रभाव त्यांच्या कृतीशील स्वभावात दिसून येत असे.


स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी पाठिंबा तर दिला पण अनेक भूमीगत कार्यकर्त्यांना हक्काचे घर म्हणजे विठ्ठलराव विखे पाटलांचे घर होते. त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य त्यांनी केले. क्रांतीकारी मंडळींनादेखील मनापासून सहकार्य दिले.

केवळ प्रवरा सह. शिक्षण संस्थांची स्थापना कारखाना काढून न थांबता शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. शिक्षण परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे, यावर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यासाठी शिक्षणसंस्था काढण्यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणमहर्षी भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांची पुण्यात जाऊन भेट घेतली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन विचार-विनिमय, चर्चा करून प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज ५० हजाराहून अधिक विद्यार्थी येथे वेगवेगळ्या विद्याशाखेत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

ग्रामीण आरोग्याची समस्या लक्षात घेऊन गरीब शेतकर्‍याला चांगल्या वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट स्थापन करून भव्य हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. महाराष्ट्रातील एक नामवंत वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक त्याला प्राप्त करून दिला आहे. सामान्य शेतकर्‍यांना आर्थिक पत प्राप्त करून दिली. हजारो शेतकर्‍यांच्या मुलांपर्यंत उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना देश विदेशात नोकरीची संधी मिळाली.

जवळ जवळ ५५- ६० वर्षे सार्वजनिक कार्यात त्यांनी स्वत: ला झोकून दिलं होतं. सहकारी तत्त्वावरचा शेतकर्‍यांच्या मालकीचा पहिला साखर कारखाना काढला. तो यशस्वीरित्या चालविला आणि सहकार चळवळीतून आर्थिक समृद्धी येते हे जगाला दाखवून दिले. शिक्षण संस्थांचे चाळे उभारून सामान्य माणसांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविली. परिश्रम आणि अविरत कष्टापुढे निसर्ग न्यायाने त्यांचे शरीर थकले आणि वृद्धापकाळामुळे २७ एप्रिल, १९८१ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

ते देहाच्या रूपाने गेले तरी संस्थारूपाने जनमानसात कायमस्वरूपी राहिले आहेत. त्यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
- प्रा. डॉ. मुकुंद तापकीर