हँड ऑफ गॉड
महा एमटीबी   25-Apr-2018'हँड ऑफ गॉड' म्हंटल्यावर पहिली गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे अर्जेंटिनाचा दिएगो मॅराडोना आणि त्याने १९८६ च्या फूटबॉल वर्ल्डकप फायनलला केलेला गोल. मॅराडोनाने हा गोल करून अर्जेंटिनाला मॅच जिंकून दिली होती. तो गोल त्याने हाताने केलाय अशी जवळपास खात्री जगात बऱ्याच जणांची आहे. त्यामुळे 'हँड ऑफ गॉड' ह्या टर्मशी मॅराडोना आणि ती मॅच हे जोडले गेले. पण अनेकांना हा शब्द कुठून आलाय हे माहिती नसतं.


'हँड ऑफ गॉड' ही मूळ संज्ञा लगतचं जे चित्रं आहे त्यातून आलीय. ही संकल्पना देवाने मानवाला केलेल्या चैतन्याशी संलग्न आहे. वैश्विक चैतन्याचा देवाकडून माणसापर्यंतचा प्रवास ह्या अमूर्त संकल्पनेचं प्रकट स्वरूप ह्या चित्रात आहे, असं म्हणता येईल.

बायबलच्या म्हणण्यानुसार ऍडम हा जगातला पहिला मनुष्य प्राणी आहे. पृथ्वीवर आल्यावरसुद्धा तो अचेतनच होता. देवाने त्याला आपला कृपेचा हात पुढे करून त्याला चेतना दिली, असं मानलं जातं.

सिस्टीन चॅपल हे रोममधलं एक चर्च आहे आणि प्रार्थनास्थळ ह्यापेक्षा एक रिअलिस्टीक चित्रांचं उत्कृष्ट भव्य कलादालन म्हणून ती एक बहुमूल्य जागा आहे. सिस्टीन चॅपलचा मध्यवर्ती आकर्षण बिंदू असलेलं 'हँड ऑफ गॉड' हे चित्र 'मायकलेंजेलो ब्युरेनीती' ह्या विश्वविख्यात कलाकाराने केलंय. हे आणि अशीच जवळपास तीनेकशे ह्युमन फिगर्स असलेलं सिस्टीन चॅपलचं छत रंगवून कलेच्या इतिहासात त्याने अजरामर काम करून ठेवलंय.चित्रात आपल्या डाव्या बाजूला असलेला मनुष्य ऍडम आहे. ऍडम हा जिवंत असला तरी अचेतन दाखवला आहे. त्याची शरीरयष्टी पिळदार असली तरी निश्चेष्ट असलेल्या त्याने जमिनीवर अंग टाकून दिलंय. वरच्या बाजूला देव आहे. तरुण असलेला देव ही तत्कालीन संकल्पना मोडत मायकलेंजेलोने देव वृद्ध दाढीवाला दाखवला आहे. देवाने आपला उजवा हात ऍडमच्या दिशेने पुढे केलाय. देवाच्या उजव्या हातातून जगण्यासाठीची शक्ती ऍडमकडे पोचणार आहे. ऍडमने आपला डावा हात पुढे केलाय. देवाकडची शक्ती शरीराच्या डाव्या बाजूच्या हृदयात चेतना देण्यासाठी असल्यामुळे मायकलेंजेलोने ऍडमचा डावा हात पुढे केलेला दाखवला आहे.देवाच्या डाव्या बाजूला असलेली स्त्री इव्ह मानली जाते. देवाच्यामागे फोर्समध्ये फिरणारा आकार हा मेंदूच्या आकाराचा आहे. मायकलेंजेलोने कबरींमधली प्रेतं उकरून शरीरशास्त्राचा अभ्यास केला होता. त्या काळात चर्चच्या व्यवस्थेत हे अमान्य होतं. आणि म्हणूनच व्यवस्थेविरुद्ध जाऊन केलेला अभ्यास जगासमोर मांडण्यासाठी त्याने देवाच्या मागच्या बाजूला मेंदूचा आकार काढला आहे, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. काहींच्या मते देव ही संकल्पनाच मानवी मेंदूतून उगम पावली आहे, हे दाखवण्यासाठी मेंदू दाखवला आहे. अजून काही जणांच्या मते देवाच्या शरीराचा आकार हा ओरायन ह्या आकाशगंगेच्या आकाराशी मिळताजुळता आहे.

कलाकार म्हणून मायकलेंजेलोची जी काही मतं होती, त्याच्या ज्या काही संवेदना होत्या त्या प्रकट करायला चित्रकला हे त्याचं साधन झाली. त्याचा ख्रिश्चनीटीवरचा विश्वास / अविश्वास, पोप ज्युलियसची धर्मसत्ता, त्याने मायकलेंजेलोच्या मनाविरुद्ध करायला लावलेलं छताचं पेंटिंग, त्या दोघांमध्ये एखाद प्रसंगी झालेली मारामारी, ज्यूंवर होणारे अत्याचार ह्या सर्वांबद्दल असलेल्या भावना, खदखद त्याने त्याच्या चित्रातून व्यक्त केलीय. प्रचंड खोलात जाऊन केलेल्या शरीरशास्त्राच्या अभ्यासाची ह्यात त्याला जोड मिळालीय. अजूनही अभ्यासक त्याच्या ह्या चित्रांचा अर्थ, त्यातले अन्वयार्थ काढण्यात गर्क असतात. मात्र सामान्य लोकांसाठी छताचं जे दृश्यस्वरूप आहे ते केवळ अफाट आहे.

मायकलेंजेलोचा जन्म इटलीतला १४७० सालचा. असामान्य प्रतिभा घेऊनच जन्माला आलेल्या त्याने कलाविश्वात फार लहान वयातच साम्राज्य स्थापन केलं. तो मूळचा आणि हाडाचा शिल्पकार. चित्रकलेपेक्षा त्याचा कल मूर्ती घडवण्याकडे जास्त होता. अनाटॉमी ह्या विषयात बापमाणूस. १५०८ मध्ये सिस्टीन चॅपलच्या छताचं काम मायकलेंजेलोने चालू केलं आणि सोबतच्या १२ - १५ मदतनीसांची फारशी मदत न घेता ते ४ वर्षांच्या सलग मेहेनतीत जवळपास एकट्याने पूर्णदेखील केलं. चित्रकला हे माझं क्षेत्र नाही' असं म्हणणाऱ्या त्याने ६००० चौरस फुटात केवळ जादू वाटावी इतकं भव्य घडवून ठेवलं.

१९८० च्या दशकात ह्या छताचं रिस्टोरेशन झालं. मेणबत्त्यांच्या काजळीतून सगळी चित्रं साफ केली गेली. पाचेकशे वर्षांनीसुद्धा चित्रांचा हा खजिना चित्रकारांच्या आणि सामान्य रसिकांच्या कुतुहलाला तितकीच भुरळ पाडतो आहे.

(पूर्वार्ध)


- सारंग लेले