होमियोपॅथीबद्दलचे समज-गैरसमज - भाग-४
महा एमटीबी   24-Apr-2018
 


 
 
 
आपण ‘होमियोपॅथी’ या वैद्यकशास्त्राबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात जे गैरसमज असतात किंवा काही शंका असतात, अशा शंकांचे व गैरसमजांचे निरसन गेल्या काही लेखांमध्ये करत आहोत, आजच्या भागातही आपण अशाच काही शंका व गैरसमज बघणार आहोत.
 
 
होमियोपॅथीच्या औषधांचे काहीही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत, असा एक समज सर्वसामान्य माणसाच्या मनात असतो. हा समज चुकीचा नाही. परंतु, या मागील सत्य जाणून घेणे हे फार गरजेचे आहे. होमियोपॅथीची औषधे ही होमियोपॅथीच्या तत्त्व व नियमांनुसार दिली जातात. ही तत्त्वे व नियमहे सर्वत्र व सर्व परिस्थितीत एकच आहेत, कारण ते निसर्गाच्या नियमांनुसार बनवले गेले आहेत. (Nature's Law of Cure) त्यामुळे ज्या वेळी होमियोपॅथीक तज्ज्ञ रुग्णाला तत्त्वशुद्ध औषध देतात, त्या वेळी या औषधांचे अजिबात दुष्परिणाम दिसून येत नाहीत व रुग्णाचा आजार हा मुळापासून बरा होतो. परंतु, असे पाहण्यात आले आहे की, काही होमियोपॅथीचे डॉक्टर हे या होमियोपॅथीच्या तत्त्व व नियमांना पूर्णपणे बगल देऊन, त्यांची प्रॅक्टिस करत असतात. पर्यायाने ते निसर्गाच्या नियमांचीच पायमल्ली करत असतात. हे डॉक्टर्स अनेक प्रकारची औषधे एकत्र करुन, रुग्णाला देत असतात, विनोदाने आम्ही या प्रकाराला ‘मिक्सोपॅथी’ (mixopathy) असेही म्हणतो. ही सर्व प्रकारची औषधे जेव्हा एकत्र करुन, रुग्णाला दिली जातात, तेव्हा मात्र ही जरी होमियोपॅथीची औषधे असली, तरी या मिक्स किंवा मिश्रण केलेल्या होमियोपॅथीक औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
 
म्हणून सर्व लोकांना मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो की, जेव्हा आपण होमियोपॅथीचे औषध घ्याल, तेव्हा ते तज्ज्ञ होमियोपॅथीक डॉक्टरांकडूनच घ्या. जेणेकरुन आपल्याला फायदा होईल व तब्येतीवर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत.
 
 
अजूनही एक प्रकार नेहमी पाहण्यात येतो, तो म्हणजे स्वत:च वाचून औषधे घेणे किंवा देणे. काही चिकित्सक मंडळी होमियोपॅथीची पुस्तके घेऊन येतात व ती पुस्तके वाचून स्वत:च ती औषधे घेतात व इतरांनाही देतात. माझी एक नम्र विनंती आहे की, अशा स्वयंघोषित डॉक्टरांपासून लोकांनी दूर राहावे. होमियोपॅथीमध्ये संपूर्ण शरीरशास्त्राचा अभ्यास करुन, औषधशास्त्र म्हणजेच फार्मसीचा अभ्यास करुन मगच तज्ज्ञ तयार होतात. त्यामुळे प्रत्येक औषधाचे परिणाम व दुष्परिणाम तसेच उपयोग व ती कधी देऊ नयेत, याचे संपूर्ण ज्ञान तज्ज्ञांना असते. परंतु, काही लोक जेव्हा स्वतःच पुस्तके वाचून होमियोपॅथीच्या अर्धवट ज्ञानाने व शरीरशास्त्राच्या शून्य ज्ञानाने औषधे देतात, तेव्हा मात्र ही अतिशय गंभीर बाब म्हटली पाहिजे. काही लोक स्वत:च औषधे घेत राहतात, हेही चुकीचे आहे.
 
 
चुकीच्या पद्धतीने जेव्हा होमियोपॅथीची औषधे घेतली जातात, तेव्हा सर्वात मोठा होणारा दुष्परिणाम म्हणजे ’suppression.' म्हणजेच आजार दबला जाणे.
 
 
आजार दबला जाणे म्हणजे काय?
 
चुकीच्या पद्धतीने जेव्हा औषध घेतले जाते, मग ते होमियोपॅथीचे असो वा इतर कुठल्याही औषधशास्त्राचे असो, तेव्हा रुग्णाला बरे तर वाटते. पण, त्या रुग्णाचा आजार हा दबला जातो, म्हणून तात्पुरते त्याला बरे वाटते. पण, प्रत्यक्षात मात्र हा आजार कमी महत्त्वाच्या अवयव वा संस्थेकडून जास्त महत्त्वाच्या अवयवांकडे ढकलला जातो. Disease goes inside from less important organ to more important organ. उदाहरणार्थ, जेव्हा त्वचारोगासाठी रुग्ण सतत मलमकिंवा लोशन लावत राहतो, तेव्हा त्वचेवरुन हा आजार दिसेनासा होतो व रुग्णाला असे वाटते की, आजार बरा झाला. परंतु, प्रत्यक्षात मात्र हा आजार त्वचेवरुन दबला जातो व फुप्फुसांवर जातो आणि रुग्णाला काही दिवसांनतर दम लागायला लागतो. त्याला वाटते हा दुसराच आजार आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र तो एकच आजार दबला जातो व महत्त्वाच्या अवयव वा संस्थेवर येतो. यालाच uppression' असे म्हटले जाते.
म्हणून माझा असा सल्ला आहे की, औषधोपचार करताना नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच औषधोपचार करा व निरोगी व्हा.
 
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर